हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - एक आव्हान

8 comments:
सह्यपर्वताच्या अधिपत्यात असणाऱ्या आणि ट्रेकर्सचा स्वर्ग समजला जाणारया  हरिश्चंद्रगडावर बरेचदा जाणं झालं ते खिरेश्वर मार्गे.नेहमीच भुरळ पाडणाऱ्या  कोंकण कड्याच्या बाजूला रात्री राहण्याची आणि खालून कोंकण कडा पाहण्याची इच्छा अजूनही इछाच होती. आणि कोंकणातल्या बेलपाडा गावातून नळीची वाट साद घालत होती.नळीच्या वाटेबद्दल खूप काही ऐकून होतो. बराच कठीण आहे,भरपूर रॉक पचेस आहेत,बहुतेक ठिकाणी खडी चढण आहे,चढायला रोप ची गरज लागते,वगैरे वगैरे.आधी एकदा प्लान केला होता जाण्याचा,पण काही कारणास्तव तो फसला आणि जमलेच नाही. यावेळी मात्र नळीच्या वाटेचं आव्हान काहीही झाल्या पेलायचं आम्ही ठरवलं होतं. येणारया शुक्रवारला रात्री निघायचं ठरलं.

गुरुवारी रात्री प्रसन्नाचा चा मेसेज आला "प्रसादचं आणि माझं नाही जमणार यायला",झालं.गळणाऱ्याच्या संख्येत आणखी दोघांची भर. आधीच ऋषी आणि वासू चं रद्द झालेलं. अतुल आणि सागरचं चाललेलं यायचं पण ऑफिस च्या वेळेमुळे त्याचं पण रद्द झालेलं. आता राहिलो होतो चौघं केसागर,इंद्रा,निखिल आणि मी. कमीत कमी चार जण तरी जाऊ शकतो ना ? या गोड विचारांनी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी केसागर ला काल केला तर पठ्ठ्या कॉलेजची शेवटची ग्यादरिंग असल्यामुळे जावं लागणार म्हणून काहीतरी बडबडत होता. ऐनवेळी हा माणूस टांग देण्याचा प्रयत्न करत होता . मी ओळखलं "अजून एक पान गळणार " .आणि फोन संपेपर्यंत गळालं सुद्धा. राहिलो तिघेच. 


प्रसादला फोन केला, त्यानी "हडसर-जीवधन-नाणेघाट-चावंड" हा ट्रेक सुचवला. जायला हरकत नव्हती,पण नळीच्या वाटेचा विचार आणि खूप दिवसांपासून रखडलेला ट्रेक पूर्ण करायचं स्वप्न यामुळे दुसरं काही सुचत नव्हतं. ठरवलं. आता आपण तिघेच हा ट्रेक करायचा.निखिलला पातेलं,टेंट वगैरे घेऊन संध्याकाळी साडेसहापर्यंत स्वारगेटला यायला सांगितलं. इंद्र पण तिथेच पोहोचणार होता. 

ठरल्याप्रमाणे मी ऑफिस मधुन लवकर निघालो. घरी येताना वाटेतच मामाजींचा फोन आला,"तुझं विद्यापीठातून पत्र आलंय,उद्या पदवीप्रदान समारंभ आहे." झालं,अजून एक संकट. लगेच इंद्राला सांगणार तेवढ्यात  विचार केला आधी पाहावं तर पत्र काय आहे ते ? घरी पोहोचलो,पत्रं पाहिलं. समारंभाला न जाता पदवी पोस्टाने घरी येण्याची खात्री पटली. ते सगळं बाजूला सारून sack भरायला सुरुवात केली. मामाजीचं चाललं होतं " अरे जाऊन ये,ट्रेक करायला काय सगळं आयुष्य पडलंय. पदवी हातात घेऊन फोटो काढण्याची संधी गमावशील." पण या फोटो पेक्षा मला नळीच्या वाटेच्या फोटोची भुरळ पडली होती. जाऊ दे. ट्रेकला जायचा निर्धार अजुन पक्का झाला.

व्हायचा तो उशीर झाला आणि सगळ्यांना स्वारगेटला जमायला सात-साढे सात झाले. चौकशी केल्यावर कळाले बस साढेंआठला आहे. वाट बघत बसलो. बस आली साढे नऊला. बस मध्ये बसल्यावर कळलं,बस "खोपोली मार्गे जाणार आहे" बोंबा. आम्हाला जायचं होतं माळशेज घाटमार्गे. डेक्कनला उतरून शिवाजीनगरला गेलो आणि नाशिकच्या बस मध्ये बसुन आळे फाट्याला उतरलो. रात्रीचे बारा-सव्वा बारा झाले असतील. सगळीकडे सामसूम. सरत्या हिवाळ्याची थंडी जाणवत होती.आम्ही कल्याण रोडला येऊन थांबलो. बॉटल काढायला हात पाठीमागे टाकला तर बस मधला येतानाचा प्रसंग आठवला.
बस मध्ये एकाने माझ्याकडे पाण्याची बाटली बघून प्यायला पाणी मागितले. सहप्रवासीधर्म म्हणून मी त्याला बाटली दिली. स्वतः तर पाणी कधी न पिल्यासारखा चांगली अर्ध्यापेक्षा जास्त खाली केली. आणि वरून कहर म्हणजे त्याच्या मित्रांना प्याऊ सुरु केल्यासारखं पाणी पाजून बुडाला लागलेली बाटली परत केली. म्हटलं "धन्यवाद ,आभारी आहे ". आता याला काय म्हणावं ? म्हणजे "एखाद्याला खायला ऊस द्यावा आणि त्याने तो मुळासकट उपटून खावा " अशीच अवस्था झाली होती.
अर्थात दोघांकडच पाणी  आधीच संपलं असल्यामुळे आम्हाला पाणी शोधणं गरजेचं होतं. आजुबाजुला कुठे चहाची टपरी पण नव्हती. तेवढ्यात दोघे वयस्कर माणसे बस चीच वाट पाहत असताना दिसले. त्यांना बस बद्दल विचारलं. तर बीड-कल्याण बसची वेळ झालेली आहे येईल इतक्यात असं समजलं. बस येईपर्यंत पाणी भरायला आळेफाट्याच्या स्थानकावर गेलो तोच त्या माणसांनी बस आलीये म्हणून ओरडायला सुरुवात केली. अर्धवट पाणी भरून बस मध्ये बसलो.

