मुक्काम पोस्ट... कुलंग!

32 comments:

मुक्काम पोस्ट.... कुलंग! आयुष्यात काही, गोष्टी इच्छा सहज साध्य होतात काहींना तप उलटली तरीही वाट पाहावी लागतात. श्रीकांत दादांनी वयाच्या पस्तीशीत कुलंग किल्ल्याला भेट दिली होती तेव्हा काही कारणास्तव त्यांना माथ्यावर पोहोचता आलं नाही आणि त्यांचा कुलंग राहून गेला होता. आता ते पंच्याहत्तर वर्षांचे आहेत, आणि किल्ल्याच्या माथ्यावर जायची इच्छा त्यांनी बोलून दाखवली ती त्यांच्या लहान भावाला आणि आमच्या लाडक्या ट्रेकर मित्राला, अमितला! म्हणजे तब्बल चाळीस वर्षानंतर श्रीकांत दादा कुलंगवर जाणार होते. हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. आणि माझं म्हणाल तर मी पहिल्यांदा जेव्हा अलंग आणि मदन आटोपल्यावर कुलंग वर आलो होतो तेव्हा इथल्या टाक्यांच्या आणि त्यावर बांधून काढलेल्या बांधाच्या अक्षरशः प्रेमात पडलो होतो. या किल्ल्यावर मुक्काम तो बनता है, हे तेव्हाच ठरवलं होतं. पण मधल्या काळात ते जमलं नाही आणि इथे येऊन तंबू लावायची इच्छा ती अपुरीच राहिली होती आणि त्यालाही आता दहा एक वर्षे झालीच(श्रीकांत दादाच्या मते तरी किरकोळच) होती. तर सांगायचं हेच की, एकदाचा हा बेत जमुन आला तो अमितमुळे!  पठ्ठ्या गेल्या जानेवारीमध्येच येऊन गेला होता, त्यामुळे आम्हा बाकीच्यांसाठी ते अजुन सोयीस्कर झालं होतं. सोबतीला विजू, मिलिंद दादू हे नेहमीचे भिडू तर तुषार आणि श्रीकांत दादासोबत पहिल्यांदाच डोंगरात आलो होतो. कित्येक वर्षांची ओळख असुनही विराग आणि रुचिरासोबतही पहिल्यांदाच डोंगरात भेट होणार होती. घाटघरला रात्री पोहोचलो तेव्हा नानाही येणार आहेत ट्रेकला आणि ते सकाळी पोहोचतील असं वीजूकडून कळालं, त्यामुळे तोही एक आनंद!


पुण्यावरून निघता निघता उशीर होऊन ट्रॅफिक ने आम्हाला नाशिक रस्त्याला पकडलेच. गर्दीतून बाहेर पडत बोट्याला पोहोचलो आणि पुढे कितीतरी वेळ रस्त्यावर आमच्या दोन चारचाकी आणि कुठेतरी झाडीत फिरत असलेले एखाद दोन निशाचर वाघरु! गाडीतल्या आमच्या गप्पा रंगत होत्या आणि घाटघरचा रस्ता कमी होत होता. घाटणदेवीच्या आवारात पोहोचलो तेव्हा रात्रीचा एक झाला होता, इकडे तिकडे न फिरकता सरळ पथारया पसरल्या. बिबट्याच्या भीतीने अमित आणि तुषार ने गाडी जवळ केली. सभोवतालच्या किर्र जंगलात सगळे जण निद्राधीन झाले आणि उद्याचा मुक्काम हा कुलंग होणार या गोड विचाराने मीही झोपी गेलो.

पंधरा दिवसांपूर्वीच योगेश आणि कुटुंबासोबत घाटघर ला पाणलोट किनारी आम्ही मस्त मुक्काम टाकला होता, कारवीचा डोंगरातला पहिलाच मुक्काम! फुल्लटू धमाल केली पोरीने, बरेच वर्षांनी चारवीही भेटली होती. इतक्या लवकर घाटघरची ही वाट परत धरावी लागेल असं वाटलं नव्हतं. पण नशीब फळफळल होतं. मुक्काम कुलंग, बेत ठरला होता, आणि ठरल्याप्रमाणे आता घाटण देवीला पोहोचलोही होतो. सकाळी जाग आली ती पुढ्यातच डोंगरामागून उगवू पाहणाऱ्या नारायणरावांच्या किरणांनी, रतनगड, खुट्टा, शिपनुर, इत्यादींनी केव्हाच दुलई बाजुला केली होती, अन्हिक उरकून आम्ही एकनाथकडे पोहोचलो तेव्हा नाना आणि कंपनी एकदम रेडी होते. पोहे आणि थालीपीठ यावर ताव मारून आम्ही कुलांगकडे मार्गस्थ झालो तेव्हा सकाळचे घड्याळात आठ वाजले होते आणि नारायणरावानं आधीच आग ओकायला सुरवात केली होती, गाडीरस्ता सोडून पायवाटेला लागलो. पुढ्यात अमकु त्रिकुटाने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं, कुलंगची वाट जवळ करायची आहे, पण प्रकरण वाटतं तेव्हढ नक्कीच सोपं नाही, याची जाण करून दिली. डावीकडची हिवाळ्याची आणि उजवीकडची पारव्याची वाट या दोन्ही मध्ये हे त्रिदेव, त्रिकालधित् ठाण मांडून बसले आहेत. पावसाळ्यात कधीतरी या दोन्ही वाटा तुडवायची लालसा मनामध्ये येऊन गेली. तुर्तास हिवाळ्याकडे आमची वाटचाल सुरू होती, चारचाकी गाडी जाईल इतकी रुंद पायवाट ही हिवाळ्याच्या कड्यापर्यंत आहे. सोबतीला एकनाथचा मुलगा कड्यापर्यंत आला होता, तिथून पुढे एकनाथ सोबतिला असणार होता. हिवाळ्याचा ओढा पार करुन पहिल्या टेपडावर पोहोचलो तेव्हा ऊन्ह चांगलीच वाढली होती. खाली कोकणपोकळी खुणावून गेली, इथल्या घाटवाटा राहिल्या आहेत, बेत केला पाहिजे.


