साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग !

1 comment:

पुण्याहून गृह-भोजन मुहूर्त (जेवणं वगैरे घरातूनच आटोपून,नंतर रस्त्यात वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.ही वेळ साधारण रात्रीचे 10-10:30 ची असते) साधून निघालेलो आम्ही! जेवणं झाली असली तरी चहाची तेवढी तल्लफ उगाचच जाणवत होती. साताऱ्यापासुन चहा - चहा करीत कोल्हापुर गाठुन बावडा घाट उतरायला सुरूवात झाली तरी चहाच्या टपरीचा कुठे मागमुसही नव्हता. शेखऱ्याचं आपलं चाललेलं "काय सँडया ,चहा नाय का नाश्ता नाय,काय हाय का नाय ? तर हा शेखऱ्या,त्याचं कुटुंब मोनाली वहिनी आणि प्रसन्ना,त्याचं कुटुंब पुजा वहिनी हे दोन जोडपी आणि प्रसाद,केसागर,मी असे तीन अतरंगी अशी सप्तरंगी टोळी आणि आमचे ड्रायव्हर काका असं आठाचं धावतं विश्व रात्रीच्या मिट्ट काळोखात गगनबावडा घाटातली वेडी- वाकडी वळण पार करत निघालोय.मोनालीची त्यांच्या नुकताच मिळालेल्या आणि प्रतिष्ठित क्लाइंट,अशा टिकेकरांवरील स्तुतिसुमने उधळून झाली होती. ह्या केसागऱ्याला झोप आवरत नव्हती,कशाला उगीच एका बाणात दोन पक्षी मारायचे प्रयत्न? जीवघेणी वळणं,सीडी प्लेयरमध्ये मध्येच लागणारं एखादं भन्नाट गाणं, गप्पा- टप्पाच्या नादात स्वारी निघाली होती कोंकणात. किर्र अंधारात वाऱ्याशी सलगी करणारा गाडीचा वेग आणि गप्पांचा ओघ मंदावला की समजायचं,काकांनी साइड दिली. मग उगाचच घाटात गाडी चालवणे म्हणजे ड्रायव्हर कमालीचाच पाहिजे वगैरे वगैरे प्रतिक्रिया ! कीलकिल्या डोळ्यांनी घाटाचं निरीक्षण करता करताच गगनगड खुणावत गेला.एका मोठ्या वळणावर तर एकदम वरंधा घाट डोळ्यांसमोर आला.
खुप दिवसांनी निघालो होतो कोकणात हिंडायला.जवळ जवळ दोन एक वर्षांनी! अधुनमधून हरेश्वरला जाऊन आलो  होतो पण अशी सुसाट भटकंती फार दिवसांनी. मला अजूनही आठवतं नऊ - दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कोकणात गेलो होतो,आमच्या कोंकणवेड्या कल्याणीताई सोबत. तेव्हा खोतकाकुंनी बनवलेली सोलकडी,ही अशी पेल्यानी ओरपली होती आणि नाकपुड्यातून डोक्यात शिरलेले मासे (तेव्हा मी खात नव्हतो,पण इथे आल्यावर बटाट्याची भाजी.....छे छे,हे पटलंच नाही) आणि त्यांचा सुवास असा भिनलाय की कोकणाच्या प्रेमातच पडलो आणि तेव्हापासून या सागरी मेव्याला मी कधीच अंतर दिलं नाही. खोत काकांचं बांबु आणि पोफळी वापरुन बनवलेलं पारंपारिक कोंकणी घर, घरामागुन नारळाच्या दोन बागा ओलांडल्या की थेट पांढरी वाळू. पहिल्यांदा अनुभवलेला सागरी किनारा,सकाळी सकाळी ताज्या ताज्या निरेची आलेली झिंग, आणि मग समुद्रात केलेली मस्ती,उगाचच प्रत्येकाच्या अंगावर पाणी उडवत मज्जा करायची. मग वाळूचे कण आणि खारवटलेले अंग घेऊन परतायचं तर पोफळीच्या बागेतली विहीर आपल्यासाठी सज्ज असायची. गार पाण्याने मस्त आंघोळ झाली की फ्रेश. पेशवेकालीन हरेश्वराचे दर्शन घेऊन यायचं आणि जिभेला वाट मोकळी करून दयायची. मग काय, होऊ दे खर्च,येऊ दे पॉपलेट- सुरमई,झिंगे अन् बांगडा! ही अशी सगळी चंगळ.

बागेतल्या मुंजोबाच्या गोष्टींवर रात्री झोपताना टरकल्याचंही आठवतं. ह्यो माका कोंकण,तुका कसा वाटला ? हे कोणी विचारत नाही,कारण विचारण्याला काही अर्थच नसतो. कोंकण म्हणजे महाराष्ट्राचं सौंदर्य! इथली संध्याकाळची गार वाळू,नारळा- पोफळीतला गारवा,वेड्या- वाकडया पायवाटा,सड्यावरच्या आंबा अन् काजूच्या बागा,इथला हवाहवासा निसर्ग म्हणजे अप्रतिम! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथली माणसं अन् त्यांची रसाळ कोंकणी भाषा. इथं आल्यावर मला उगाचंच पुलंच्या अंतूशेटना भेटायची फार इच्छा होते,कोण जाणे "ओ गोविंदभट,टाकतोस का दोन डाव?" अशी हाक एखाद्या गल्ली- बोळातून ऐकू यावी.

हे सगळं आठवत असताना,मी ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलोय याचा विसर पडला आणि डुलकी लागली. तेवढ्यात ती ड्रायव्हर काकांनी परतवली. "ही डुलकी जर ड्रायव्हर काकांनाच लागली असती तर!" या कल्पनेने माझी झोपच उडाली. पहाटेच्या ब्राह्मणमुहुर्तावर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. एक - एक कटिंग चा ब्रेक झाला आणि परत गाडीत बसायला लागलो तर शेखऱ्या बाहेर येऊन मॉर्निंग वॉक करायला लागला,म्हणे,"तुम्ही चहा घेणार ना ?" अहो वहिनी सांगा त्याला,चहा घेऊन निघण्याची वेळ झालीये. काय हो वहिनी,हा झोपेत चालतो की काय ? नाही आपलं विचारून घेतलेलं बरं,एखाद्या वेळेस जायचा आपला निषिद्ध जागा समजून कड्यावर! शेखरच्या आइसब्रेकरने सगळ्यांच्याच झोपा उडाल्या आणि कोकणातल्या आल्हाददायक वाऱ्याची झिंग प्रत्येकाच्या डोक्यात शिरायला सुरुवात झाली. प्रसाद, कुठुन करायची सुरवात? जाऊ दे वेंगुर्ल्याला.वेंगुर्लाsss!