आम्हाला उतरायचं होतं सावर्णे या गावी. एक तर या गावाचं ठिकाण,स्वारगेट बस स्थानकावर कंडक्टर पासून डेपो मनेजर पर्यंत कुणालाच धड सांगता येत नव्हतं. त्यामुळे गावात व्यवस्थित बस स्थानक असेल याची दाट शक्यता नव्हती. आणि वरून या कंडक्टर ला पण माहित असेल की नाही याची भीती होती. कंडक्टरला सावर्णेचं  तिकीट मागितलं. "कुठे आलं ते ?",कंडक्टर उत्तरला. बोंबल,ह्याला पण माहित नव्हतं. ज्या गोष्टीची भीती होती, तेच झालंय."माळशेज घाट संपायच्या थोडसं अलीकडे. ",मी बोललो. इंद्रा आणि निखिल मागे बसले होते. "गाडी थांबत नाही",कंडक्टरची प्रतिक्रिया.मी विनवणी करत होतो. कंडक्टर मोठ्याने ओरडला,"रात्री घाटात गाडी थांबणार नाही". माणूस ऐकालाच तयार नव्हता. ओतूरला उतरलो. रात्रीचे दीड-दोन वाजले असावेत. आता सूर्योदयाची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दिली ताणून बस स्थानकावर.

सकाळी चार-साढे चारला उठलो. गडबडीत आवरलं आणि सकाळची पहिली बस पकडायची म्हणून कल्याण रोडला येउन थांबलो. आजूबाजूला काळं कुत्रं सुद्धा नव्हतं दिसत. रात्रभर भुंकणारं पण नेमकं यावेळेस साखरझोपेत असावं कदाचित कारण त्याचाही आवाज बंद झालेला . आणि आम्ही भटके बस ची वाट पाहत भूतासारखे रस्त्यात उभे होतो. पाच वाजले ,सहा झाले तरी बस चा पत्ता नाही,आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबायलाच तयार नव्हत्या. वैतागुन एका उघडलेल्या टपरीवर चहा घेतला आणि परत काही मिळतं का याची वाट पाहत रस्त्यावर येउन थांबलो. आणि शेवटी एकदाची एका माणसाने त्याची क्रुझर थांबवली आणि माळशेज घाटातुन आमचा प्रवास सुरु झाला. इंद्रा आणि निखिलनी तर बसल्या बसल्या ताणुन दिली. मी जागा होतो. ड्राईवर म्हटला तर खरा,पण त्याला पण सावर्णे गावाची माहिती असेल की नाही यात शंका होती.

सहयपर्वताची मुख्य रांग कापत गाडीने घाट उतरायला सुरुवात केली आणि दक्षिणेस  डाव्या बाजूला भैरवगडाच्या कातळ भिंतीने आणि नानाच्या अंगठ्याने लक्ष वेधून घेतले. उजव्या बाजूला(उत्तरेकडे) नाफत्याचे उंचच उंच कडे,हरिश्चंद्रगडाचा भाग असलेल्या रोहिदासाचे शिखर यांचं दर्शन झालं. दोहोंच्या मधल्या कोंकण कड्याने जणू काही तुमचीच वाट बघतोय अशा अविर्भावात दुरून हातवारे केल्यासारखं जाणवलं. हे बघण्याच्या नादात आम्ही पार मोरोशी जवळ येऊन पोहोचलो.प्रसादनी सांगितल्यानुसार मध्ये एक पोलिस चौकी लागते,त्याच्या अलीकडे थांबायचं होतं. बोलण्याच्या नादात ड्रायव्हरला पण नाही कळलं.
जवळपास १० किमी पुढे आलो होतो. तेथून वालीवरेला जायला रस्ता दिसत होता,पण ते अंतर बरंच असल्यामुळे तसंच परत एका ट्रकमध्ये बसुन सावर्णे चा प्रवास सुरु झाला. सकाळचा मंद वारा ती सकाळ अतिप्रसन्न करण्यास समर्थ होता. भैरव गडाच्या कातळकड्याचे परत दर्शन होताच,गडाला भेट देण्याची इच्छा अजून तीव्र होत चालली होती. माळशेज घाटचा दृष्ट लागण्यासारखा रस्ता न्याहाळत आम्ही ट्रक मधल्या प्रवासाचा आनंद घेत होतो.  रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांचा पालापाचोळा वाऱ्या मुळे इकडे-तिकडे उडत होता. हा प्रकार बघत बघत आम्ही सावर्णे गावाजवळ येउन पोहोचलो.