वाटेवर एकमेव दिसणाऱ्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबलो, गप्पांच्या ओघात पगारे बापूंच्या "वनलायनर" ने धमाल आणली.म्हणे, वाचन आमंच पण भरपुर आहे, पण वेळेवर आठवत नाही. बाकी सगळी गँग झकास होती एकदम. थोडं अजुन उंचीवर आल्यावर मागे आजोबा आणि शिपनुर ने दर्शन दिले, फिरून नमस्कार करून पुढे मार्गस्थ झालो. हिवाळ्याची डोंगरधार संपून आता सपाटीला लागलो, छोटा कुलंग उजवीकडे ठेवत जंगलातली वाट तुडवत निघालो तोच डावीकडे खाली भावली धरणाच पाणी चमकत होतं. ऊन्हसावलीचा खेळ खेळत, निवांत पायांना आराम देत आम्ही कुलंगची वाट जवळ करत होतो. एकनाथ आणि कंपनीने घाटघर पासुन कुलंग पायऱ्यापर्यंत मार्किंग करून ठेवलय त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यताच नाही. छोट्या कुलांगला आता संपुर्ण वळसा मारून झाला, सपाटीवरून चालत पुढे कुलंगचा वेगळाच नजारा समोर आला, जटा बांधलेल्या तपस्वीसारखा. आणि दूर मागे कळसूबाईनेही दर्शन दिले. कमाल! पुढे पट उलगडावा तसा अमकूचा आंबेवाडीकडचा नजारा खुलत गेला. उन्हं रणरणत होती, पायगाडी पळत होती. कधी उघड्यावरून, कधी झाडीतून वाट काढीत आमची गाडी कुलांग चढाईला लागली तेव्हा आधीच चांगलाच दम निघाला. भर उन्हात विजुने कलिंगडाचा सुखद बॉम्ब टाकला, आणि सगळे विसावले. कलिंगडाचा फडशा पाडीत, नानांच्या सुरात सूर मिसळुन आम्ही विजुवर बॉम्ब टाकला, विजुच लग्नं जवळपास जमुन आलं होतं, पठ्ठ्या लाजून लाल झाला होता, असं वाटत होतं, ट्रेक संपल्यावर आता सुपारी फोडायलाच जावं लागतं की काय! पण आमच्या दुर्दैवाने असं काही झालं नाही, असो! 

आता सपाटी संपुन चढाईला सुरवात झाली होती. दर पाच पावलागणिक दम लागत होता. कारवी आणि बांबू, दोघेही मदतीला धावुन आले. बाकी या कारवीची खरच कमाल आहे, बरोबर मोक्याच्या ठिकाणी ही डोंगरात मदतीला येते. या वाटेने पुढे चालत गेलो की पुन्हा एकदा पट उलगडत जावा तसा सह्याद्री उलगडत जातो. सर्वात आधी मदनगडाचा बॅरल शेप समोर येतो,त्याचं नेढं लक्ष वेधून घेतो. नेढ्यातून येणारा शुभ्र प्रकाश आणि त्यासमोरील नाकाच्या ठेवणीमुळं तो एक हस्तिदंत वाटून गेला. हळूहळू मदनगडाच्या M3 आणि M4 या सुळक्यांनीही दर्शन दिलं,कळसूबाई तर सुरवातीपासूनच साथीला होता. आणि मग किरडा अन् अलंगमधल्या नवरा- नवरीच्या लग्नाला लहान कळसूबाई अन् श्रीकिरडा यांनीही आपली हजेरी लावली,तोपर्यंत आम्ही कुलंगच्या पायऱ्यांना भीडलो होतो. आता येथून चढाई सगळी उभी. तटबंदी दिसल्यावर अजुन हुरुप वाढला, पायऱ्या चढताना दमछाक होते खरी,पण अध्ये मध्ये थोडं गार वारं सुखावुन जात होतं, तेही थोडकं. उभ्या खडकात कोरलेल्या खोबणीसारख्या या पायऱ्या चढताना मज्जा येते,पण नीट काळजीपूर्वक पाऊल टाकायचं. चुकून गफलत झाली तर क्षमा नाही. काही ठिकाणी कठडे असल्याने थोडा मानसिक आधार मिळतो अन् दडपण कमी होतं. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधीच चांगल्या ऐसपैस गुहा कोरलेल्या आढळतात,एकदम गार पडलेलं कातळ,बसायचा मोह आवरत नाही, आधी दोन तीनदा येऊन गेलो असलो तरी इथे निवांत बसता नाही आलं. पण आज दुपारच्या जेवणाचा बेत इथेच ठरल्यामुळे निवांत तासाभराचा विसावा होता. इथे आडवा झालोच तर काही सेकंदाच्या आत समाधी लागावी, आणि ती विरागची लागलीच. जेवण आटोपून गप्पा टप्पा झाल्या, घुबड फोटोग्राफी झाली, एकनाथ आधीच पुढे गेला होता, सरपणाची मोळी खांद्यावर घेऊन, या माणसाचीही कमाल, इथे धड चालता येत नाही आणि एवढी मोठी लाकडं घेऊन हा माणूस निवांत पुढे गेला होता. पुन्हा शंभर- एक पायऱ्यांचा कातळ चढून आपण वर येतो तोच एक बुरुजाआड लपलेलं प्रवेशद्वार आपल्या स्वागतास सज्ज असतं. कमानीचा पत्ता नसलेलं हे प्रवेशद्वार मन विशन्न करून सोडतं. पण दगडांच्या एकमेकांवर केलेल्या ठेवणीने अन् त्यांच्या प्रमाणबद्धतेने थक्क व्हायला होतं . 


