कारवीला घोराडेश्वर ट्रेकला घेऊन गेलो असताना पार्श्वभागावर जोरदार आपटलो तेव्हा ती खांद्यावर बसली होती. काही मिनिटं मी आणि ती, दोघंही तसेच शांत बसलेलो, काही वेळाने तीच म्हणते कशी, "बाबा, हळू चालत जा ना? त्या दिवशी काही जाणवलं नाही, पण दुसऱ्या दिवशी डाव्या बाजूचा बरगड्याचा भाग जाम दुखत होता, कदाचित डावा हात टेकवल्यामुळे झालं असेल. पण आता प्रश्न होता, तो येणाऱ्या महाराष्ट्रदिनी अमितने आखलेल्या ट्रेकचा. हे दुखणं निस्तरायला हवं होतं, नाहीतर ट्रेक बोंबलला असता. पण गुरूवार येईपर्यंत सुदैवाने ते दुखणं बरं झालं आणि जीव भांड्यात पडला. मे महिन्याचे घाटवाटांचे ट्रेक म्हणजे मेजवानी असते, उन मी म्हणत असलं तरी रानमेव्याची, आंब्याची, करवंदाची नुसतीच चंगळ असते, ही मज्जा चुकवून कशी चालणार ? आणि अजून एक म्हणजे गेल्या वेळेस बोचेघोळने माझी त्रेधा उडवली होती, इतका सुंदर ट्रेक मला अनुभवता आला नव्हता, त्यामुळे निसणीसोबत बोचेघोळचीही थकबाकी गोळा करण्याची नामी संधी मी थोडेही दवडणार होतो.
पुढ्यात रायगड आणि लिंगण्याच्या अवतीभवती उतरणाऱ्या, चढणाऱ्या ह्या घाटवाटांची भटकंती नेहमीच धमाल आणतात. म्हणजे लहान मुल कसं?, एखादी वस्तु त्याच्या अवतीभवती फिरून निरखून बघतं, तसं काहीसं इथल्या भटकंतीमध्ये होतं. अरे, इथून लिंगाणा असा दिसतो, तिथून कसा असेल? तिकडे जाऊन बघायचं? चला, तिकडून बघू, नुसतीच धमाल! आणि हा नजारा अर्थातच प्रत्येक वेळी भन्नाट आणि वेगळाच असतो. रायगड प्रभावळीतल्या ह्या भागातल्या वाटांचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या मुख्य सह्याद्रीला खेटून असलेले, काहीसे सुटावलेले डोंगर आणि त्यांचा सुसंगत आकार, लिंग्या घाटातला कुर्डुगड, कावळ्या घाटातला कोंकणदिवा, वारंगीचा कणा(ईथे किल्ला किंवा पहाऱ्याची जागा का नसावी? हा मला पडलेला प्रश्न), आणि बोराटा नाळेतला लिंगाणा! पैकी लिंगाणा, कुर्डुगड आणि कोंकणदिवा यांच्या पोटात गुहा खोदलेला आढळतात, वरचा भाग सुळक्याचा तर गुहेच्या समांतर जागा माची सारखी. कणा डोंगरावर जाऊन बघायला पाहिजे कधीतरी. तर हा लिंगोबाचा डोंगुर म्हणजेच लिंगाणा, या कोपऱ्यातून कसा दिसेल, त्या कोपऱ्यातून कसा दिसेल, या प्रश्नांची उत्तरं शोधतच या वाटांना भिडलं जातं. गेल्याच भटकंती मध्ये बोराटा आणि सिंगापुर नाळेची उजळणी झाली होती, कितीही वेळा केली असली तरी नवा अनुभव घेत, जुन्या आठवांना उजाळा देत मी इथे नेहमीच रमतो. नाळेतला सुखद गारवा हवाहवासाच वाटतो. पहिल्यांदा केलेली सरळसोट दापोलीत उतरणारी भटकंतीही डोळ्यांसमोर येते. आणि कितीही म्हटलं की मोहरीतून नाळेतून उतरलं की आपल्याला पाने या गावात जायचं तरी, काहीतरी कारण निघून पाने गावात अजूनपर्यंत मुक्काम घडला नव्हता. त्या मुक्कामाची वेळ आता आली होती. निसणी आणि बोचेघोळचा बेत आखून आमची गँग पाने गावात पोहोचली होती तेव्हा रात्रीचे दोन वाजले असतील त्यामुळे लगेच गावातल्या राम मंदिरात तडक पथाऱ्या पसरून आडवे झालो.