सात- सव्वासातच्या सुमारास वेंगुर्ल्याच्या बंदरावर पोहोचलो. कोळी बांधवाची सकाळची धामधूम चाललेली. मासेमारीला निघणाऱ्या होड्या युद्धावर निघालेल्या खिंकाळणाऱ्या घोड्यांसारख्या समुद्राच्या लाटांवर हुंदळत होत्या. सकाळच्या कोवळ्या किरणास समुद्रापर्यंत पोहोचायला वळवाचा मज्जाव चाललेला,अशा प्रसन्न वातावरणात कॅमेरा सुरु करावा तर महाशयांची तब्ब्येत ठिक नसल्याचं जाणवलं. पुरता हीरमोड झाला. आता कॅमेराशिवाय पुढचे दोन दिवस जगायचे कसे,हा प्रश्नच पडला. तरीही आपला एक टिपून घेतला. भोगवे बीच कडे मार्गस्थ झालो, तेव्हा पोटात आग पडली होती. आणि नेहमीप्रमाणे         आमचा दादया, प्रसन्न "वडापाव बघ रे,कुठे मिळतो का ? या माणसाला हॉटेल ताज मध्ये जरी नेऊन सोडला ना तरी हा आपला वडापाव काही  सोडणार नाही. कारण काय, तर म्हणे " तो कुठेही सहज मिळतो. "

शेवटी रस्त्यालगतच्या टपरीवर थांबलो. तर हा कोंकणी वडापाव. पावाची साइज़ बघून तर हसुच आवरत नव्हतं. आणि जेव्हा वड्याने पावात प्रवेश केला तेव्हा तर त्या वड्याचा पोस्टमाटमच करून टाकला पोरांनी! अहो,दिवसेंदिवस दिवस आकाराने कमी होत चाललेल्या पुण्यातील जोशी वडेवाल्यांच्या वड्यानी जर हे प्रकरण वाचलं असतं तर त्यांचीही मान शर्मेने खाली गेली असती हो! मग कोकणात पाव केवढयाला? वडा एवढा छोटा का ? आणि मग भजी केवढी असतात? वगैरे वगैरे. तेवढ्यात केसागर ने सॅंपल चा सांभार करून दोन वडे गटकावले. म्हटला," मज्जा आली ". दोन - दोन वडापाव पोटात ढकलून पुढचा प्रवास सुरू झाला.

पाऊण तासात भोगवेचा समुद्र किनारा गाठला. ड्रायव्हर काकांना आता कुठे विश्रांती मिळाली. त्यांनी आपली सोयिस्कर जागा बघुन दिली ताणून.आम्ही आमच्या पायांना वाळू मोकळी केली. दगडांवर आपटणाऱ्या लाटांचा आवाज,फेसाळणारं पाणी आणि सागराकडे झुकलेल्या नारळाच्या झाडांनी फ्रेम मध्ये जीव आला आणि खछ्याक आवाज करून कॅमेरा मध्ये बंदिस्त झाला. कॅमेरा थोडाफार साथ देत होता. निवतिच्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेला छोटासा पण रम्य किनारा,जिथे कर्ली नदी सागरास येऊन मिळते. कर्ली नदीच्या खाड़ीपलीकडे तो देवबाग बीच.अलीकडे नारळाच्या झाडांनी गच्च झालेलं रान म्हणजे त्सुनामि बेट. आणि पार पल्याड तो,दिसतोय का ? भक्कम तटबंदीचा कोट,होय तोच. तो आपला स्वराज्याचा जंजीरा! किल्ले सिंधुदुर्ग!! विशेष असा की या रमणीय सागरी किनाऱ्यावर फक्त आम्हा साताची तुकडी. मस्त फोटोसेशन झाल,पांढऱ्या वाळूत सगळी दंगामस्ती झाली. वाळू झटकून गाडीत बसलो आणि आमच्या या सागरी मोहिमेतल्या पहिल्या किल्ल्याकडे रवाना झालो.


परत सड्यावर आलो तेव्हा उन्ह वाढत चाललेलं.पण दुतर्फा असलेल्या आंब्याच्या अन् काजूच्या बागानी खुष केलं. एखाद्या जंगलात भरदिवसा असल्यासारखी रातकिडयांची किर्र मन सुखावुन गेली.असं वाटत होतं उतरावं गाडीतुन आणि द्यावी थेट ताणून, एखाद्या आंब्याखाली. थोड्याच वेळात किल्ले निवतिच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. चढायला सुरूवात केली तेव्हा टोचणरं उन्ह मी म्हणत होतं.करवंदी आणि काटेरी झाडोरा बाजुला सारुन गडमाथ्यावर प्रवेश केला. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी काही जण सरसावले अन् बाकीची करवंदीवर तुटून पडली. पण सांडया,राजमाचीची सर नाय,शेखर. अजुन कोण? पार तुंगर्लि येईपर्यंत त्यानेच जास्त चापले होते, पण शेखर्या तिथल्या खेकडयांनी तुला अजूनही माफ केलेलं नाही,बरं ! असो,निवतिच्या माथ्यावरून पश्चिमेला असीम सागराने सुरेख दर्शन दिले. डोईवर तळपणार्या सूर्याची किरणे झेलत पहुडलेला समुद्र शांत भासत होता. किल्ल्याच्या पायथ्याशी झाडी पलीकडे,समुद्रातून अवतरलेल्या कातळकड्याने लक्ष वेधून घेतले. निळ्याशार पाण्यावर त्याचा लालसर रंग उठुन दिसत होता. इतिहासाचा वेध घेत आम्ही किल्ल्यावरचा फेरफटका सुरू ठेवला.



जांबा दगडापासुन बांधलेल्या पडक्या वाड्याचे  आणि तटबंदीचे अवशेष पाहून शिवरायांच्या दुर्गबांधणीची आठवण झाली. पण हे बांधकाम शिवकालीन नसावं. या किल्ल्याचा तसा इतिहास ज्ञात नाही. हाकेच्या अंतरावरील मालवणच्या किल्ल्यामुळे निवतिला देखील महत्व असावे,पण किल्ला स्वराज्यात असेल तर! कदाचित टेहळणीची जागा म्हणून. करवंदांचा आस्वाद घेत उत्तर बुरुजावर पोहोचतो तर भोगावेच्या सुंदर किनार्याने डोळ्यांचे पारणे फिटले. माथ्यावर गर्द हिरवाईने नटलेलं रान आणि पायथ्याला पांढऱ्या शुभ्र वाळूचा रुपेरी पट्टा! निवतिची सफर सार्थकी झाल्यासारखी वाटली. फोटोचा नुसता क्लिकक्लिकाट झाला. माघारी फिरुन उतरलो तेव्हा गाडीची पार भट्टी झाली होती. पुढच्या प्रवासाला लागलो,आता मालवण गाठायचं.