गडमाथ्यावर पोचल्या पोचल्या आपल्या आनंदाला पारावार नसतो,आभाळ ठेंगण वाटतं आणि अक्षरशः एवढा डोंगर चढून आल्याचा थकवाही नाहीसा होऊन आपण आपल्या पायाला कुलंगचं पठार मोकळं करतो. पाण्याची जोरदार तहान लागलेली असते आणि इथे आल्यावर भव्य टाक्यातले पाणी पिल्यावर न भुतो असं सूख वाटून जातं. इथे असलेल्या पाण्याच्या भल्या मोठ्या टाक्याचा समूह बघून त्यात डुबकी  मारण्याचा मोह आवरत नाही, पण आवरताच घेतलेला बरा. डाव्या बाजूला वळलो की आधीच्या तीन टाक्यांच्या मधोमध गणेशाची सुंदर प्रतिमा कोरलेली आढळते,मुख जरी नसलं तरी उर्वरीत शिल्प अजूनही चांगल्या स्थितीत आहे पण तिच्या भग्नवस्थेमुळं वाईट वाटून जातं. अन् शेवटच्या दोन टाक्यांच्या अलीकडे शेजारीच लिंग नसलेली शिवपिंड कोरलेली आढळते. अजुन पुढे गेलो की खडकात खोदून काढलेल्या तीन टाक्याच्या समूहाने स्तिमित व्हायला होतं. आजपर्यंत कुठल्याही किल्ल्यावर पहिल्या नसतील एवढ्या टाक्याचा समूह कुलंग वर आहे. पण या समुहाची बांधणी त्यातल्या त्यात खास ! हुबेहूब अलंग गडावरील समूहांसारखी,इथे पण उतारावर बंधाऱ्याची भिंत. त्यामध्ये जास्तीचे पाणी जायला मोरी,विशेष म्हणजे त्या मोरीला एक सुरेख कमान आणि पाणी वाहून जायला गोमुख ! बहुदा गतकाळातल्या शुशोभिकरणाचा प्रयत्न असावा. नव्हे तसंच असणार ! गोमुखांचे फक्त अवशेष उरले आहेत पण हौदाच्या प्रमाणबद्धतेला तोड नाही. इथेही भव्यतेचा साक्षात्कार होतो,कितीतरी ऐश्वर्यसंपन्न राजवटी नांदुन गेल्या असतील.ज्याअर्थी इथे एवढ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात,त्याअर्थी किल्ल्यावर बऱ्यापैकी राबता असला पाहिजे. आता हे सगळं खोद्काम करून निघणारा दगड कूठे वापरणार ? तर इथे वाड्यांचे बांधकामही भरपूर असलं पाहिजे. सारंच गूढ,अगम्य ! त्याच धाटणीचा उजव्या बाजूचा वाडा शेवटच्या घटका मोजत आहे, इथले काळाच्या ओघात निपचीत पडलेले अवशेष गतकाळातील गूजगोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतायेत. अजुन एक म्हणजे इतकया सुंदर, अवाढव्य आणि अवशेषसंपन्न किल्ल्याचे दुर्दैव हेच की याचा कुठेही साधा उल्लेखही नसावा, याचं मला अतीव दुःख वाटतं.




पूर्वेकडून फेरफटका मारीत, मोठ्या इमारतीचे अवशेष बघुन आम्ही पश्चिमेकडल्या टोकाला येऊन बसलो. विराग ने ड्रोन उडवला, त्याने किल्ल्याचे भन्नाट फोटो आणि व्हिडिओ टिपले. अमित शेवटच्या टोकावर वर जाऊन पहारेकऱ्यांच्या बसण्याच्या जागा न्याहाळून आला, आणि मी विज्याचं "काप रे पटकन, किती टाईमपास करतोस" हे पालुपद ऐकत कांदा कापत बसलो, भेळ चा बेत होता,  पण ह्या हावरटला उसंत कुठे होती. भेळ मस्त झाली, फस्तही झाली, आणि खाता खाता दिवाकर रावही अस्ताला निघाले होते. छोट्या कुलंगच्या आडून सुर्यास्ताचा अप्रतिम सोहळा सगळेजण टिपण्याचा प्रयत्न करत होते. सांजवेळ होता होता टेन्टची जागा ठरवुन लावूनही घेतले. एकनाथ ने चूल पेटवलीच होती, चहाचा बेत उरकून निवांत गप्पा हानित बसलो. एकनाथने मसाले भात केला होता, पापड आणि मसाले भातावर ताव मारून झोपी गेलो, तोच तीन साडेतीनच्या दरम्यान विरागचा आवाज आला, आकाशगंगा दिसतीये, हा माणूस आकाश निरीक्षणाबद्दल ठार वेडा आहे, बरीच नवीन माहिती त्याच्याकडून कळाली. कमाल! तिकडे गीतेसर, रात्रभर जागे होते असं कळलं, कॅमेरामध्ये आकाशगंगा टिपत!बापरे! या वयात चांगलाच उत्साह म्हणायचा. जबरदस्त! 




