ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "12 जुन 2015" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ जुन २०१५ पान क्र. ७० च्या पुढे(click here)
(ट्रेक : अस्वलखिंड - कामथा घाट - महादेव मुरा - ढवळे - ढवळे घाट - मढीमहाल)
शनिवार -रविवार अगदी ऑफिस ला दांड्या मारून सह्याद्रीत रमणाऱ्या टोळीतला मी एक स्वच्छंदी भटक्या. या अशा कित्येक भटकंती स्वहस्ते नोंदविलेला हा माझा ब्लॉग.कधी कधी भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच..चला!
ब्लॉगस्वरूप हा लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या "12 जुन 2015" या अंकात प्रकाशित झालेला आहे , त्याची epaper -link : लोकप्रभा अंक १२ जुन २०१५ पान क्र. ७० च्या पुढे(click here)
(ट्रेक : अस्वलखिंड - कामथा घाट - महादेव मुरा - ढवळे - ढवळे घाट - मढीमहाल)
जांबा अन् आंब्याच्या देशात - पूर्वार्ध येथुन पुढे
दिवसभराचा सर्वांना रापुन काढलेला प्रवास आणि बोंबलत फिरायची खाज आता कुठे थांबली.उन्हाने चांगलेच करपल्या गेलेलो.जयगड जेट्टीवर आमचा नंबर यायला अजुन बराच अवकाश होता.किल्ल्यावरुन निघताना रस्त्यावरचा "वेळणेश्वर 20 किमी" हा बोर्ड बघुन वाटलेलं,रस्ता असेल.पण नाही या मार्गात लागणाऱ्या जयगड ते तवसाळ या बोटफेरीचा हिशोब त्या 20 किमी मध्ये नसावा.असो,शेवटची बोटफेरी रात्री 10 ला असते ही नवीन माहिती मिळाली आणि आम्ही इथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे साधारण साढ़ेसहा झाले असावेत.या बोटफेरीने जवळजवळ 70 किमी चा गणपतीपुळे ते हेदवी असा भातगावमार्गे प्रवास कमी होतो.त्यामुळे गाडीत बुड टेकवुन बसायचा कंटाळा आला असेल तर ही जेट्टी म्हणजे तेराव्या महिन्यात लागलेली लॉटरीच.भुका लागल्या होत्या आणि नंबर यायला उशीर होता,थोडी पोटपूजा करून घ्यावी हा विचार करून शेजारीच असलेल्या हॉटेल मध्ये पाय टाकला. गरमागरम चपाती-आमलेट अन् फक्कड चहा! बेत आला जमून आणि प्रवासाचा सारा शीणच निघुन गेला.चहाची चव चाखून योगिता तर अमृत मिळाल्यासारखी आनंदली.चहा- आमलेटचा आस्वाद घेत बसलोय.
© Sandip Wadaskar । © WTA | भटकंती…सह्याद्रीच्या कुशीत । All Rights Reserved
खाडीतल्या छोट्या छोट्या लाटा वातावरणातला जिवंतपणा वाढवत होत्या,बाकी सारे शांत-निवांत.हॉटेलवरही आम्हा चौघाशिवाय कोणी नाही.पलीकडे पॉवरप्लांटच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडून खाडीची शोभा वाढवत होतं.बोलता बोलता हॉटेलमालकाशी गप्पा रंगल्या,आंबे मिळतील का? याची चौकशी केली तर साळवीसाहेबांनी त्यांच्या बागेतलं फळ (अस्सल कोंकणी लोकं आंब्याला "फळ" म्हणतात) कसं बाधत नाही इथपासून ते झाडे लावताना मास्यांचा चुरा कसा टाकला इथपर्यंत.अंधारामुळे आता न दिसणाऱ्या झाडांचा जवळपास पाच वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर आला.त्यांच्या आजोबांपासुन चालत आलेली रोपं लावायची पूर्वापार पद्धत आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा,चांगली माहिती मिळाली. बराच वेळ चाललेलं साळवी साहेबांचं आंबा नैसर्गिकरीत्या कसा पिकवला जातो,या विषयावरील व्याख्यान माझ्या "आंबे कसे दिलेत,घ्यायचे होते?" या प्रश्नाने थांबलं.हुश्श! पण घरच्या वाडीतले आंबे संपले असल्यामुळे एक-दोघांना फोन करून जमवण्याचा त्यांचा निष्फळ प्रयत्न करून झाला,तोपर्यंत परतीची बोटफेरी जयगडाकडे येताना दिसली. साळवी साहेबांचा आणि आमलेट बनवून देणाऱ्या वाहिनींचा निरोप घेऊन बोटीत चढलो. आंबे मिळाले नाहीच.