पहाटे जाग आली तेव्हा, लिंगाणा आणि रायलिंग अगदी एकरूप झाल्यासारखे दिसत होते. त्यांच्या आडून सूर्यनारायण वर येत होता. पावणे सहाला ट्रेक सुरू करायचं ठरलं असलं तरी ते शक्य दिसत नव्हतं, कारण रात्री झालेला उशीर आणि राहिलेली झोप. तरीही पटापट आवरून ब्रेडबटर वर ताव मारून पायगाडी सुरू केली तेव्हा सव्वासात झाले होते. बाजूच्याच घरून पाण्याची कळशी आली होती, पाणपिशव्या भरून वाटेला लागलो, पुढे जात डावीकडे सह्याद्रीच्या चढाईला लागणारच तोवर पिकलेल्या आंब्याचा पाड पुढ्यात आला. हावरटासारखी सगळी पोरं त्यावर तुटून पडली. आंब्याच्या हा थांबा कितीही गोड वाटत असला तरीही आवरतं घेत आम्ही चालायला लागलो. चढाईचा पहिला दम ओसरला आणि लयीमध्ये पावलं टाकत, वाळलेली पानं चुरचुरत एका निवांत झाडीत गारेगार दगडांवर सगळ्यांनी बुड टेकवली. दिग्याला जाणारी दोन म्हातारी अन् एक तरुण निसणी चढून जाताना भेटली, वर कुठल्यातरी सत्कार्याला निघाली होती, परत भेटू या आश्वासनाने आम्हीही चालू लागलो, चांगला मोठा ब्रेक झालेला. महेशच सुरू झालेलं, ताक करूया का? पुढे करूया, म्हणत झाडीतून पुन्हा उघड्यावर आलो. रायलिंग आणि लिंगाण्यामधली दरी हळूहळू वाढत, तिथे आता खिंड स्पष्ट दिसत होती. आम्ही अजूनही खिंडीच्या बरोबरीत आलेलो नव्हतो. तासाभराने अजुन एक ब्रेक घेऊन छोटा पोटोबा उरकला, रणरणत्या उन्हाळ्यात झाडी मस्त बहरली होती, सगळीकडे हिरवेगार, कित्येक झाडांना नवी पालवी फुटलेली, मधुन मधुन गार वाऱ्याची झुळूक तापलेल्या देहाला दिलासा देत होती. निसणीची खिंड आता जवळ दिसायला लागली.