सकाळचे साधारण सात सव्वा-सात झाले असतील. पैसे देताना ट्रक ड्रायव्हर विचारता झाला, "इकडे कुठं भटकले?" आम्ही त्याला बोट दाखवुन म्हटलं,"तो जो डोंगर दिसतोय ना!, हा तो! चढून जाणार आहे आम्ही."कमाल हाये बा तुमची!",डोक्याला हात लावुन ड्रायव्हर पुटपुटला. त्याच्याकडे हसरा कटाक्ष टाकत आम्ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन बसलो. चहा घेऊन हुशार झालो आणि बेलपाड्याकडे चालत निघालो.

दहा बारा घरांची वस्ती असलेलं सावर्णे गाव. सकाळची वेळ असल्यामुळे बायाबापडयांची कामे चाललेली. त्यातली काही जण आमच्याकडे आश्चर्याने पाहत होती. रस्ता विचारून पुढे निघालो.मला नेहमी विचार पडतो,"या गावकर्यांना आम्हा भटक्याबद्दल काय वाटत असेल?" म्हणजे,"उगाच हे डोंगर चढून या लोकांना काय मिळत असेल",असाच विचार करत असतील,नाही? एका आजोबाला वाट विचारून आम्ही बेलपाड्याच्या खिंडीकडे चालायला सुरुवात केली. वाटेत लागणारा ओढा पार करून अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आम्ही खिंडीजवळ येउन पोहोचलो. खिंडीतून नाफ्त्याचा कडा अजूनच भीषण वाटत होता. थोडा वेळ शांत बसुन आसमंत न्याहाळला.खिंड उतरायला सुरुवात केली.खाली उतरून शेत-शिवाराच्या दांडाला लागलो. वसंताची चाहूल लागल्यामुळे आंब्याच्या,जांभळा-करवंदाच्या झाडांना मोहोर यायला सुरुवात झाली होती. असंच एका आंब्याच्या बागेतून जाताना मोहरलेल्या झाडांनी मन मोहरून टाकले.



एका तासात आम्ही बेलपाड्याला पोहोचलो.आणि वालीवारे म्हणजेच बेलपाडा होय, हे तेव्हा कळलं. मध्ये एक नदी,ओढा लागला. नदीवरचा सांकव ओलांडुन पलीकडे गेलो तर,विहिरीवर पाणी भरणाऱ्या बायाबापड्या आमच्याकडे बघत लाजऱ्याबुजऱ्या झाल्या. "आता हे ध्यान कुठून आलं म्हणावं?" असाच विचार कदाचित ते आमच्याबद्दल करत असतील. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि गावातल्या मुख्य रस्त्यावरून चालत,दोन तीन शेत-शिवार पार करून नाळेच्या तोंडाशी म्हणजे मघाच्या नदीच्या उगमा जवळ येउन पोहोचलो. नदीचं नाव काळू नदी. नळीच्या वाटेच्या पाण्यानी पावसाळ्यात तुडुंब भरून वाहणारी.आता थोडेफार पाणी होते.नदी बाजूला ठेवून आम्ही नळीच्या वाटेकडे चालायला लागलो.

अरे बापरे ! समोर नाफ्ता,कोंकण कडा आणि रोहिदास शिखर. आम्हा भटक्यांची वाचा बंद. म्हणजे याला काय म्हणावं सुचत नव्हतं. निसर्गाने जणु सह्यापर्वताचा आकाशाला भिडणारा उंचच उंच बांधुन तयार ठेवलेला मंच. जवळपास समुद्रसपाटीच्या उंचीवरून अजूनच अक्राळ विक्राळ वाटत होता.सकाळच्या पहिल्या सुर्यकिरणांना देखील आपल्यापर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागावा,इतका तो उंच आणि पसरलेला उभा कातळकडा.वाह ! रात्रीच्या जागरणाच चीज इथेच झालं असं वाटायला लागलं.


दाट जंगलातुन वाटा काढत आम्ही नाळ गाठायला सुरवात केली. मध्ये एक झोपडी दिसली.आजूबाजूला शेत केल्यासारखी जागा होती. जाऊन पाहिलं तर एका आजोबांची भेट झाली. मनात विचार आला, पुढच्या वेळेस आलो तर झोपडीच्या बाजूला राहण्याचा मस्त बेत होईल. आजोबांना रस्ता विचारला तर त्यांनी हातातला विळा रोखून वाट दाखवली. "अहो आजोबा,इथे सात-आठ जणांची राहण्याची सोय होईल का ?",मी विचारलं. "पन्नास येऊ दे." ऑ! आजोबांच्या उत्तराने सुखावलो आणि परत आमची भटकंती चालू झाली.  थोड्याच वेळात दगड धोंडे सुरु झाले म्हणजेच नाळ सुरु झाली.