गाडी सुरू झाली,गार वारं लागायला सुरुवात झाली. तेव्हा कुठे गाडीतलं तापमान जरा कमी झालं. पण मोनालीचा " उपवास " हा विषय ऐरणी वर  आला आणि परत तापलं. ते निवळण्याची औपचारिक जबाबदारी अर्थातच मी स्वीकारली. कसं आहे ना,वहिनीसाहेब ? आपण एकदा का शिवापूर फाट्यावर सातारयाचा टोल फाडला (शिव्या देत का होईना !) की उपास- बिपास काही नसतं. उपवास पुण्यात,कोकणात कुठून काढला उपवास ? तो पेंगतोय बघ,केसागर. अरे किती झोपतो,फिरायला आलास की झोपायला ? हां.तर मी काय म्हणत होतो," इथे घासफूसवाल्यांचे हाल होतात तर उपासकांची काय बिशाद?" वहिनीसाहेबांचे समाधान झाल्यासारखे वाटले. त्यानंतर मासे आणि त्यांचे प्रकार यावर एक छान चर्चासत्र सुरू झालं. गप्पांच्या नादात परुळ्यात शिरलो आणि रस्त्यालगतच एक छान टुमदार टिपीकल कोंकणी मंदिराच्या दर्शनाने आमची गाडी कडेला घेतल्या गेली. बहुतेक अदिनारायणाचे मंदिर,प्रसाद पुटपुटला. हो तेच. मोठा सभामंडप,आत रुंद गाभारा,त्यात विसावलेली अदिनारायणाची गोमटी मूर्ती. आंघोळ न करताच एकदम प्रसन्न वाटलं. बाकी कोंकणवासियांचं आराध्य दैवत म्हणजे बाप्पा! तेवढ्याच भक्तिभावाने,उत्साहाने राखलेलं आणि रंगरंगोटी केलेलं मंदिर म्हणजे अप्रतिम! चला,गाडीत जाऊन बसलो, उर्वरीत मत्स्यपुराण सुरू झालं.मालवणात येऊन धडकलो तेव्हा दुपारचे दोन वाजले होते.


 रस्त्यावर पर्यटकांची आणि प्रवासी गाड्याची झुंबड उडाली होती. गर्दीतून वाट काढत एकदाचं आधी ठरल्याप्रमाणे हॉटेल सी- व्यू रिज़ॉर्ट मध्ये चेक इन झालो आणि पाहिलं काम म्हणजे मेनू कार्ड चेक! पण जेवढ्या उत्साहाने ते हातात घेतलं होतं,तेवढ्याच वेगाने ते भिरकावलं,काय रे हे रेट !! मासे रद्द आणि सर्वानुमते कोंबडी सत्कारणी लावायची ठरवलं. खानपान झालं. खुर्च्या टाकून वाळूत ( तारकर्ली बीच वरची वाळू थेट रिज़ॉर्ट मध्ये अंथरली होती ) गप्पा मारत बसलो. नंतर वामकूक्षी घेण्याच्या बेतातच होतो की दादामहाराजांनी आज्ञा सोडली. " चला सिंधुदुर्गला जायचंय ना ?" नारायणराव तरी अजून दोन- अडीच तास ड्यूटीवर होतेच. मालवणच्या किनार्यावर पोहोचलो तेव्हा पर्यटकानी धुमाळ गजबजला होता. हौशी पर्यटकांच्या कॅमेरांचा क्लिकक्लिकाट आणि दुकानांची वर्दळ. त्यातच मालवणच्या धक्क्यावर उभ्या असलेल्या बोटी लोकांना खचाखच भरवुन किल्ल्याकडे रवाना होत होत्या. अशाच बोटीमधून आम्ही कुरटे बेटावर पाय ठेवला तेव्हा सूर्य पश्चिमेला कलायला सुरुवात झालेली. समुद्राच्या लाटा तटबंदीवर आदळआपटत होत्या. त्यांचा आवाज. पुढ्यात धक्क्याचं काम चाललेलं,समुद्रात भर टाकणारी माणस,त्यांचा कल्लोळ. रहाटगाडा जोमाने चालला होता. त्यातच समोरच्या पद्मगडागडाची दुर्दशा हेलावणारी होती.


 मुख्यद्वारातून आत प्रवेश केला आणि उजव्या बाजूला भिंतीमध्ये एका बंदिस्त असलेल्या चौथरावर थबकलो. असं म्हणतात गडाचं बांधकाम झाल्यानंतर महाराजांच्या एका हाताचा आणि एक पायाचा ठसा इथे उमटऊन घेतला होता. त्याचं निरीक्षण झालं,तटबंदिवरुन चालायला सुरुवात केली. पाउले पुढे पडत होती,मन मात्र इतिहासाचा मागोवा घेण्यास रमलं. " आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांगच, ज्यास अश्वबल त्यास पृथ्वी प्रजा आहे. तदवतच ज्याजवळ आरमार,त्याचा समुद्र! " या आरमार प्रकरणातील वाक्यावरुन द्रष्टया शिवाजी महाराजांनी समुद्राचे महत्व वेळीच ओळखले होते. या आरमाराची मुहूर्तमेढ अर्थातच 40 एकरात पसरलेल्या या कुरटे बेटावर रोवल्या गेली. बांधकामास तब्बल तीन वर्ष लागलेला हा जलदुर्ग म्हणजे जंजीरेकरांच्या थोबाडात मारलेली सणसणीत आरमारी चपराकच म्हणायला हवी. महाराजांच्या या आवडत्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे अभेद्य अशी 12 फुट रुंद आणि 50 एक फुट उंच भिंत (तटबंदी).  57 बुरुजानी सुरक्षित केलेलं हे आरमारी प्रतिक पाहण्याजोगं आहे. किल्ल्यात कायमची वस्ती असणारी घरे अगदी शिवकाळापासुन राखलेली आहेत. किल्ला म्हणण्यापेक्षा आत अख्खं गावच वसलेलं आहे . नगारखाना दरवाजा, आणि त्यावरील नगारा वाजवण्याचा अधिकार आजही परंपरेप्रमाणे चालत आलेल्या एका कुटुंबाकडे आहे. इतर किल्ल्याप्रमाणे आत हनुमानाचे,कुलस्वामिनी आई भवानीचे मंदिर आहे.आणि जगात कुठेही न आढळून येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर अद्वितीय! छत्रपती राजारामांनी स्थापना केलेली मूर्ती कोळी वेशात पाहायला मिळते. बाकी गोड पाण्याचे टाके दूधबाव,साखरबाव आणि दहीबाव पाहण्यासारखे. तटबंदीवरून दिसणारी राणीची वेळा, ताराराणीसाहेबांची खासगीची जागा. तिथे जायला तटबंदी मधुनच एक छोटा दरवाजा काढलाय. सिंधुदुर्गाबद्दल लहानपणी पुस्तकात वाचलं होतं,तेव्हापासुन या किल्ल्याचं खुप आकर्षण होतं. आज प्रत्यक्ष अनुभवताना मन भारावून गेलं. फेरफटका झाला आणि बोटीमध्ये जाऊन बसलो. हॉटेलवर पोहोचलो तेव्हा अंधारलं होतं.