बरोबर पुढच्या एका तासात गँगने परत सावली बघून बुड टेकवली आणि ताकाचा मुहूर्त लागला. महेश ने थर्मासमध्ये व्यवस्थित दही आणलं होतं. घुसळायला रवी पण, सोबत सगळा जामानिमा. दादूंना ताक नको होतं, त्यामुळे नेहमीप्रमाणे विजूकडे विचारणं झालं, दाद्या, काहीतरी खारं(खाऱ्या सवयी, अजुन काय) काढ की? विजुने खारी बुंदी बाहेर काढली आणि लागलीच ती ताकात घालुन बुंदी-रायता येथेच्छ सगळ्यांनी हाणला. सकाळी उठल्यापासून मला हा ट्रेक वाटतच नव्हता, आपल्याच तालात चाललोय, थांबलो, बसलो की पुढ्यात येईल ते हाण, या अर्थाने ही खादाडीच चालली होती. चालतोय कमी खातोय जास्त! मध्यान्हीला आम्ही बरोबर नाळेच्या आधी असलेल्या मोठ्या दगडात खोदलेल्या पावट्या जवळ पोहोचलो. थोडी चढाई करून अजून वर आलो तर आता मात्र लिंगाणा खिंड खाली गेली होती. काही वेळाने रायलिंग दृष्टीआड झाला. पुढ्यात खाली काळनदीचं पाने खोरं, आता भर उन्हाळ्यात अर्थात कोरडे ठाक. वरच्या टप्प्यात दाट हिरवाईतली वाळीत पडलेली जवळजवळ इतिहासजमा झालेली लिंगणमाची. नाणेघाट किंवा तत्सम घाटवाटांसारखा इतिहास नसला तरी, इथल्या मातीला अनाम शूरवीरांचे पाय नक्कीच लागले असतील. रायगड सारख्या महत्वाच्या किल्ल्याजवळील ह्या वाटा म्हणजे आणीबाणीच्या वेळी रसद, कुमक पुरवण्याचा किंवा पळून जाण्याचा गुप्त मार्ग असु शकतात, शिवरायांचा गनिमी कावाही सह्याद्रीच्या ह्या अश्याच वाटांमधून चालत असे. असो, माहिती इतिहास नसला तरी गावकऱ्यांकडून ऐकीव स्वरूपातल्या, किंवा जुने जाणते म्हातारे खोड अजूनही याचा वापर करून ह्या वाटा जिवंत ठेवण्याच्या प्रयत्न करताना दिसतात. आणि शेवटी आपल्यासारखे भटके आहेतच की!
निसणी म्हणजे दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या! ह्या माहितीचा उलगडा अमितकडून झाला. नाळेतला शेवटचा टप्पा, उभा चढ येंगुन माथ्यावर पोहोचलो आणि ऐसपैस जागेवर, झाडोऱ्यात पुन्हा एकदा बसकण मांडली, काही मंडळींनी तर कपडे सुकवायला ठेवली, ती सुकेपर्यंत अजुन एक खादाडी म्हणजेच कलिंगडाचा फडशा पडला. आता इथुन पुढ्यात असलेली छोटी दरी उतरून आणि परत चढलो की सपाटीवरून जात पुढे गेलो की माथ्यावरच गाव चांदर! पण खालच्या टप्प्यातून, उजव्या बाजुला सह्याद्रीची खोल दरी खुणावून जाते, आणि वरच्या वाटेवरून ती अजूनच खुलत जाते. लिंगाणा दुर गेलेला असतो, रायगड अर्थात निसणीमधून कधीच गायब झालेला असतो. रायलिंगच्या वरच्या माथ्यावर दुरवर मोहरीतला टॉवर खुणावत असतो. निसणीची खोच तर एकदम छोटी वाटत होती, ती खिंड असेल यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. खिंड सोडल्यावर दोन डोंगरांना वळसा घालुन लयी अंदर (अमितच्या भाषेत) असलेल्या चांदरमध्ये पोहोचलो. गावच्या पाण्याची सोय म्हणुन झऱ्याच्या पाण्याची छान विहीर बांधुन काढलीय. तोंडावर पाणी मारून, गावातल्या एका पडवीत सगळ्यांनी बस्तान मांडलं. दुपारचे अडीच झाले होते, पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. घरून आणलेली शिदोरी संपवुन दिल्या सगळ्यांनी ताणुन. संध्याकाळी कड्यावरून क्रांतीचा ड्रोन उडवून झाला, तरी अजून भरपुर वेळ हाताशी होता. एवढे निवांत, अगदी अंधार पडायच्या आत, अक्षरशः दुपारी गावात पोहोचून निवांतपणा मिळेल असे मोजकेच ट्रेक होतात, त्यामुळे सर्वांनी अमितचे मनोमन आभार मानले. अंघोळीनंतरची कॉफी काय किंवा जेवणाआधीच सुप काय, सगळी अगदी सुशेगाद! रात्री चुलीवरल्या मसालेभाताचा फडशा पाडून झोपी गेलो.