उजव्या बाजूला भीषण कोंकण कडा. त्यामागून सुर्यनारायण उगवत तापायला सुरुवात झाली होती. कोंकण कडा आणि रोहिदास यांच्या मधल्या खाचेतून सूर्यकिरणे डोकावत होती. जणू काही सह्यकड्याचा आणि सूर्यकिरणाचा लपंडाव चाललेला आहे असं भासत होतं. निसर्गाच्या या निरागस खेळाचा आनंद घेत आम्ही नाळेतून चालत होतो. मोठ-मोठे दगड चढताना बोराटाच्या नाळेची आठवण येणार नाही असे कसे होणार. पण यावेळेस आम्ही नाळ चढत होतो. 

अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही नाळेच्या मुख्य तोंडाशी म्हणजे खरंतर जेथून घसरड्या दगडांचा रस्ता चालू होतो तिथे येउन पोहोचलो. अंतर जास्त वाटत नव्हतं,मनात विचार आला एक दोन तासात चढून होईल,लोकांनी इतका का बाऊ करून ठेवलाय या वाटेचा ? कळत नाही. पण लगेच थोडं पुढे चढत गेलो आणि भ्रमनिरास झाला, कळाले आम्हाला,इथे येणारे बरोबर बोलतात!

खरी कसोटी येथुन लागणार होती. इंटरनेट वर तसं बरंच पारायण करून आलो होतो. त्यामुळे नाळेत वर चढेपर्यंत किती रॉक पचेस आहेत यांची इत्यंभूत सगळी माहिती होती. सह्याद्रीच ते भीषण,रौद्र निसर्ग सौंदर्य अनुभवत आम्ही पहिल्या खडकाच्या कठीण तुकड्या(रॉक प्याच) पर्यंत पोहोचलो.तो भाग सहज पार करत पुढे निघालो. पहिला भाग पार केला खरा पण जवळचे सगळे पाणी संपले होते.पुढे चालत राहिलो. ऊन वाढत होतं,तोंड सुकली होती,घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात पुढच्या रॉक प्याचला दोघे-तिघे जण बसले होते. त्यांनी प्यायला पाणी दिले,जीव भांड्यात पडला. तिथे भास्कर ची ओळख झाली. भास्कर - म्हणजे कोंकण कड्याचा मालक :) हा हा! निदान आम्हाला तरी तो कोंकण कड्याचा मालकच वाटतो निखिल पुढे दुसरा प्याच चढून आमची वाट बघत बसला होता. भास्करच्या माहितीनुसार आता कोंकण कडा येईपर्यंत पाण्याचा दुष्काळ.थोडा वेळ शांत बसलो, नाळेच निरीक्षण करत. अप्रतिम म्हणजे चाबुक,महादेवाने तांडव करावा तसं निसर्गाने अक्षरशः तांडव मांडला होता. पण तांडव मात्र शांत वाटत होता.सह्याद्रीचे ते उंचच उंच कडे जणू काही चाकूने तुकडे केलेल्या केकचे चिरे भासत होते. आणि ते उंच कातळ-कडे आता आकाशाला भिडतात कि काय असं वाटायला लागतं.निसर्गाच्या सादेला हाक देत आम्ही दुसरा खडतर भाग चढून पुढे निघालो. 




आणि आता तर निसर्गाने  काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं आमच्या ताटात. तिसरा रॉक प्याच यायच्या आधीच ही खडतर वाट! या वाटेवरून चालायचे/चढायचे म्हणजे अधे मध्ये थांबणे नाही. थांबला तो संपला. थांबला तर ज्या दगडांना तुम्ही धरलंय तो दगड एकतर हातात येईल,नाहीतर ज्या दगडावर थांबलाय तो तरी घसरून खाली पडेल. याचा अर्थ तुमचा तोल जाऊन तुम्ही खोल दरीमध्ये पडू शकता. ही वाट पार करून तिसऱ्या रॉक प्याच च्या तोंडाशी येऊन पोहोचलो. याला मुळीचा प्याच असेही म्हणतात. हा प्याच थोडा ट्रिकी असुन चढायला रोपची मदत लागती. आधीच एका टीमने रोप बांधला असल्यामुळे,आम्ही आमच्या रोप चे उत्घाटन न करता त्याच रोपने वर चढलो. त्यानंतर मोठ्या खडकाला वळसा घालून एक धोकादायक ट्रवर्स पार केला. ट्रवर्स पार करताना खोल दरीची भीषणता जाणवत होती. पण आता थोडीफार सवय झाल्यामुळे लगेच पार करून खिंडीत येऊन पोहोचलो. नळीची वाट संपली. हायसे वाटले. 


धन्यवाद - आभारी आहे 
याचा पुढचा भाग हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेने - कोंकण कडा 

कुंडली - कामशेत - कोंडेश्वर मंदिर

4 comments:
या ठिकाणाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.  एक छान अनुभव तुम्हाला पण
घेता यावा यासाठी मी  हा लेख लिहत आहे. कामशेत येथून आतमध्ये २० - २५   किमी वर हे मंदिर आहे.


कामशेत ला पोहचल्यावर जांभिवली गाव किंवा कुंडली रोड ने जा. जांभिवली गावाला पोहचल्यावर तेथील स्थानिक लोकांना कोंडेश्वर  मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारा. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे म्हणजे स्वर्गच…






  





साधारण २ किमी चा हा रस्ता कधी शेतातून तर कधी खडकातून आहे. कही अन्तर पार केल्यावर खलील सूचना
फलक दिसेल(म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात)



पुढे गेल्यावर मंदिर दिसेल , दुरूनच दिसणारे मंदिराचे दृष्ट अतिशय नयनरम्य आहे . शंकराचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे.