रात्रीचे जेवणं शाकाहारी. बाकी कोकणात व्हेज म्हटलं की ती यादी बटाटा,कोबु हराभरा अन् मटकीची उसळ या पलीकडे सरकत नाही. पण जेवणात सोलकडी अन् उकडीचे मोदक,बेत जमला फक्कड़! पण मासे आज राहूनच गेले,साधा सुरमईचा एक तुकडा जिभेला शिवला नव्हता! असो,बघुया उदया काय होतं ते ?

भटकंती- पुण्याच्या आसपास

2 comments:

माझ्या मित्रवर्तुळात भटक्या म्हणुन मी सगळ्यांना माहिती आहे. आणि नेहमीचे भटके मित्र वगळता नवख्यांचा मला नेहमी एकच प्रश्न असतो, "आम्हाला यावंसं वाटतं रे पण, आम्हाला जमेल का, तुमचे ट्रेक खुप मोठे आणि कठीण असतात " वगैरे वगैरे. तर खास त्यांच्यासाठी म्हणुन ही थोडीफार विषयाला हात घालणारी माहिती. पुण्याच्या अगदी ५०-६० किमी अंतरावरील सर्वात सोप्पे आणि जिथुन अगदी हिमालयीन मोहिमांसाठी सुद्धा सराव केला जातो असे छोटे-छोटे ट्रेक आपण एका दिवसात करू शकतो . चला तर मग करायची सुरवात ?

photo credit: Sagar Manore
 १) मल्हारगड : नेहमीच्या फिरस्त्यांमध्ये सुद्धा अपरिचित असणारा सोनोरीचा मल्हारगड हा एकदा तरी जवळ करावा असाच आहे. पेशवेकाळात सरदार पानसेनी उभा केलेला,मराठेशाहीत शेवटचा बांधलेला किल्ला म्हणजेच मल्हारगड. किल्ल्याची लांबच लांब तटबंदी आणि मल्हारी-मार्तंडाचं मंदिर या खेरीज गडाचं मुख्य प्रवेशद्वार पाहण्यासारखं आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दिवे घाट पार करुन डाव्या हाताला वळलो की सोनोरी गावात पोहोचता येते, गावातच पानसेचा खासा वाडाही पाहण्याजोगा आहे.
 

२)रोहीडा: रोहिड खोऱ्यात म्हणजेच नीरा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा सुंदर किल्ला पुण्यावरून साधारण ६५ किमी अंतरावर आहे. पुण्यावरून भोर गाठावे आणि तेथुन एसटी किंवा जीप मधुन बाजारवाडी गाठावे. मळलेली वाट आपल्याला तासाभरात गडमाथ्यावर घेऊन जाते. पायथ्यापासुन गडावर असणाऱ्या दोन टोकावरील असलेल्या बुरुजांमुळे एक विशिष्ट आकार जाणवतो. गडावरील एकूण सहा बुरुज आणि तटबंदीमुळे गड अजूनही भक्कम वाटतो. इथल्या पाण्याच्या टाक्यांची भलीमोठी रांग आणि एकमेकांना जोडले असल्यामुळे शिवरायांच्या दुर्गविज्ञानाचे कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. रोहीडमल्लंच्या मंदिरात ७-८ जणांच्या राहण्याची सोय होऊ शकते.


३)राजगड:जिजाऊ साहेब आणि छत्रपति शिवरायांच्या २६ वर्षाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या इथल्या मातीला जगात तोड नाही. ज्या स्थापत्यशास्त्राची अवघ्या जगाने दखल घेतली आणि किल्ले बांधणीचा उत्कृष्ट नमुना म्हणुन घोषित केले आहे तो म्हणजेच आपल्या राजांचा गड. सुवेळी अर्थात पहाटेच्या वेळी सूर्योदयाचा निस्सीम आनंद घ्यायचा असेल तर राजगडा व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही तुम्हाला सांगतो. पाली गावातुन पालखी दरवाजा, भुतोंडे गावातुन अळू दरवाजा किंवा गुंजवण्यातून चोरदिंडीमार्गे गडदाखल झालात की या पवित्र भूमीत रमण्यासारखं दुसरं सुख नाही. बालेकिल्ल्याच्या अवघड पायऱ्या चढुन गेलो की सकाळ्ची कोवळी किरणे ल्यालेला महादरवाजा चकाकून निघतो. प्रवेश करता करताच लगेच कुजबुज सुरु होते ,"कुठं बरं पुरलं असेल अफजलखानचं मुंडकं ? " संजीवनी माचीकडे जाताना होणारं बेलाग बालेकिल्ल्याचं अद्भुत दर्शन आणि पुढ्यात दुहेरी तटबंदी असलेली नागिणीसारखी सळसळणारी संजीवनी माची म्हणजे अप्रतिम. तर मग कधी येताय राजगडावर ? पद्मावती मंदिरात ५०-६० जण रात्रीच्या मुक्कामाला राहु शकतात, गडावर जेवणाची सोय होऊ शकते. 


४)सिंहगड: हिमालयीन मोहिमेचा सराव करण्यासाठीची पुणेकरांची पहिली पसंती! कोणीही नवखा पुण्यात अवतरला की त्याच्याकडुन "तो सिंहगड किल्ला कुठे आहे रे ?",असा प्रश्न हमखास विचारला जातो. पण मला तिथे कसं जायचं याची माहिती देण्याची गरज वाटत नाही. पावसाळ्यात अगदी शिवापुर फाट्यापर्यंत गाड्यांची भली मोठी रांग,एवढी गर्दी खेचणारा हा सिंहगड म्हणजेच वीर तानाजीच्या शौर्याचं जिवंत प्रतीक. इथे येऊन फक्त पिठलं-भाकरीवर ताव न मारता संपुर्ण गड पहावा. कलावंतीण बुरुज पहावा,तानाजी कडा पहावा. थोडा वेळ शांत बसुन कल्याण दरवाज्याचं सौंदर्यही न्याहाळावं. गडावरुन दिसणारी राजगड-तोरणा ही दुर्गाजोडी तर अप्रतिमच.