आज बोचेघोळ उतरायची. दिवसाची सुरुवात अर्थातच खादाडीने झाली. संजूने छान उपीटाचा घाट घातला होता. दादूंनी बनवलेल्या आल्याच्या चहावर सगळ्यांचा डोळा होता, राहिलेला कसाबसा मिळवुन बाकीच्यांनी त्यांचा त्यांचा बनवुन घशाला शेक दिला. सगळं आवरून निघालो तेव्हा उन्हं वर आली होती. बोचेघोळ उतरायची असली तरी घाटमाथ्यापर्यंत जायला एक चढाई होतीच, तिथपर्यंत सांगळे मामा सोबत करणार होते. निघाल्यावर वाटेवर परत एकदा फोटोसेशन झालं. धनेशाचं अधिवास असलेल्या उंच आणि टुमदार झाडाने लक्ष वेधुन घेतलं, आदल्या दिवशी मोठा धनेश दिसल्याचं सूरज म्हणत होता. निसणीची वाट डावीकडे सोडुन उजवीकडची खानूकडे जाणारी वाट धरली आणि साधारण निघाल्यापासून तासाभरात बोचेघोळच्या माथ्यावर येऊन पोहोचलो. येथुन पहिल्यांदाच वारंगीच काळ खोरं आणि कण्या डोंगराने दर्शन दिलं. सांगळे मामांचा निरोप घेतला आणि पोरांनी आजची पहिली बसकण इथेच मांडली. सफरचंदाचा ब्रेक झाला आणि पुढे उतराईला सुरवात झाली.
डाव्या बाजुला खाली दरीत हिरव्या पाचूसारखा भाग ऊठुन दिसत होता, तेव्हढ्यात इथे खाली काळकाईच ठाणं आहे, यावर पोरांची चर्चा सुरू होती, कदाचित त्याच पाचूमध्ये ते ठाणं असावं. आणि तसं असेल तर मग सुंदर देवराईची जागा असावी. थोडं खाली उतरून आता आम्ही समांतर निघालो होतो माथ्यावरच्या शिखरांना डावीकडे ठेऊन. खालून, कोकणातून ही आभाळात घुसल्यासारखी वाटतात, आता अगदी आपल्या आवाक्यात असल्यासारखे. संजूने गायनाळची खिंड दाखवली. रानव्याचा आनंद घेत,तेथून खाली उतरलो की मोठा आंबा लागतो, त्याच्या उजवीकडे वाट गेलीये काळकाईच्या देवराईत. प्रवेश केल्या केल्याच देवराईच्या खुणा आढळतात, सर्वात महत्त्वाचं देवराई मध्ये एखाद्या नदीचा उगम होत असतो, किंवा कमीतकमी छोटेखानी ओढा तरी. इथे तर मोठा ओढा आणि पुढे जाऊन काळ नदीमध्ये कोसळणारा मोठा धबधबा दिसतो, अर्थात उन्हाळ्यात कोरडा . इथल ठाणं म्हणजे एका मोठ्या दगडाला शेंदुराचे ठिपके लावून, चार पाच घंटया आणि बाजूलाच ठेवलेला नंदादीप. गावकऱ्यांची भाबडी श्रद्धा, पण हे रान टिकवायला पुरेशी. कमाल जागा आहे! थोडा वेळ निवांत बसलो, मोठ्या झाडांची गारेगार सावली सुखावुन गेली. हाताशी वेळ असता तर रानव्यात घुसुन निवांत हिंडलो असतो. इथून सुंदरशी वाट पण गेलीये वरच्या वस्तीला.