रात्रभर सुरू असलेला वारा पहाटे शांत झाला, टेन्ट फडफडत असला तरी झोप मात्र जाम भारी लागली होती. पहाटे ऊठुन सूर्योदय अनुभवायचा होता, आळशीपणा आड आला! अजुन काय, हा मित्र खुपच सलगी करायला लागलाय आजकाल. तंबी दिली पाहिजे. एकनाथने अफलातून पोहे बनवले होते, लाजवाब! चहापोह्यांचा पद्धतशीर कार्यक्रम झाला,फक्त नवरा-नवरी गायब होते(विजु).पाणपिशव्या भरून  घेतल्या, सगळं आवरून उतरायला सुरवाती केली तेव्हा नारायणरावानी आधीच मोर्चा सांभाळला होता. पण उन्हं अजुनतरी सह्य होतं, अध्येमध्ये येणारा गारवा अंगावर घेत पायऱ्या उतरत होतो. सकाळच्या उन्हात अलंग आणि मदन आणि शिखर कंपनी न्हाऊन निघत होती. काही वेळातच भाजायला सुरुवात झाली आणि आमची गाडी वरच्या गिअरमध्ये दामटली. आता सगळा जोर गुडघ्यावर यायला लागला, हातातली काठी मदतीला आली, पायऱ्यांचे दगडही तापले होते. अर्थात आता फोटो काढण्याचा उत्साह कमी झालेला असला तरी मधून फोन बाहेर येतच होता. कितीही काढले तरी कमीच पडतात, नाही! श्रीकांत दादांची परिस्थिती बघता त्यांची रक्सॲक आधी विजुने आणि नंतर एकनाथ ने घेतली, बाकी कमालीच्या संयमाने विजू त्यांना मदत करत खाली उतरवत होता, पठ्ठ्याला सलाम! तापलेले दगड आणि जीवघेण्या पायऱ्या मागे टाकत कारवीत शिरलो तेव्हा हायसं वाटलं. कलिंगड टप्प्यातून झाडीत घुसलो तेव्हा उन्हाचा दाह चांगलाच वाढला होता, आता सपाटीवरून अख्ख्या कुलंग आणि छोट्या कुलंगला वळसा घालायचा होता. मजल-दरमजल करत पायवाट सरत होती. ग्रूप मधला अंतर वाढत होतं, नानांनी आणि मी एके ठिकाणी मारीचा ब्रेक घेऊन परत वाटेला लागलो, एव्हाना श्रीकांत दादा मागुन येऊन आमच्या पुढे निघुन गेले. मी आपला निवांत चाललो होतो. काही वेळ एकटाच, हीच वेळ असते डोंगरासोबतच्या गुजगोष्टीची.  स्वतःमध्ये हरवण्याची. छान आंबेवाडी कुरुंगवाडीची दरी न्याहाळत चाललोय, ही चाल संध्याकाळची जाम भारी असेल नाही! पण तुर्तास डोक्यावर नारायण, पुढ्यात घाटघरची पायवाट! याच तंद्रीत वाट वाकडी झाली, आणि मार्किंग गायब झाल्यामुळे परत फिरून वाटेला लागलो तर विजू, विराग अन् रुचिरा ड्रायफ्रुट चे लाडू चेपत होते, तिथेच थोडा विसावा घेऊन पायगाडी दामटली.






हिवाळ्याच्या धारेला लागलो तेव्हा आगीचे गोळे अंगावर पडतायत इतका उष्मा वाढला होता. कड्यावर वनविभागाच्या छत्राखाली बसुन एक-एक काकडी संपवली आणि गाडीमार्गाला लागलो, आता भरदिवसा आंघोळीचे स्वप्नं पडायला लागले. मागे फिरून बघितलं तर दंड थोपटून कुलंग विचारत होता, काय, येणार का परत मुक्कामाला? सुकलेल्या तोंडाने हो, येणार की!, उत्तर देऊन एकनाथकडे मार्गस्थ झालो. डोक्यावरून गार पाण्याची आंघोळ आणि पोटात गरम जेवण गेलं, तेव्हा कुठे मनःशांती झाली. श्रीकांत दादांचा ट्रेक पुर्ण झाला, त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान ओसंडून वाहत होतं, ते विरागने त्याच्या व्हिडिओमध्ये अचुक टिपलं, बाकी नेहमीप्रमाणे ट्रेक भन्नाटच झाला 


ब्लॉग मधील फोटो साठी नाना, गिते सर, अमित, आणि सर्वांचे मनापासून आभार. माझा कॅमेरा यावेळी शांत होता.