आजूबाजूला डोंगर, धबधबे आणि मध्ये केंद्रस्थानी हे मंदिर :)
महाशिवरात्री ला येथे प्रचंड गर्दी असल्याचे स्थानिक लोक सांगत होते.







मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो , खडकांचा एक वर जाणारा रस्ता आम्हाला दिसला …असेच वर जाऊन पहिली,  डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे द्रुश्य । एक मोठा धबधबा (रुंदीने मोठा) आमची वाट पाहत होता. आणि विशेष म्हणजे त्या धबधब्यात कोणीच नव्हते :) कोणीच नाही …मला भुशी धरणावरच्या धबधब्याची आठवण झाली(गर्दीची) :)    १ तास आम्ही तिथे भिजलो ....


खाण्याची  सुविधा :- आम्ही गेलो तेव्हा तिथे एकच टपरी होती जिथे चहा ,पोहे , वडा पाव सारख्या बेसिक गोष्टी मिळत होत्या. किंमत नेहमीपेक्षा जास्त आहे (साहजिकच)  पण उपलब्ध  आहे…:)

स्वता:चे वाहन असेल तर तुमही जांभिवली गावापर्यंत आरामात जाऊ शकता.
एस टी महामंडळाची बस पण इथे येते पण कधी ते माहित नाही :)

जवळची ठिकाणे :- शिरोटा आणि उकसन धरण, राजमाची  ,ढाक भैरी





                          Kondeshwar Temple, Kundli(Kamshet)


Finally I am writing this article. This is about one unexplored place. Most of the people are not aware about this place, kondeshwar temple. It is about 20-25kms from kamshet. This temple is surrounded with the fabulous scenary.
In rainy days, it is worth to visit once. We had been there in august so that we can catch waterfalls :) This temple is dedicated to Lord shiva.
Temple is loaded healvily on mahashivratri by Shivbhakt :)
How to reach: - when you reach kamshet, ask for the road to go to Jambivli village. In below map you can see the route as “kamshet kundli road”

Once you reach jambivli, you can ask local people about kondeshwar temple...it is around 2-3 kms walk and its beautiful route J through farms.
After visiting temple we hiked through small rock patch and after that we could not believe on our eyes,
One big waterfall (not by height but by width) was waiting for us... Nobody was there, we enjoyed the waterfall for an hour……everybody was slipping from the wet rocks below water but doesn’t matter we came to enjoy so we enjoyed a lot there.

 
Facilities:

That time only one small tapri was there where you can get tea, vada pav , ofcourse price is quite more than usual J but no option, otherwise bring food with you…
You need to have your own vehicle to reach jambivli village but walk till temple is must (in rainy days) and worth it :)
ST bus is also there but you never know when it will come  :)

Places nearby:
Dhak bahiri, uksan dam , shirota dam.







 

 

 

कलावंतीण-प्रबळ-----पहाट नववर्षाची...सह्याद्रीच्या कुशीत 1 of 2

12 comments:
गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीने बऱ्यापैकी जोर धरायला सुरुवात झाली होती .पुण्यातल्या थंडीचा आतापर्यंतचा निच्चांक आणि ३१ डिसेंबर ची चाहूल लागलेली. वातावरण एकंदरीत,आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये "चील्ल्ड "? असे काहीतरी. दरवर्षी प्रमाणे मित्र परिवाराचे नवीन वर्षाचे स्वागत कसे करायचे यांचे प्लांनिंग चाललेले आणि आम्ही भटके कंपनी मात्र सरत्या वर्षाची शेवटची रात्र कुठल्या गडावर घालवायची याचा विचार करत होतो.

शेवटी ठिकाण ठरलं .कलावंतीण -प्रबळ .एक तारखेची बऱ्याच जणांना सुट्टी होती आणि ज्यांना सुट्टी नव्हती त्यांनी दांडी मारायचे ठरवले. तसं पाहिलं तर आम्हाला भटकायला जायला असं गंभीर कारण लागतं असं नाही. आमचा संबंध सुट्टीशी. तेव्हा कुणाची जयंती असो वा कुणाचं काय .फरक पडत नाही. बोंबलत फिरायला कधीही तयार असतो.

अशाप्रकारे आमची भटके कंपनी अर्थात केसागर,प्रसाद ,वासू ,इंद्रा,निखिल तयार झाले .वेळेवर काहीतरी काम निघाल्यामुळे प्रसन्नला यायला जमले नाही आणि ऋषी ला सुट्टी नाही मिळाली. तसंही ह्या ऋषीचं नेहमी काहीना काही असतच.

मी आणि इंद्रा निखिल ची वाट बघत शिवाजीनगरला वेळ घालवत होतो. वासू पुणे रेल्वे स्टेशन वरून लोकल सुटण्याची वाट पाहत होता. थोड्या वेळाने निखिल आला आणि खास आपल्या वऱ्हाडी मिश्रित पुणेरी शैलीत त्याने वाक्य फेकलं,"कुठे जायचं बे आपल्याला ? मी तसाच आलो !" या माणसाला बऱ्याच वेळा माहित नसतं की ,आपण कुठे चाललोय ? पण पठ्ठ्या चालायला एकदम राकट. ४०-५० किमी तर हा हुं किंवा चु न करता असाच चालू शकतो. चालण्याची क्षमता संपली की काही बोलत नाही ,फक्त चालत राहतो. आणि जेव्हा बोलतो तेव्हा सगळे हसतात. हो की नाही रे प्रसन्न ? असु दे . 