५)घनगड: कोरसबारस मावळातला अगदी छोटेखानी, सवाष्णी आणि वाघजाई घाटाचा पहारेकरी. लोणावळा-ऍमबी व्हॅली रस्त्यावरून उजवीकडे भांबर्डे फाट्याकडे वळायचे. भांबरड्याच्या अलीकडेच येकोले म्हणुन एक गाव आहे तिथुन चालत वीस मिनिटात आपण किल्ल्याचा पायथा गाठतो. तेथून पाऊण तास गडमाथा. माथ्यावर एक विहीर आणि बुरुजाशिवाय पाहण्यासारखं काही नाही, पण कोंकणातल्या सुधागड,सरसगड, सवाष्णीचे खोरे आणि आपलं सह्यभुषण तैलाबैलाच्या कातळभिंती हा नजरा म्हणजे अफलातुनच. तैलबैलाच्या अवाढव्य पठाराची आपल्याला कल्पना येते. शिवाजी ट्रेल या संस्थेच्या अखत्यारीत या किल्ल्याचे संवर्धन सुरु आहे.


६)तुंग: पवना काठचा मावळखोर्याचा पहारेकरी. तिकोन्यावरून बेलाग सुळक्यासारखा भासणारा पण पायथ्याशी पोहोचताच गोमुखी प्रवेशद्वार आपल्याला मार्ग दाखवतो. तिकोना पायथ्याच्या जवण गावापासुन साधारण १० किमी वर असलेल्या मोरवे गावी पोहोचलो की अर्ध्या तासात चालत जाऊन आपण तुंगवाडीत पोहोचतो. पाऊण तासात माथा गाठता येतो. पडझड झालेली दरवाजे,हनुमानाचे कोरलेले दगडी शिल्प,गणेश आणि तुंगाई देवीच्या मंदिराखेरीज पाहण्यासारखे तसे काही नाही. पण पवनेचं विस्तीर्ण जलाशय आणि अक्ख्या मावळाचं विहंगम दृश्य नजर खिळवून ठेवतं. 


७)तिकोना: पावसाळ्यात हौशी ट्रेकर मध्ये प्रसिद्ध असलेला तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर-कोरीगड या दुर्गापंक्तीतला एक छोटेखानी किल्ला. याच्या आकारावरूनच याला हे नाव पडले असावे आणि माथ्यावर असलेल्या वितंडेश्वराच्या मंदिरावरून याला वितंडगड असेही म्हणतात. बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार भव्य आहे. उजवीकडे लगेच बारमाही पाण्याचं टाकं आहे. थोडीफार तटबंदीही शाबूत आहे. वितंडेश्वराच्या मंदिरामागे खंदक खोदलेले आढळतात. अलीकडच्या गुहेत पावसाळा सोडुन १५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते.


८)तोरणा: "गरुडाचे घरटे" आणि "पुणे परिसरातील सर्वात उंच किल्ला" अशी बिरुदावली मिरवणारा रांगडा दुर्ग नवख्या तसेच कसलेल्या गिर्यारोहकांचीही नेहमी परीक्षा पाहत असतो. भट्टीमार्गे वाळणजाई,राजगड-तोरण्यामार्गे बुधलामाची अशा बऱ्याच वाटा असल्या तरी साधारण ट्रेकर हे वेल्हयातून बिनी दरवाज्यानेच किल्ला जवळ करताना दिसतात. वेळ असेल तर बुधला माचीकडे जाताना उजव्या बाजूला वाळणजाई दरवाजा नक्की पाहावा. पाऊसकाळ सोडुन गडावर सकाळीच चढायला सुरुवात करावी. गडावर पोहोचायला साधारण २-२:३० तास लागतात. सदरेजवळच असलेल्या टाक्यात पाण्याची आणि मेंगाई देवीच्या मंदिरात राहण्याची सोय आहे.झुंजार माचीकडील हनुमान बुरुजावरून राजगडाचे विहंगम दर्शन होते. दूरवर लिंगाणा,रायगड,सिंहगड,रायरेश्वर,पुरंदर,इत्यादी दुर्गसख्यांचे दर्शन होते.

चला तर मग करायची सुरुवात ? पावसाळा पण जेमतेम आठवड्यावर येउन ठेपलाय. पण एक साधी अट आहे,घरातून निघालेला प्लास्टिक(पाण्याच्या बाटल्या, वेष्टण,इतर अविघटनशील) चा कचरा ट्रेक संपल्यावर घरच्या डस्ट बीन मध्येच दिसायला हवा. बाकी अफाट सह्याद्री तुम्हाला मोकळा आहेच…….