धन्यवाद । संदिप वडस्कर
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकताना मात्र जबाबदारीचे भान ठेवा. तुम्ही जे अनुभवताय, तुम्हाला वाटत असेल तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, त्यांनाही अनुभवता यावं तर खालील सूचनांचे काटेकोर पालन करा...... मोठ्या संख्येने जाण्याचे टाळा, गोंगाट टाळा, प्लास्टिक टाळा........ निसर्गाचा मुक्तपणाने आस्वाद घ्या,निसर्गालाही मुक्तपणाने जगु द्या !






हातलोटचा देवरहाट !

7 comments:
सध्या माझा देवराई या विषयामध्ये इंटेरेस्ट वाढत चाललाय. म्हणजे तो माझा आधीपासूनच जिव्हाळ्याचा विषय आहे मात्र मधल्या काळात थोडा पुसट होत गेला होता. पण गेल्या उन्हाळ्यात कोंकणदिवा ट्रेकमध्ये दापसरेच्या देवराईला भेट देण्याचा योग आला अन् त्याही आधी अहुपेची देवराई बघुन झाली होती त्यात भर म्हणजे आमच्या “सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्स”  ग्रुपमध्ये या वर्षीच्या दिवाळी अंकांची चर्चा चाललेली असताना अजयने “भवताल” हा विशेष अंक सुचवला होता,लागलीच घेऊनही आलो. दोन दिवस अंक हातचा सुटला नाही आणि देवराईने पुन्हा एकदा मनात उचल खाल्ली.

आजकाल ट्रेकला जाताना सहसा किल्ला,एखादी घाटवाट आणि आजुबाजुला असलेली देवराई हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न चाललेला असतो. अनायासे या दिवाळीचा आमचा हातलोट घाट-कोंडनाळ-मधुमकरंदगड हा बेत ठरला होता. त्यात किल्ला होता, घाटवाटाही होत्या. पण आजुबाजुला देवराईचा उल्लेख कुठेही सापडत नव्हता. पुर्वाभ्यास म्हणुन विकीमॅपियावर भेटी होत होत्या, आणि नेमका एक दिवस इंटरनेट चाळत असताना हातलोट गावाच्या पश्चिमेला मला एक हिरवा ठिपका सापडला,अर्थात आजूबाजूच्या झाडीपेक्षा जरा जास्तच गर्द. झूम करून बघितलं तर मंदिर(रहाट) या नावाने तो मॅप होता. आता मला खात्रीच पटली की ही देवराईच असणार कारण देवराईला “देवरहाट” असेही संबोधतात. ट्रेकचं हे समिकरण जुळल्याचा परमानंद झाला.त्यामुळे आता कधी ट्रेकचा दिवस उजाडतो अन् डोंगरवाटेला लागतो असं झालं होतं.

दिवाळी खाऊन झाली होती, फटाके आम्ही उडवत नाही, भाऊबीजही झाली आणि गुलाबी थंडीची हलकीशी चाहूल लागायला सुरवात झाली. तसा यावर्षी पाऊस चांगलाच लांबल्यामुळे गारठाही थोडा मागेपुढे करत होता.अशातच घरातुन बाहेर पडायला तब्बल एक तास उशीर झाला. महाबळेश्वरच्या ट्रेफिक मध्ये अडकण्यासाठी हा उशीर पुरेसा होता, अपेक्षेपेक्षा याचा जास्तच भुर्दँड भरावा लागला.ईश्वर काकांची स्विफ्ट होती आणि त्यांच्या  बाजुला सरकारी जावई आमीन बसला होता,थेट मंत्रालयातून जावळी खोरे गाठण्यास.  या जंगलात सरकारी माणसे सहसा फिरकत नाही(लाल डब्ब्याचे ड्राइवर-कंडक्टर सोडले तर) जावळीत शिरण्यास एवढा उत्सुक फार कमी लोकांपैकी अमीन एक असावा, असो पण त्यामुळे मंत्रालयाचं ओळखपत्र दाखवुन महाबळेश्वराची एंट्री फी वाचली होती,हेही नसे थोडके.

कोयना नदीवरचा शिवकालीन पुल 

रणरणत्या उन्हात, सावली देवराईची !

2 comments:
फाल्गुन संपला. चैत्राची गुढी यावर्षीच्या विक्रमी तापमानात उभारल्या गेली.वैशाखवणवा चैत्रातच पेट घेतो की काय, असं वाटत होतं. एवढा चैतन्यमयी मराठमोळा सण उन्हाच्या रखरखाटात साजरा करावा लागतो,याचं मला नेहमीच अतिशय वाईट वाटतं. पण निसर्गाने काहीतरी ठरवूनच ही तिथि निवडली असणार. त्याचं कारण आपल्यासमोरच उलगडत असतं, वसंतऋतुचं आगमन झालेलं असतं. या उन्हातच झाडांना पालवी फुटायला सुरवात होते, आंब्याला मोहोर येऊन ते पिकायला सुरवात होते.स्वच्छ निळ्या आकाशात नारायणराव खुल्या मनाने तळपत असतात. आता तेवढा उन्हाचा भाग सोडला तर मन सह्याद्रीमंडळात मुक्त हिंडायला एका पायावर तयार असतं. पण यावर्षीचा एकंदरीत उन्हाळा बघता बाहेर पडायला जीव मागेपुढे बघत होता. कुठेतरी जाऊन यावं, पण कुठे हे नक्की सुचत नव्हतं. योगेशने अहुपे घाट सुचवला, पर्याय चांगला असला तरी कोंकणातून चढाई आणि ती या उन्हात म्हणजे. थोडी द्विधा मनःस्थिती होतीच. पण योगेशने, त्याची पाच वर्षाची मुलगी "चार्वी" सोबत येते म्हटल्यावर माझं मत ठाम झालं आणि होकार कळवला.