काही वेळाने वासू पुणे स्टेशन वरून निघाला.लोकल शिवाजीनगरला पोहोचली. आम्ही चढलो.बघतो तर या वासूने पाण्याची बाटली सुद्धा नव्हती आणली सोबत .bag तर दूरच. तसाच ऑफिस मधून सुटला होता वळू सारखा.शेपटी (हात) हलवत.नशीब रस्त्याच्या बाजूला दिसली असेल म्हणून टोर्च घेतला होता.पुढे प्रसाद तळेगावला चढला आणि केसागर मुंबईवरून निघाला होता.सगळेजण कर्जत ला भेटायचं ठरलं होतं. साढेअकराच्या दरम्यान आम्ही लोणावळ्याला पोहोचलो.


लोणावळा स्टेशन तसं गर्दीचं ठिकाण. पण गर्दी नव्हती. कदाचित वर्षअखेरचा दिवस असल्यामुळे गर्दी बहुतेक आपापल्या परीने नवीन वर्षाचे स्वागत करायास व्यस्त असली पाहिजे.मी आणि इंद्रा कर्जतचे तिकीट काढायला counter वर गेलो तर "तो" म्हणाला "पुढच्या वर्षी मिळेल"."पुढच्या वर्षी ??????", मी. 

"हो. म्हणजे रात्री बारा नंतर" तो म्हणाला. कारण गाडी पाऊण वाजता होती ,पुढच्या वर्षी. आम्ही आमच्या गप्पांचा ओघ सुरु केला. रेल्वे घड्याळामध्ये बारा वाजायला अजून पाच मिनिटे बाकी होती,पण बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व्हायला सुरुवात झाली.  आणि थोड्याच वेळात भारतवर्षांनी इंग्रजी नवीन वर्षात म्हणजे २0१३  मध्ये प्रवेश केला. सगळ्यांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मी आणि इंद्रानी तिकीट काढून आणलं आणि थोडसं सेलिब्रेशन म्हणून स्टेशन बाहेर जाऊन आईस्क्रीम वर यथेच्छ ताव मारला.

परत स्टेशन वर येउन चहाट्या मारत गाडीची वाट बघत बसलो. पुढच्या ट्रेकचा विषय निघाला. पाच किल्ले दोन दिवसात. बहुतेक इंद्राला याची कल्पना नसावी . तो पुटपुटला ,"येडे आहात का रे तुम्ही ?" मी त्याच्याकडे बघत म्हटलं ,"तुम्ही ?????" आवरतं घेत इंद्रा म्हटला,"  म्हणजे, आपण ! ". सगळे हसायला लागले.

थोड्याच वेळात गाडी आली. रात्रीचे साधारण एक वाजले असतील. आमचा प्रवास कर्जतच्या दिशेनं चालू झाला. गाडीने खंडाळा स्टेशन सोडलं आणि आम्हाला वेध लागले ते बोर घाटातील निसर्ग सौंदर्याचे. अर्थात रात्रीची वेळ असल्यामुळे ते पूर्णपणे अनुभवने शक्य नव्हते पण सह्याद्रीच्या शांत आणि निवांत आसमंतातून गुपचूप जणू काही दबक्या पावलांनी वाट काढीत असलेल्या गाडीतून प्रवास करण्याचा आनंद आम्ही घेऊ शकत होतो. 

बोर घाट. कोंकणातून देशाकडे आणि देशावरून कोंकणात व्यापाराचा अजून एक पुरातन धोपट मार्ग. हा घाट म्हणजे जणू भटक्यानचा पावसाळ्यातला स्वर्ग. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण पहायची असेल तर पावसाळ्यात पुणे-मुंबई प्रवास करणे हे अविस्मरणीय.  अफलातून छोटे मोठे धबधबे, सुंदर पाण्याचे तळे आणि दोन्ही बाजूला असलेलं घनदाट जंगल या सगळ्यांनी नटलेला  सह्याद्री मधून जाणारा आणि पुणे मार्गे दक्षिण भारत मुंबईला जोडणारया बोर घाटातून प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरतो.  रेलमार्गाने हा घाट खंडाळा(देशावर) व  कर्जत(कोंकणात) या गावांना  आणि घाट रस्त्याने खंडाळा(देशावर) व खोपोली(कोंकणात) या गावांना जोडतो.गाडी जाण्या इतपत मार्ग हा एका  शिंग्रोबा नावाच्या  स्थानिक धनगराच्या साह्याने ब्रिटिशांनी बांधला.

आम्ही कर्जत ला पोहोचलो. साधारण २ वाजले असतील. स्टेशन वर केसागर ची वाट बघत बसलो. लगेच ५-१० मिनिटात केसागर येउन पोहोचला,सगळे सांगाती जमले. कर्जत चं बस stand गाठलं आणि थोडं विसावलो. कर्जतच हे बस स्थानक सुद्धा आम्हाला आता नवीन राहिलं नाहीये,नेहमीचा कट्टाच होऊन बसलाय असं म्हणायला हरकत नाही. रात्रीचे सव्वादोन-अडीच झाले असावेत. 