वनदुर्ग किल्ले वासोटा - नागेश्वरची अद्भुत गुहा

10 comments:
कोयना (शिवसागर) जलाशय
All the photos and content © Sandip Wadaskar

कधी स्वित्झर्लंडला गेलात का हो ? मग तुम्हाला युरोपियन लेक डेस्टीनेशन माहितीच असेल नाही ? चहूबाजूंनी हिरवाईने नटलेले सुंदर छोटे-मोठे तलाव, स्वच्छ नितळ पाणी ज्याच्यामध्ये डोकावुन पाहिलं तर अगदी मासे काय खाताहेत, हे स्पष्ट दिसावं ! अशा तलावामध्ये बोटीतुन मस्त पैकी एक लांब फेरफटका मारायला मिळाला तर !! कल्पनाच किती सुखद  वाटते नाही ? तर त्यासाठी तुम्हाला स्वित्झर्लंडला जायची काय गरज, मी पण नव्हतो गेलो. कारण असेच एक लेक डेस्टीनेशन आपल्याला पुण्याहून अगदी साडेतीन तासाच्या अंतरावर वसलेलं आहे. ऐतिहासिक सातारा शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या कोयना धरणाचा अथांग जलसाठा म्हणजेच आपलं महाराष्ट्रीयन लेक डेस्टीनेशन ! आता सांगा युरोपात जायची काय गरज ! चला तर मग निघुया, कोयनेच्या अथांग पाणलोटामधुन बोटीचा आनंद घेत वासोट्याच्या जंगल सफारीला . 
सातारा शहरातुन उजव्या बाजुला वळालो की निसर्गाने आपल्या ताटात आज काय वाढुन ठेवले असेल याची कल्पनाच करवत नाही. पावसाळ्यात निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर एक वेळ भेट द्यायलाच हवी .कास पठाराकडे जाणारा डोंगरी भिंतीवरील गुळगुळीत डांबरी रस्ता , साद घालणाऱ्या सह्यरांगा , दोन्ही बाजुंना जांभूळपुरा आणि कन्हेर धरणाचं फ्रेम मध्ये जीव ओतणारं पाणी , आजुबाजुचा कुंद गारवा आणि निसर्गरम्य कास तलाव पहिल्याच भेटीत प्रेमात पाडतो. पाठीराखा अजिंक्यतारा काही वेळ साथ करतो नंतर तोही निघुन जातो.  हा निसर्ग जगतच,वेडाच्या भरात आपण आपली गाडी दामटतो आणि थेट येऊन धडकतो ते टेटली या छोटाश्या गावात.
असाच गेल्या वर्षी (२०१३) पावसाळा संपता संपता मी आणि सचिन जाऊन धडकलो सचिनच्याच टेटलीच्या हॉटेल जलतारा मध्ये. मनसोक्त फोटोग्राफी ची इच्छा बाळगुन दाखल तर झालो होतो,पण पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त होती. असो बघूया तर काय होतं ते, थोड्याच वेळात आमच्या WTA चा ग्रुप हजर झाला. जेवणं वगैरे आटोपुन नेहमीप्रमाणे शेकोटीभोवती बसलो चाकोट्या करत. आता वेळ होती ती ओळख समारंभाची आणि काही महत्वाच्या सूचनांची . सगळ्यांनी आपापले आत्मचरित्र थोडक्यात कथन करून कार्यक्रम आटोपला. मग एकमेकांवर टिचक्या,गमती-जमती,प्रत्येकाचे ट्रेकिंग अनुभव,गप्पा-टप्पा वगैरे वगैरे सगळे रंग उधळुन सर्व जण पांगले आणि झोपेच्या अधीन झाले. मी पण आपलं वरूण राजाकडे छोटंसं गाऱ्हाणं टाकुन झोपी गेलो की "बाबा , उद्या थोडीफार उघड्झाप होऊ दे !"
पण नाही राजा ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. अख्खं गाढ विश्व पहाटेच्या साखरझोपेत असताना दणकून बरसला,मग बाहेर झोपणाऱ्यांची त्रेधातिरपीट आणि नुसती धावपळ, सगळा नूरच पालटला. पटापट आवरलं. वाफाळलेला चहा आणि "वर्ल्डस बेस्ट सेलिंग" बिस्कीट घेऊन बसलो कोयनेच्या काठावर बोटची वाट पाहत. बोट आली,बामणोलीला वनविभागाची परवानगी वगैरे सगळे सोपस्कार पार पाडत असताना एक म्हातारा बोटचालक उद्गारला "चुन्याची डबी,तंबाखू घेतला ना? , क्षणभर माझ्या डोळ्यांसमोर "तळहातावर मी स्वतः तंबाखू चोळतानाचा प्रसंग उभा राहिला " नाही आता जाल, परत येताना अर्धा किलो रक्त कमी करून याल !! " डोक्यात लगेच ट्यूब पेटली ,"जळु !!!!!" .मनात शंकेची पाल चुकचुकली,"नाही बाकीचे तर दिसताहेत हट्टेकट्टे,पण माझं काय ? अर्धा किलो इथेच गेल्यावर, पुढल्या ट्रेकला कसं व्हायचं ?? " चार-पाच चुन्याच्या डब्या खिशात घालुन सुरु झाला कोयनेच्या अथांग जलसागरातून किल्ले "वासोट्याचा अविस्मरणीय प्रवास ! आता येथुन पुढे दीड तास नो त्रास ! शब्दशः पायाला त्रास न देता अनुभवता येणारा निळाई-हिरवाईने नटलेला भन्नाट निसर्गराजा. जपानी बनावटीच्या डीझेल इंजिनचा आवाज थोडा वाढला आणि अंगात उत्साह संचारल्यासारखं एवढाश्या बोटेत प्रत्येक जण सैरभैर व्हायला लागलं. फोटोवेड्यांना हा अँगल,तो अँगल, कुठला अँगल घेऊ अणि कुठला सोडु असं होऊन गेलेलं आणि निसर्गवेडा आपला शांतपणे इथली प्रत्येक फ्रेम डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी घनदाट, हिरवीगार जंगलं आणि नशिबाने पाऊस नसेल तर पाण्यात पडणारे वृक्षवल्लीचं प्रतिबिंब म्हणजे एक विलक्षण सुखप्राप्तीच ! आणि मला विचाराल तर या सुखप्राप्तीसाठी मी वासोट्याला असंख्य वेळा येऊ शकतो, आताही बहुदा माझी सहावी वेळ असेल. 