पश्चिमेचा गार वारा....!

8 comments:
गेलं वर्ष ट्रेकच्या नावाने चांगलंच दुष्काळग्रस्त निघालं, तेवढी गौताळ्याची आडवाटेवरची किल्लेगिरी अन् सवाष्णी-वाघजाईची व्हाया ठाणाळे रपेट सोडली तर पायांना कुठे तंगडतोड नाही की खांद्यांना कुठे पिट्ठूचे काचे नाही. घामाने निथळलेली पाठ जमिनीवर कुठे टेकवलेली आठवत नाही, खडकातलं गारेगार पाणी पिऊन कितीतरी वर्षे लोटली असं वाटतंय, या सह्याद्रीची इतकी सवय होऊन गेलीये की गेलं वर्ष माझं मी कसं काढलंय हे मलाच माहिती. या सह्यमंडळाच्या मायेच्या ओलाव्याशिवाय आयुष्य सगळं शुष्क आहे,हे मात्र कळुन चुकलं. सासुरवाशीण जशी वाट बघतीये, कधी माहेरची माणसे येतील आणि तिला माहेरा घेउन जातील, अगदी तशीच अवस्था झालीये अस्मादिकांची !  आणि तसं बोलावणही आलं होतं सह्याद्रीचं, तसं ते नेहमीच आलेलं असतं म्हणा. पण यावेळी मी त्याच्या हाकेला "" द्यायचं ठरवलंच होतं. म्हटलं चला आता पुन्हा एकदा नव्याने सुरवात करायला हरकत नाही.
बाहेर उन्हाचा दाह वाढत असला तरी आता मला कुणाची पर्वा नाही. फाल्गुनोत्सव जवळ येतोय, सह्यमंडळात लालभडक पळस फुलला असणार. करावंदांना मोहर आला असणार, तशी करवंदीची चव चाखायची म्हणजे मे जुनशिवाय पर्याय नसतो. पण किमान त्याचा मोहर बघुन तरी यावं. आंब्याची झाडे सूद्धा बहरली असणार, त्याचा सुगंध घेऊन यावं. या डोंगरातलं जीवनच वेगळं असतंनाही ? , स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, सिमेंटच्या जंगलात अनुभवता न येणारा असा निर्मळ सूर्योदय-सूर्यास्त. पण कधी कधी भीती वाटते, आपण जसा विचार करतोय तोच विचार हे डोंगरवासी करीत असतील का ? तर ती भीती इथे खरी ठरते, कारण त्यांनाही डोंगरात राहून उबग आलेला असतो, शहरी लोकांपेक्षा ह्या लोकांचे प्रश्न फार वेगळे आहेत, तेही मुलभुत. आणि ते स्वभाविक आहेत, त्यांनाही चांगले रस्ते,वीज,पाणी ह्या सर्वांची गरज भासतेच. शहरात आली की मग ही माणसं हुरळून जातात. शेवटी माणसाला बदल हवा असतोच. अन् त्याच बदलाच्या पायी आपण डोंगरांची वाट जवळ करतो, हेतु प्रत्येकाचा वेगळा असु शकतो. नाही का ?

किल्लेगिरी आडवाटेवरची ! ... वैशागड, वेताळवाडी !!

5 comments:
पहाटे जाग आली तेव्हा कुठल्यातरी गावाच्या वेशीवर पोहोचलो होतो, गाडीच्या बाल्कनीत पिशव्यांच्या गराड्यात रात्रभर दूमडुन घातलेली माझी घडी विस्कटली आणि डोळे चोळतच आजुबाजुला बघुन घेतलं तोच पुढ्यात बसलेला साकेत वदला, "झाली का झोप ?" वाटत होतं, मी सोडुन गाडीतलं अक्खं पब्लिक जागी होतं. अंभईच्या वेशीवर भीमपहाट उगवली होती. टिपू सुल्तान चौकातुन गाडी गावातुन बाहेर पडली आणि पहाटेच्या प्रसन्न(?) वातावरणात बहरलेली जवळ जवळ एकाच रंगाची फुले चुकवीत आमची स्कॉर्पियो एकदाची वैशागडाच्या वाटेला लागली, एव्हाना उजाडलं होतं. वळणावळणाच्या रस्त्यावरून गाडी सुसाट सुटली होती. ढगाळलेल्या आकाशाखाली जंजाळ्याच्या टेकाडावर गाडी थबकली तेव्हा गावाच्या डावीकडचा घेरेदार वैशागड,आता पायगाडी सुरू होणार याची कल्पना देऊन गेला.
गाडी किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत जाते ही माहिती यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसाने खोडून काढली, त्यामुळे "गाडी किल्ल्यात पोहोचली असती तर बरं झालं असतं ",असा सर्वांचा एकंदरीत सुर ! तो आवरता घेत आम्ही गडाच्या वाटेला लागलो. "किल्ला साढ़ेतीनशे एकरात पसरला आहे", इति हर्शल. एवढा मोठा किल्ला ! म्हणजे धुंडाळण्यासारखं बरंच असलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर माझा वेळेच्या अभावी किल्ल्यांबद्दलचा पूर्वाभ्यास यावेळी बारगळलाच होता. आणि तसंही एवढी हुशार मंडळी ट्रेकला असेल तर त्याची गरज ती काय. त्यातल्या त्यात नाशिक आणि परिसरात भरपुर भटकलेला खुद्द कुळकर्ण्यांचा हर्शल आम्हाला लीड करत होता आणि ट्रेकचा संपुर्ण प्लॅन हा खुद्द शब्दभास्कर ओंकार यांच्या मार्गदर्शनाखाली आखल्या गेला होता.ट्रेकला तो नसला तरी प्लानच्या स्वरूपात तो सोबतच होता. त्यामुळे वेगळी अशी चिंता नव्हती. किल्ल्यात जाणारी पायवाट म्हणजे पायवाटच म्हणायला पहिजे कारण चढ जवळजवळ शुन्यच दिसत होता, त्यामुळे इथे ट्रेकिंग नव्हे तर फक्त किल्लेगिरीच करायची होती. हे प्लॅनमधल्या जवळजवळ सर्वच किल्ल्यांच्या बाबतीत होतं.