 प्रसादने घरून आणलेल्या वडापावची भाजी आणि पोळ्यांवर ताव मारून झोपी गेलो. सकाळी पाचला जाग आली तेव्हा एक कुटुंब पहिल्या बसची वाट बघत बसलं होतं. आवरावर करून नाश्ता पाणी आटोपले आणि सहा वाजताच्या बस नी शेडुंग ला जायला निघालो. थंडीने कुडकुडत शेडुंग फाट्याला उतरलो. 





सकाळचे पावणे सात -सात झाले होते. पण अजूनही अंधारच होता. आम्हाला अजून ४ -५ किमी अंतर कापायचा होतं. रस्त्यावर कुठे वाहन सापडेना. वाट न बघता पायदळ वारी सुरु केली. जवळपास अर्धा तास चालून झाल्यावर कुठल्यश्या एका गावात पोहोचलो . काय बरं गावाचं नाव ? हो सांगडे . सांगडे गावात पोहोचलो. गावातल्या एका सुंदरश्या बस स्थानकाजवळ येउन थांबलो. बस स्थानक एखाद्या चित्रातल्या सारखं भासत होतं .आणि बस थांब्यासमोर रांगोळी वगैरे काढल्या होत्या. कुठलातरी उत्घाटन समारंभ पार पडला असं वाटत होतं. बाकी गाव मस्त होतं शांत निवांत ! गावकर्यांना चौकशी केली असता बस साधारण आठ -सव्वा आठ ला येईल असं कळलं. थोड्याच वेळात शाळकरी मुलं जमा व्हायला लागली आणि बस येण्याची खात्री पटली. 





 
पूर्वेकडे बघतो तर काय सूर्य वर डोके काढायला लागला होता. मस्त दिसत होता लाल ठिपका ! वाह ! जसा जसा वर येत होता ,तसा रंग बदलत होता. कॅमेरा मध्ये बंदिस्त करायला सुरुवात केली. सुर्योदयाची फोटोग्राफी झाल्यानंतर परत बस ची वाट बघत बसलो. बराच वेळ झाला ,बस येईना झाली. थांबायचा कंटाळा यायला लागला. सर्वानुमते चालायला सुरुवात केली. 




अरे हो मी सांगायचंच विसरलो . आम्हाला जायचं होतं ठाकूरवाडी येथे . प्रबळगडाचं पायथ्याचं गाव ,तसं पाहिलं तर प्रबळमाची हे पायथ्याचं  ठिकाण. ठाकूरवाडी वरून जवळपास १३०० फुटावर. वाहनाने ठाकूरवाडी पर्यंत जाता येतं आणि त्यापुढे प्रबळमाची पर्यंत बैलगाडीच्या रस्त्याने चालत जावं लागतं . त्याच वाहनाची म्हणजेच लाल डब्ब्याची वाट पाहत कंटाळुन आम्ही ठाकूरवाडी ची वाट धरली. 

चालताना आम्ही गावातील आजूबाजूचे निरागस निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. १५ - २० मिनिटे चालल्यानंतर मागून ओळखीच्या इंजिनाचा आवाज ऐकू आला. वळून बघितलं तर एस टी चं धूड. पटापट बस मध्ये बसलो आणि १५ मिनिटात ठाकूरवाडीस पोहोचलो.  





प्रबळमाची कडे चालायला सुरुवात केली. ठाकरांच्या गावातून चालताना मजा वाटत होती. थोडे पुढे गेलो तर दहा बारा टुमदार बंगल्यांची वसाहत. बहुदा मुंबईकरांची वीक एंड होम्स. प्रबळमाची ची वाट चढताना आधी भरकटलो खरं ,पण लगेच वाट सापडून मुख्य रस्त्याला लागलो.चालताना उजव्या बाजूला एका डोंगरामध्ये त्याच्या रचनेमुळे नंदी बैल बसल्याच्या भास होत होता. 






सकाळचं कोवळं ऊन झेलत आम्ही भटके चालत होतो. रस्ता बर्यापैकी धोपट आणि रुंद. बहुतेक गाडी मार्ग तयार होण्याच्या मार्गावर ? पहिल्या डोंगर माथ्यावर येउन पोहोचलो. खालचे ठाकूरवाडी गाव आणि सर केलेला गाडी रस्ता न्याहाळीत,कोवळ्या सूर्यकिराणांचा आणि सह्याकड्यांचा लपंडाव यांचा मनमुराद आनंद लुटत होतो. डाव्या बाजूला प्रबळगडाचा उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होता आणि डोंगराआड सुर्यनारायण हळू हळू वर येत होते. सुर्य जसा जसा वर येतोय तसं वातावरण उष्ण व्हायला लागलं होतं आणि कोंकणात असल्यामुळे वरून दमट. 