| दाभोळ खाडीच्या पार्श्वभूमीवर गोपाळगडाची तटबंदी |
तुरुकवाडी! रस्त्यावरच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायतीचं बोर्ड बघुन प्रसाद पुटपुटला,"आयला,हे नाव कुठंतरी वाचण्यात आहे " मग एकदम डोक्यात प्रकाशच पडला. हे तर पन्हाळा - विशाळगड या मोहिमेत महाराजांनी पायाखाली तुडविलेल्या मातीचे गाव ! मनोमन नमस्कार झडला.आंबा घाटातल्या पितळी गोमुखातलं झिरपणारं पाणी घशाखाली उतरवून पुढे निघालोच तोवर विशालगडानेही दर्शन दिले. नावाप्रमाणेच आडवा पसरलेला गडमाथा गडदाखल होण्याचं आवतण देऊन गेला. त्याची उंचीही काही कमी थोडकी नव्हे ! उजवीला दरीपलीकडे हिरव्यागार वनश्रींने नटलेला चांदोली अभयारण्याचा माथा खुणावत गेला. निरभ्र आकाश,आंबा घाटाचा गुळगुळीत रस्ता आणि नेहमीप्रमाणे रंगलेला गप्पांचा फड,त्यात आमच्या रेश्मा मॅडमची रात्रीच्या झोपेची राहिलेली थकबाकी ! बाईसाहेब मध्येच जाग्या व्हायच्या आणि कुठे -कुठे किल्ला असं काहीबाही विचारायच्या. किल्ला तोपर्यंत घाटाच्या वळणावर नजरेआड व्हायचा.
एकंदरीत घाटातला सुंदर प्रवास जगतच आम्ही निघालो होतो आंब्याच्या देशात! चाखाया कोंकणचो राजा,फळांचा राजा. अनुक्रमे आंबा अन् दाभोळे घाट उतरून रत्नागिरीत प्रवेश केला तेव्हा मध्यान्हीचा सूर्यनारायण डोक्यावर वीज पडल्यासारखा तळपत होता.पुण्यातून पहाटे जरी निघालो असतो तरी देवाचा हा रोष टाळणं जरा मुश्किलच होतं.तरीही उन्हं पडायच्या आधीच घराचा उंबरठा ओलांडून निघायचा,आमचा बेत काही अंशी फसलेलाच.प्रवास हा जवळपास एक-सव्वा तास उशीराच सुरू होता.पूर्णगडाचा रस्ता विचारून त्या वाटेला लागलो तेव्हा घड्याळजी दीडच्या ठोक्यावर येऊन थांबलेले. रस्त्यावरूनच पावसच्या स्वामी स्वरूपानंदांना नमस्कार करून पूर्णगडाकडे मार्गस्थ झालो.
| पूर्णगड वाडी - पारंपरिक जांबा दगडाची घरं |
हरीश्चंद्रगड ! टोलार खिंडीतून गडाच्या नैसर्गिक अन् अभेद्य अशा सात - आठ डोंगरी भिंतीतला एक भला मोठा डोंगर चढून उतरलो की, डाव्या बाजूला माथ्यावर औरस - चौरस असा बालेकिल्ला नेहमीच खुणावत असतो. "हा बालेकिल्ला" असं जुजबी स्थलनिर्देश हरिश्चंद्रगडाच्या या वाट्याला आलेलं आहे. कित्येक वेळा गडाची ही वाट जवळ केली पण "हा बालेकिल्ला" ह्याच्या पलीकडे कधी जाणं झालं नाही. त्याची तटबंदी नेहमीच साद घालायची. कधीतरी त्यावरील भगवा डौलात फडफडायचा,म्हणायचा "इकडे पण वळु देत,तुमची पावलं ! कधीतरी". पुढच्या वेळेस आलो की बालेकिल्ला बघून येऊच,स्फुरण चढायचं पण तो योग जुळून यायला तब्बल चार वर्षे वाट पहावी लागली. आणि चांगल्या गोष्टींसाठी वाट पाहिलेली बरीच,नाही का ? असो,तर प्रवास सुरू होतो आमच्या खुप दिवसांपासूनच्या रखडलेल्या मोहीम जुन्नर दरवाज्याचा. अनायासे बालेकिल्ला पण खिशात पडणार या विचाराने सकाळी सकाळी शिवाजीनगरला राजुरच्या बस मध्ये पार्श्वभाग टेकवला,तेव्हा हाडांना झोंबणारी पौषाची थंडी मी म्हणत होती. "सॅन्डया,गारठला काय ?",असे म्हणत नाशिक फाट्यावर प्रसाद अन् योगिने आणि आळे फाट्यावर ईश्वर काकांनी गाडीत एंट्री मारली तेव्हा खऱ्या अर्थाने "येस्टी"चा प्रवास सुरू झाला. गाडीत बसल्या बसल्या खिरेश्वरच्या वाटेवरून पाचनईला घसरलो. सर्वात सोप्या वाटेने चढुन, सर्वात दुर्गम अशा जुन्नर दरवाज्याने उतरायचं ठरलं. अजून एक म्हणजे,सोपी - सोपी म्हणत राहिलेली पाचनईची वाटही उलगडणार म्हटल्यावर सोनेपे सुहागा !