उंबरठ्यापलीकडील जग...'राज'माची

13 comments:
उंबरठा ! घरातुन बाहेर पडताना ओलांडला जातो. आपण रोज ओलांडतो, पर्याय नसतो. नाहीतर रोजच्या भाकरीची सोय कशी होणार. पण त्याला खऱ्या अर्थाने ओलांडला असे म्हणता येत नाही,कारण जी गोष्ट आपण रोज करतो,गरजेसाठी करतो, ज्यात तोचतोचपणा असतो,तेव्हा विशेष असं काही वाटत नाही. प्रत्येक गोष्टींमधून आनंद घ्यायला अर्थातच त्यात नाविन्याची गरज असते,घरातुन बाहेर पडण्याची गरज असते म्हणजेच कंटाळवाण्या जगातून तुम्ही बाहेर पडून जर नवीन भरारी घेण्यास तयार असाल तेव्हा खऱ्या अर्थाने उंबरठा ओलांडला असं मी समजेन. निदान माझ्या बाबतीत तरी तसंच आहे, माझ्या आवडत्या डोंगर भटकंतीमध्येही मी जेव्हा तोचतोचपणा आणतो,तिथे समाधानाची अपेक्षा मी कशी करणार. असो  लिहिण्याचे कारण की गेली चार महिने पायांना डोंगरवाट लाभलेली नाही, डोळ्यांना सह्यरांगेतला सूर्योदय-सूर्यास्त दिसलेला नाही. दऱ्या-खोऱ्यातला भरार वारा पिऊन तप लोटल्यासारखं वाटतंय. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पायांच्या दुखण्याचे विस्मरण व्हायला लागले. कधी कधी पायातली तिडिक डोक्यात जाते,पण चार पावले पुढे जायला दोन पावले मागे येण्याचा सल्ला अंतर्मन देऊन जाते. मग एखाद्या शनवाऱ्या पहाटे सिंहगडाची पायवाट तुडवली जाते. पण इथेही उंबरठा ओलांडण्याचे समाधान लाभत नाही,शेवटी सिंहगड चढुन उतरणे हाही एक दैनंदिनीचाच भाग, नाही का !



सह्याद्रीमस्तक साल्हेर -उत्तरार्ध !

7 comments:

          बागलाण मोहीम २०१५… हरगडाचे आत्मकथन 
          बागलाण मोहीम २०१५… साल्हेर पूर्वार्ध - इथुन पुढे 
आजचा दिवस थोडा निवांतच, गड उतरून "फक्त" परतीच्या प्रवासाला लागायचे आहे. पण त्या "फक्त" मध्ये बरेच काही येणार यात काडीमात्र शंका नाही. मला पण जरा उशीराच जाग आली. टेंट मधुन थोडं बाहेर डोकावून पाहिलं तर रोहन, रेश्मा आणि आमीन अजूनही झोपेच्या अधीन होते. गुहेबाहेर फट्ट पडलं होतं. बाहेर आलो तर गारठा मी म्हणत होता. परत जाऊन स्वेटशर्ट टाकलं आणि बाहेर आलो. काल संध्याकाळच्या पावसाने ओलावा जाणवत होता. कालच्या सांजवेळच्या सोनेरी पायघड्यांची जागा आता झुंजुमुंजु झालेल्या ओलसर गवतांच्या दुलईने घेतली होती. समोरच्या गंगासागर तलावातलं पाणी ढवळून निघाल्यावर शांत भासत होतं. ढग केव्हाच निवळले होते, पण राहिलेल्या थोड्याफार पुंजक्यानी पहाटेच्या निळ्याशार आकाशात वेगळाच साज चढला होता. गुहेवरच्या टेकाडावर, श्रीपरशुराम मंदीरावरील भगवा वाऱ्याने फड्फडत होता. त्याच्या पलीकडील नारायणाची उगवती किरणे साद घालत होती.
आज आम्हाला तेच टेकाड म्हणजेच  कळसूबाईनंतरचं सर्वोच्च शिखर सर करायचं आहे. ते कालच झालं असतं पण वरुण राजाच्या अवकृपेने राहिलं. तशी येथे येण्याची माझी ही दूसरी वेळ पण गेल्या वेळेसही दाटलेल्या धुक्यात कुठे चढतोय,काय चढतोय याचा पत्ता नव्हता लागत. परशुरामटोकावरचा भर्रार वारा तेवढा अनुभवला होता. बाकी धुक्यात हरवलेला आसमंत आणि सुंसुं करत घोँगावणारा वादळी वारा. एवढाच काय तो पावसाळ्यातला गडावरचा राबता. हे आताचं,पण भूतकाळात काय ? त्यातल्या त्यात ही श्रीपरशुरामाची तपोभूमी. खरच त्यांनी इथे तपश्चर्या केली होती ! पण ह्या गुहा तर तेच सांगण्याचा प्रयत्न करतात. या गुहेतच त्यांचं वास्तव्य असेल का ? कारण गडावरची राहण्याची ही एकमेव जागा. असं जर असेल तर इथली माती कपाळी लावायला पहिजे कारण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. वरच्या टोकावरुनच म्हणे परशूरामांनी बाण सोडून अपरांताची निर्मिती केली. एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यावर जिंकलेल्या पृथ्वीचं दान करून स्वतःलाच राहायला जागा नव्हती आणि मग सागराला मागे हटवुन त्यांनी कोंकणाची निर्मिती केली. आताचे कोंकणस्थ चित्पावन हे म्हणजेच श्रीपरशुरामांचे वंशज. हजारो वर्षापुर्वी सह्याद्रीची निर्मिती झाली ती या पौराणिक घटनेमुळे की धरणीमायच्या गाभार्यात धुमसणाऱ्या भौगोलिक कारणांमुळे ?, हा एक वेगळा शोधनिबंधाचा विषय आहे. असो. खाली गंगासागर तलावाजवळ त्यांच्या आईचे, रेणुकामातेचे मंदिरही आहे.गंगासागर टाक्याच्या पल्याड सरळ तुटलेला कडा हा धडकी भरवून जातो. गूहेतून टाक्याची भिंत कड्याला चिकटूनच बांधली की काय असे वाटून जाते. बाजूलाच गंगा-जमुना टाके आहे. हे सगळं बघुन या जागेबद्दल ऐकलेल्या,वाचलेल्या आख्यायिकांमध्ये मी हरवुन गेलो होतो.