पहिल्यांदा आलो होतो ते गिरीदर्शन सोबत. त्यानंतर मग चांगला-जिवाभावाचा वेगळाच ग्रुप तयार झाला,मग येतच गेलो. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन अनुभव येत गेले,प्रत्येक वेळी या प्रतिबिंबाची नव-नवीन फ्रेम डोळ्यात साठवत गेलो,पण यावेळेस वरूण राजाच्या अवकृपेने मनासारखी फ्रेम काही गाव ना झाली होती. असो. तर असाच बोटीचा अर्धा प्रवास सरत आलेला असतो आणि उजव्या बाजुला कोयनेचा पाट आत घुसलेला आढळतो. इथे कोयनेला कांदाटी येऊन मिळते,येथुन आपण सरळ गेलो की चकदेव,पर्वत,महिमंडणगड डोंगरसखे भेटतात. आपला प्रवास वासोट्याकडे सुरु असतो,थोड्याच वेळात किल्ले वासोटा महापराक्रमी राजासारखं आपलं प्रतिबिंब जलाशयात न्याहाळत बसलेला दिसतो. हेच त्याचं होणारं पहिले दर्शन. इथेच बोटीचा प्रवास सार्थक झाल्यासारखा वाटतो. डोंगरउतारावर असलेल्या दोन-दोन,तीन-तीन झोपड्यांच्या वाडीचे,जंगलात बांधलेल्या मचाणाचे, कुठे पावसाळी पाणी ओसरून वर आलेल्या छोट्या-मोठ्या बेटांचे कौतुक करत आपण मेट इंदवलीस दाखल होतो. हे खरं किल्ले वासोट्याचं पायथ्याचं गाव ,पण कोयना धरण झाल्यापासुन दुसरीकडे वसवलं आहे.आधीच दुर्गम असलेल्या जावळीच्या खोऱ्यातला हा अतिदुर्गम वासोटा कोयनेच्या पाणलोट प्रकल्पामुळे आणि व्याघ्रप्रकल्पामुळे थोडाफार सुरक्षित आहे. पण अलीकडच्या काळात इथे येणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे. मेट इंदवलीस दाखल होणारे हे साधारण ३ प्रकारात मोडतात. पहिलं म्हणजे बोटीचा आनंद घेऊन परत फिरणारे, दुसरं म्हणजे गिर्यारोहक जे वासोटा करायला आलेले असतात ते आणि तिसरे म्हणजे आम्ही, जे पाय फुटेस्तोवर वासोटा-नागेश्वर एकाच दिवशी जवळ करणारे.
बोटीमधून पायउतार होऊन आपण वनविभागाच्या कार्यालयात येऊन थांबतो, इथे आलेल्यांचा आणि प्रत्येकाजवळ असलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा,पिशव्यांचा आकडा नोंदवला जातो. आणि परत आल्यावर तो आकडा सारखाच असला पाहिजे,बरं का!. कमी झालेला चालत नाही,जास्त झालेला चालतो,किंबहुना त्यासाठी आपण प्रयत्नच करायला पाहिजे. असो तर एकदाचं आपण वासोट्याच्या घनदाट जंगलात शिरतो. झपाझप पावले टाकीत मारुती-गणेशच्या उघड्या देवळापाशी पोहोचतो, जवळच असलेल्या तेवढ्यात मागुन कुणीतरी किंचाळतं. मागे वळुन पाहतो तर जळवांनी धुमाकुळ घातलेला होता,जळ्व्यांनी म्हटल्यापेक्षा उगाच बॉउ करणाऱ्या त्यांनीच(??) गोंधळ घातला होता, आता बिचारे जळू तरी काय करणार ?  वर्षाकाठी तीन चार महिन्यांचा त्यांचा मुक्काम,घेतात आपली पोटं फुगवुन !! मग चुना-तंबाखू वगैरे लावुन कुणाच्या पायावरचे,कुणाच्या शूजमधले सैनिक बाजुला करून मोहीम पूर्ववत आली आणि तिकडे लक्षं न देता चालत राहण्याची सूचना देऊन आम्ही नागेश्वर फाट्याजवळ पोहोचलो. आता येथुन डावीकडे वासोटा २० मिनिट आणि उजवीकडे नागेश्वर दीड तास ! पुन्हा एकदा घनदाट जंगलात शिरलो. या रानात वनविभागाने सगळीकडे विविध पक्ष्यांच्या,प्राण्यांच्या,वनस्पतींच्या माहितीपर फलक लावलेत. इतर महत्वाच्या सूचना पण लावलेल्या आहेत. या सूचना फक्त वाचण्यासाठी नसुन पाळण्यासाठी आहेत याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. आता गदारोळामुळे सगळेच दिसतील याची शक्यता नसली तरी,आपण निदान आवाज न करता जंगलातली शांतता राखुन निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. असेलच नशीब चांगलं तर एखादं किडुक-माडूक स्पॉट करू शकतो. वासोट्याची वाट जरी रुंद झालेली असली तरी सुर्यकिरणे इथे जमिनीला स्पर्श करू शकत नाही एवढी झाडांची दाटीवाटी आहे. 