देवराईतून बाहेर पडून परत बोचेघोळच्या वाटेला लागलो. त्यासाठी वरच्या वाटेला न जाता, खालूनच बायपास आहे, तसंच पुढे चालत गेलो की वाट झाडीत घुसते. तेथून पुढे सुंदर नागमोडी वळणं घेत खाली उतरते, उजव्या बाजुला मघाच्या देवराईतून कोसळणाऱ्या पाण्याच मोठ्या धबधब्यात रूपांतर झालेलं आढळतं, पावसाळ्यात हा तुफान असणार. यात शंकाच नाही. त्याच ओढ्यात खाली, पाण्याच्या प्रवाहाने तयार डोह तयार झालाय, अनपेक्षितपणे त्यात पाणीही होतं. कदाचित तेथुन माणसांचा वावर नसल्यामुळे असेल. वाळलेल्या कारवीमधुन वाट काढीत आता वळसा घालुन डावीकडे वळतो तोच रायगडाचा सुंदर नजारा खुला झाला, अगदी स्पष्ट, नगारखाना, जगदीश्र्वराचे मंदिर एकदम नाकासमोर असल्यासारखे, टकमक टोक निजामपूरात कोसळत होतं, तसंच खाली काळ नदीचं पात्र अधिक जवळ वाटुन गेलं आणि ज्या घळीमुळे या वाटेला नाव पडलंय, ती बोचेघळ आता समोर दिसत होती.
घसरयातून सावकाश वाट काढीत खाली झाडी घुसलो, काही वेळाने पोटोबाही उरकला. ह्या दाट झाडीतून खाली उतरलो की उजवीकडची वारंगीची वाट सोडायची आणि उजवीकडून आपण पोहोचतो हेडमाचीवर. ही पण लिंगणमाची सारखीच उठलेली, एका घराच्या मागे सह्यकडा तापून निघाला होता दुपारच्या उन्हात, पण आंब्यांना मात्र वानवा नव्हती. अक्षरशः दिसेल त्या पाडावर वानरसेना नुसतीच तुटून पडत होती. काळ नदीचं पात्र जवळ येतंय तसं भट्टीत आत घुसल्यासारखं वाटत होतं. लिंगाण्यानें परत दर्शन दिलं, नदीपात्रापलीकडे रायगड खुणावत होता. खादाडीचा समारोप म्हणुन कलिंगडाचा फडशा पाडून झाला. पाने गावात पोहोचलो, आवरून निघालो ते तडक काळ नदीच्या डोहात, वरून गरम आतून गार पाण्यात निवांत अर्धा एक तास पाण्यात डुंबून झालं.
(Comment box or wadaskarsandip@gmail.com यावर तुमच्या प्रतिक्रिया कळवु शकता )
या ब्लॉगद्वारे एकच विनंती, संपुर्ण सहयाद्री तुमच्या भिंगऱ्या लागलेल्या पायांसाठी मोकळा आहे, भटकताना मात्र जबाबदारीचे भान ठेवा. तुम्ही जे अनुभवताय, तुम्हाला वाटत असेल तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, त्यांनाही अनुभवता यावं तर खालील सूचनांचे काटेकोर पालन करा...... मोठ्या संख्येने जाण्याचे टाळा, गोंगाट टाळा, प्लास्टिक टाळा........ निसर्गाचा मुक्तपणाने आस्वाद घ्या,निसर्गालाही मुक्तपणाने जगु द्या !


संदीप,
ReplyDeleteधमाल आली रे ट्रेकला आणि तू वर्णन पण तसंच केलं आहेस.... असे निवांत ट्रेक म्हणजे सह्याद्री अनुभवायची एक वेगळीच संधी असते. त्या काकांच्या घरातील प्रत्येक क्षण हा आनंदी होता...परत भेटू अशाच निवांत ट्रेकला... तू मात्र लिहीत रहा...
धन्यवाद दादु, हो घराची पडवी! अविस्मरणीय 😍
Deleteसंदीप खूप सुंदर वर्णन केल आहे. भारी ..आवडलं आपल्याला भेटू परत दऱ्या खोऱ्यात 👌👌👌
ReplyDeleteनक्कीच! धन्यवाद 🙂
DeleteSandy.. excellent write up.. Amit
ReplyDeleteधन्यवाद अमित!😍
Deleteअप्रतिम 😍
ReplyDeleteधन्यवाद 🙂
Delete