सह्याद्रीमस्तक साल्हेर - पूर्वार्ध

11 comments:
बागलाण मोहीम २०१५…. हरगडाच्या आत्मकथनापासुन पुढे
दोन वर्षाआधी भरपावसात केलेली साल्हेरची वारी जशीच्या तशी डोळ्यांसमोर आहे. कोसळणाऱ्या सरींची गाज आणि सुंसुं करत वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अजूनही तेवढाच ताजा,अगदी कालच इथून गेल्यासारखा. पण त्याच पावसामुळे अर्धवट झालेली गडफेरी आणि तेव्हाचा राहून गेलेला सालोटा मनात घर करून होता. हरगडही चुकला होता. बागलाणात पुन्हा एकदा भटकायला ही दोन कारणं पुरेशी होती. सह्यमित्रांची जुळवाजुळव करून पावले नाशकाकडे वळवलीच. त्याच भटकंतीचा आजचा दुसरा दिवस उजाडला तो पहाटेच्या पडलेल्या दवाने. स्वच्छ आकाशाची अपेक्षा असताना पहाटेचं मळभ अस्वस्थ करीत होतं. आता पाऊस बरसतो की काय अशी भीती वाटून गेली. कालचं दिवसभराचं हरगडपुराण ऐकून मुल्हेरमाचीवर आमचा मुक्काम पडला होता.गर्द वनराईत तलावाकाठी वसलेल्या माचीवरल्या ऐतिहासिक गणेश मंदिरातला मुक्काम आणि हवाहवासा गारठा, दिवसभराचा सारा शीणच निघुन गेला. पहाटे पहाटे बिनदुधाच्या कोऱ्या-करकरीत चहात लिंबू पिळून घशाला शेक दिला आणि पायगाडी सुरु केली.
माची उतरतोय तसं आकाश निवळायला लागलं. पाऊण तासात मुल्हेरवाडी गाठून वाघांबेच्या रस्त्याला लागलो. बागलाणातलं एक उपेक्षित दुर्गरत्न सर झाल्याचं समाधान वाटत होतं, त्यात जिपड्यात लावलेल्या टिपिकल नाइनटीजच्या गाण्यांनी तर तोंडावर पाणी न मारता एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. जीपची बाल्कनी आमच्या सॅकनी गच्च झालेली अन् त्यातच थोड्याफार जागेत आमची  चौकडी एकदम फिट बसली होती. हरणबारीच्या डाव्या बाजूने गेलेला निवांत रस्ता आणि बहुदा पहाटेची राहिलेली थकबाकी गोळा करत पुढ्यात बसलेला रोहन केव्हाच गारद झाला होता. पण त्याच्या दुर्दैवाने  वाघांबेचा रस्ता काही लांब नव्हता. जिपड्यातून उतरलो तर गावकऱ्याच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झालेला. दोन वर्षापूर्वीच्या पावसाळी आठवांना उजाळा मिळाला. सर्वदूर पसरलेल्या हिरवाईत, वरून टपोऱ्या थेंबांचे तडाखे सोसत आम्ही खिंडीकडची जवळ केलेली वाट आणि धुक्यात हरवलेले साल्हेर-सालोट्याचे गडमाथे आठवून गेले.यावेळेला मात्र गावातूनच त्यांचं स्पष्ट दर्शन झालं. खल्लास ! आकाशास भिडलेले दोन्ही गडमाथे पुढच्याच क्षणी काळजास भिडले.