येथुन १० मिनिटात पहिल्या उघड्या-बोडक्या माथ्यावर येउन पोहोचतो आणि शिवसागर जलाशयाचा आणि आजूबाजूच्या डोंगरी रांगांचा भव्य-दिव्य नजारा आपली वाटच पाहत असतो. डोक्यावर येणाऱ्या सूर्याला न जुमानता एकटक पाहत उभे राहतो, एवढ्या घनदाट जंगलातली ही वाट चढुन आल्याचं सार्थक वाटतं आणि पाच मिनिटात पडक्या पायऱ्या आणि ढासळलेले दरवाजे चढुन आपण गडमाथा गाठतो. माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्याच पुढ्यात असलेल्या हनुमान मंदिरासमोर आपली बसकण मारतो. तहान लागलेली असते,भुकेचे आगडोंब उसळलेले असतात. ते शांत करून मग किल्ल्याविषयी थोडी चर्चा सुरु होते. वासोटा ! छत्रपतींनी मोठ्या प्रेमाने व्याघ्रगड असे नामकरण करून गौरवलेला. महाबळेश्वर डोंगर रांगेतला एक अति दूर्गम वनदुर्ग. उगवतीला कोयनेचं विशाल खोरं आणि मावळतीला सह्यपर्वताचे बेलाग कडे. तिकडून डोळ्यात नं मावणारे तळकोंकणाचं अफाट सौंदर्य. असा हा निबिड अरण्याचा राजा प्रत्येकाने एकदा तरी जवळ करावा असाच. 
 भक्कम इतिहासाचा साक्षीदार -किल्ले वासोटा 
 कोल्हापूरच्या शिलाहारवंशीय भोजराजाकडून वाहीवाटीनी शिर्के-मोरे यांच्याकडे आला . मोऱ्यांचा पाडाव-अफझल खान वध झाल्यानंतर महाराज पन्हाळ्यात अडकले असताना मावळ्यांकडून हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला . तसं पाहिलं तर किल्ले वासोट्याला स्वराज्यात तूरुंगाचं स्थान. महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले असताना हरामखोर इंग्रजांनी सिद्दी जौहर लांब पल्ल्याच्या तोफा देऊन मदत केली होती आणि तोही काही महिन्यांपूर्वीच झालेला करार मोडुन. त्या इंग्रजांना कारावास घडला तो इथेच. किल्ले तोरण्याप्रमाणे इथेही महाराजांना धनलक्ष्मी प्रसन्न झालेली, सोन्यानी भरलेले ४ हंडे इथे सापडले होते. पेशवेकाळात हा किल्ला औंधकर पंतप्रतिनिधीकडे आला. पेशवे आणि पंत यांच्यात बिनसल्यामुळे पंतांना अटक झाली परंतु किल्ल्याचा ताबा गेला पंताची उपपत्नी ताई तेलीण यांच्याकडे. ताई तेलीणीने पेशव्यांचा सेनापती बापु गोखल्याला चक्कं महिनोंमहिने लढा देऊन जेरीस आणले. किल्ला पडला पण नंतरच्या काळात एक मजेदार आर्या प्रसिद्ध झाली. 
श्रीमंत पंतप्रतीनिधीचा हा 
अजिंक्य किल्ला वासोटा ।
ताई तेलीण मारी सोटा ,
बापु गोखल्या संभाळ कासोटा ।।
 पण त्यानंतर ते मराठेशाहीचं दुर्दैव. १८१८ इंग्रजाळलेली तोफ जुन्या वासोटयावरून आग ओकायला सुरुवात झाली आणि तब्बल वीस तासानंतर किल्ले वासोटा हा पण इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
आपला गडावरचा फेरफटका सुरु होतो. आलो तसोच सरळ झाडीत आत शिरलो की आता फक्त पाया शाबूत असलेलं जोत्याचं बांधकाम थक्कं करून सोडतं. आणि पलीकडे सरळ तुटलेले कडे. परत येऊन उजवीकडे वळालो की पाण्याची दोन टाकी. गडमाथ्यावरील पाण्याचा एकमेव स्त्रोत. टाक्याच्या दिसण्यावर जाऊ नये, झाडाचा पडलेला पाला-पाचोळा बाजूला सारून पाणी बाटलीत भरून घ्यावे, १०० टक्के शुद्धतेची हमी ! कारण तसा पर्यायच नसतो. हीच वाट दाट झाडीतुन आपल्याला बाबु कड्याकडे घेऊन जाते. १० मिनिटात आपण त्या भेदक कड्यापाशी पोहोचतो आणि आपसूकच गौरवोद्गार बाहेर पडतात. हरिश्चंद्रगडाच्या कोंकणकड्याची आठवण करून देणारा,जणु त्याचा धाकला भाऊच ! पण एका वैशिष्ट्याने बाबु कडा कोंकण कड्यापेक्षा वेगळा ठरतो. जसा निर्मात्याने वेळात वेळ काढुन अंतर्वक्री कोंकण कडा घडवला त्याच फुरसतीने बाबुकड्याचे वेगळेपण टिकवायला विसरला नाही. त्या वेगळेपणाची साक्ष म्हणजे एका ठराविक अंतरावर असलेले खडकाचे महाकाय चिरे ! वाह !! यासम हाच ! समोरच जुन्या वासोट्याच वाढलेलं रान, तिथल्या निर्मनुष्य वातावरणाची जाणीव करून देतं. छत्रपतींच्या नावाने एक जबरदस्त जयघोष देऊन आपण उर्वरित गड पाहण्यास परततो. त्यानंतर चंडिकादेवीच्या शाबूत असलेल्या मंदिरात माथा टेकवुन, दोन्ही बाजूंनी दरी असलेल्या वाटेवरून आपण काळकाईच्या ठाण्यावर पोहोचतो. इथून दिसणारा मुलुख म्हणजे अफलातूनच. चारही बाजूनी वेढलेलं पूर्वेला कोयनेचा जलाशय तर पश्चिमेला तुटलेले कडे आणि उत्तरेला जुळे सुळके आपले लक्षं वेधुन घेतात.  त्यातलाच अलीकडचा खोटा नागेश्वर आणि पल्याड आपलं आजचं पुढचं लक्ष्यं, अर्थातच नागेश्वराची अद्भुत गुहा. 
नागेश्वरची अद्भूत गुहा 
नागेश्वर सुळक्यापर्यंत पोहोचण्याची वाट किती बिकट आहे याची कल्पना आपल्याला काळकाईच्या ठाण्यावरूनच येते. चौफेर मुलुख डोळ्यात साठवुन आपण नागेश्वराकडे कूच करतो. अर्थातच त्यासाठी वासोट्याचा अर्धा उतार संपवावा लागतो. नागेश्वर फाट्याजवळ आलो की सुरु होतो घनदाट जंगलातला पायगाडीचा एक सुखद प्रवास. पण तो अनुभवायचा असेल तर एक साधी अट आहे. रोजच्या फालतु गप्पांना आवर घालुन गुमान चालायचं. इथली निरव शांतता अनुभवायची,इथल्या निरनिराळ्या झाडांचा सुगंध पार छाती फुगेपर्यंत घ्यायचा. रानपाखरांच्या मंजुळ संगीत मेजवानीचा येथेच्छ आनंद लुटायचा. वासोट्यासारखी गर्दी इकडे फिरकत नसल्यामुळे पायवाट ही अजूनही निमुळतीच आहे आणि पाऊसकाळ नुकताच झाल्यामुळे अध्ये-मध्ये खंडित झालेली,पण ती शोधण्यात पण एक वेगळी मजा आहे. हा सगळा कार्यक्रम चालु असताना दाट झाडी संपुन आपण कधी उघड्या-बोडक्या माथ्यावर येतो कळतच नाही. आणि मग येथुन सुरु तारेवरची कसरत ! मुख्य सह्य रांगेच्या पोटाला चिकटून सरपटत निघालेली चिंचोळी वाट म्हणजे एक जीवघेणा थरारच .धुक्यामुळे दरीची खोली तितकीशी जाणवत नव्हती, पण अधुन-मधुन धुकं विरळ होताच हे आपण कुठुन जातोय याचीच भीती वाटत होती. तर अशी ही वाट ,त्याहुन मुरमाड ! पण धीराने आस्ते कदम करत निघालो की तीही आपण पार करतो आणि अर्ध्या पाऊण तासात एका झाडाखाली येऊन पोहोचतो. आता मात्रं समोर गुहेच्या दिसणाऱ्या पायऱ्या जीव नकोसा करतात. मोठ्या कष्टाने पायऱ्या चढलो की गुहेत आडवा नं झालेला भटक्या माझ्या तरी पाहण्यात नाही.
तर अशी ही नागेश्वरची गुहा ,एक नैसर्गिक लेणं . पोहोचताक्षणी डोक्यापासुन पायापर्यंत एका झटक्यात माणसाला गार करणारी आणि इथे येता येता आडवा करणारी एक अविस्मरणीय जागा. इथे आहे महादेवाचं शिवलिंग , त्यावर बारमाही थेंबांचा अभिषेक करणारं छत. इथे कोंकणातल्या चोरवणे गावातुन शिवभक्तांची नेहमीच वरदळ असते,महाशिवरात्रीला यात्राही भरते. आजुबाजुला भरपुर त्रिशूळ आणि पुढ्यात डोळ्यात न मावणारी सह्यपर्वताची अफलातुन फ्रेम !  मस्त पैकी जगासोबतच स्वतःला देखील विसरून एक लांब वामकुक्षी घ्यावी  आणि महादेवाचे दर्शन घेऊन निघावं परतीच्या प्रवासाला !
आता परतीला दोन पर्याय आहेत,एक म्हणजे ज्या वाटेने आलो त्याच वाटेने नागेश्वर फाटा गाठुन मेट इंदवलीला पोहोचायचं किंवा त्यापेक्षा अवघड असलेली नाळेतली वाट. आम्ही नाळेतल्या वाटेने उतरायला सुरुवात केली. ही वाट म्हणजे पाऊल चुकीच्या दगडावर पडले की बत्तीशीची वाटंच. असंख्य खाचखळगे,दगडं आणि अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेली ही वाट म्हणजे संपतच नाही. आणि शेवटी जीव भांड्यात पडतो जेव्हा मारुतीरायासह-गणपती बाप्पा दर्शन देतात. बोटीजवळ जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या आधीच पोहोचलेला ग्रुप जळूंवर नुसता तुटुन पडला होता. किरण तर डोकं गेलेल्या बाजीप्रभू सारखा हातात चप्पल घेऊन दिसेल तिथे चित करीत होता. आणि निखिल, जेव्हा त्याने त्याची पँट वर केली तेव्हा आतापर्यंत जळूची बाजू घेणारा निखिल ,त्याने येथेच्छ शिव्या हासडायला सुरवात केली. सगळा गोंधळ-गोंधळ उडाला होता. असो तर असा वासोट्याचा पावसात आलेला भन्नाट अनुभव आठवणीच्या कप्प्यात ठेऊन आमचा टेटलीकडचा प्रवास सुरु झाला.
आतापर्यंत वासोट्याचे काही प्रकाशचित्रे :

© Sandip Wadaskar 

























धन्यवाद !
All the photos and content  © Sandip Wadaskar