पुढे जाऊन एक देउळ लागलं. देउळ नाही म्हणता येणार. एका मोठ्या दगडात गणेशाची आणि हनुमानाची मूर्ती कोरल्या होत्या. नमस्कार करून पुढे निघालो. बुरुजासारखा सारखं काहीतरी दिसलं. तिथे पोहोचलो तर एक पडकी भिंत,हीच ती जी खालून बुरुजासारखी भासत होती. बाजूला वडाचं मोठं झाड आणि झाडाभोवती बांधलेला पार. मस्त दिसत होतं. आणि खालचं दृश्य तर अजूनच भारी! थोडा वेळ थांबून चालत प्रबळमाची वर पोहोचलो. 


थोडं पुढे गेलो आणि कलावंतीण बुरुजाचे प्रथम दर्शन झाले. एक नंबर. आपसूकच मुखातून गौरवोद्गार निघाले. बुरुजावरून कलावंतीण आमचं स्वागत करताहेत असा उगीचच भास झाला. "यावं ,मावळ …. आला $$. कसा आहेसा ? काय तरस नाही ना झाला नवं ? खाली माचीवर थोडसं चार घास खावा आणि यावा मग आमच्या भेटीला बुरुजावर … काय ? 

कलावंतीणीच दर्शन होताच चालण्याचा हुरूप वाढला. उजव्या बाजूला प्रबळ गडाचा माथा आणि दोहोंच्या मध्ये इंग्रजी व्ही आकाराची खिंड. नयनरम्य दृश्य ! माचीवर पोहोचताच ठाकरांच्या वाडीत शिरलो.  



एका घराच्या अंगणात निवांत जाऊन बसलो. अंगणात कोंबडीची छोटी छोटी पिल्लं खेळत होती. घराच्या बाजूला वीटभट्टी होती आणि आजूबाजूला ठाकरांची पोरं खेळण्यात दंग होती. आजोबांनी पाणी आणून दिले. हात पाय धुवून थोडं हुशार झालो. आता भुका पण लागल्या होत्या. आजोबांकडे जेवणाची चौकशी केली असता त्यांनी हाताने इशारा करून त्या घरी जाण्यास सांगितले. 

तेथे जेवणाचं सांगून आम्ही बुरुजावर जाण्याचं ठरवलं. बुरुजावर जाण्यास माची वरून साधारण पाऊण तास लागतो. १५ मिनिटात आम्ही कलावंतीण आणि प्रबळगडामधल्या खिंडीमध्ये पोहोचलो. हीच ती प्रसिद्ध खिंड,ज्याच्यामधून सुर्य अस्ताला जातो माथेरान वरून भास होतो . ज्या सूर्यास्त सोहळ्यासाठी पर्यटक माथेरानच्या सनसेट पोइंत वर गर्दी करतात . या खिंडीतून खाली पूर्वेकडे पायवाट जाते ,ती सरळ माथेरान ला. एका बाजूला कलावंतीण आणि दुसऱ्या बाजूला प्रबल गडाचा माथा. 




खिंडीमधून बुरुजाचा अंदाज घेतला. आमच्यापुढे तीन ट्रेकर गप्पा मारत बसले होते . कदाचित बुरुज उतरून झाला असेल. बुरुजाची उंची तेवढी वाटत नव्हती. माध्यान्हीचा सुर्य डोईवर तळपत होता. आम्ही चढायला सुरुवात केली. घसारया वरून थोडं चढत गेलं की दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. कुठे दीड फुटाच्या ,कुठे दोन ,कुठे अडीच फुट उंचीच्या. पायऱ्यांवरून चढताना मजा वाटत होती आणि भाजत पण होतं . बाकी दगडांमध्ये पायऱ्या बनवणारयांची कमाल ! 

दीड फुट -दोन फुट करत करत आम्ही बुरुजावर चढलो. बुरुजावर चढल्यावर एक मोठा दगड दिसतो . ज्याला ट्रेकिंग च्या भाषेत रॉक patch असे म्हणतात . थोडी कसरत करून आम्ही बुरुजाच्या सर्वोच्च शिखरावर येउन पोहोचलो. 






कलावंतीण दुर्ग. पुणे-मुंबई हमरस्त्यावरून  दृष्टीस पडणारा आणि माथेरानच्या डोंगरावरून दिमाखात आपल्यावर आपलं लक्ष आहे याची  जाणीव करून देणारा बुरुज. जिच्या साठी हा बांधला तिच्या नावावरूनच या बुरुजाचे नाव पडले. शिखरावरून आपल्याला दक्षिणेकडे प्रबळगडाचा माथा,इरशाळगड,मनेकगड,पूर्वेकडे माथेरान डोंगर,उत्तरेकडे चंदेरी,उत्तर-पश्चिमेकडे पेबचा किल्ला,पश्चिमेकडे मुंबई शहर असा चौफेर मुलुख दृष्टीस पडतो.अर्थात हे सगळं पाहायला वातावरण स्पष्ट असायला हवं.  प्रबळमाचीवारचे ठाकर लोक होळीला येथे त्यांच्या पारंपारिक पद्धतीने शिमगा साजरा करतात. 


थोडा वेळ फोटो सेशन आणि हातात भगवा घेऊन जल्लोष केला आणि खिंडीमध्ये उतरून छोटीसी पोटपूजा केली. प्रबळमाची कडे चालायला लागलो. 

हा ब्लॉग वाचल्याबद्दल मनापासून आभार,पुढचा भाग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.
 
  

Keep trekking, discovering Sahyadri and yourself with WILD TREK ADVENTURE CLUB,PUNE