राजूरात पाचनईला जाणाऱ्या वाहनांची मारामार,पण एक जण एका "हरियाली"त तयार झाला आणि एकदाचं आम्ही गडाच्या पायथ्याशी धडकलो तेव्हा दुपारचे तीन झालेले. उन्ह असली तरी गारवाही कमी नव्हता. घरून आणलेल्या शिदोरीवर ताव मारून झाला आणि गडाकडे रवाना झालो. पाचनई हे डोंगराच्या कुशीतलं छोटसं गाव, कोंकणकड्यावरील आमचा मैतर,भास्कररावांचा गाव ! बऱ्यापैकी उंचीवर असल्याने इकडुन गडाची वाट कमालीची कमी झालीये, गावात वस्ती बादड/बदाद आणि भार्मल यांचीच जास्त ! गावाच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगडाचा डोंगर तर उत्तरेला पाबरगड- घनचक्कर ची चक्कर आणणारी अफाट डोंगररांग. पल्याड भैरोबा खुणावत असतो अन् पुढ्यात दिसतो तो कलाडगड,आपल्या समोरील छोट्या सुळक्यासोबत निवांत गप्पा हाणत बसलेला.एव्हाना वाकडी सुळक्याच्या पलीकडे कात्राबाईच्या खिंडीनेही दर्शन दिलेलं असतं. आस्ते कदम करीत निघालोय. छोटं टेकाड चढुन लहानस्या सपाटीवर पोहोचतो,उजव्या बाजुला मंगळगंगेची दरी अन् डाव्या बाजुला एखादा अलगद आणुन ठेवल्यासारखा एक भलामोठा कातळ, त्यामधील मोठ- मोठ्या कपारी विसाव्यास उत्तम. हाताशी असता वेळ तर दिली असती ताणुन ! येथूनच पहिल्यांदा कलाडमागे लपलेल्या आजोबांनी दर्शन दिलं आणि कृत्याकृत्य झालो. तिथेच गारगार लिंबूपाणी गट्टम करून चालते झालो तोच मंगळगंगेचा (मळगंगा) पाट आडवा आला. आता कोरडा पडलेला पाट,पावसात तुडुंब भरून वाहत असेल यात वादच नाही. पण प्रवाहामुळं आकाराला आलेल्या कातळ-तळ्याजवळ निवांत क्लिक्क्लिकाट झाला. पलीकडील दरीत चांगला दहा - एक फूटाचा फॉल, पावसातल्या फोटोग्राफिसाठी मस्त वाव होता. परत एकदा श्रावणातल्या सरीत ही वाट जवळ करायलाच पाहिजे. डोक्यात येऊन गेलेला उगाच आपला एक पावसाळी प्लॅन ! अजुन एक टेकाड चढुन माथ्यावर पोहोचलो तेव्हा दिवाकरराव आपला दिवसभराचा कार्यभाग आटोपतं घेत होते. हरिश्चंद्रेश्वरावरील भगवा,नारायणाची कलती उन्हे पिऊन जोमात फडफडत होता. डाव्या बाजुला बालेकिल्ला खुणावुन गेला.
![]() |
| पाचनई च्या वाटेवरून कलाडगड,रतनगड ,खुटा आणि घनचक्कर डोंगररांग |
साद सह्यसागराची....निवती,सिंधुदुर्ग ! येथुन पुढे ……
तारकर्लीची पांढरी वाळू चांगलीच मानवलेली दिसत होती, कारण रात्रीची गार- गार वाळूला टेकवलेली पाठ घेऊन रिसोर्ट मध्ये येऊन झोपलो ते सकाळीच जाग आली तेव्हा प्रसाद अन् के माझ्या वाढलेल्या दाढीवर फोटोशूट करत होते. कुणाचं काय तर किसका कुछ ! आवरुन निघालो थेट रॉक गार्डन. मसुरे रस्त्याला शिवकालीन रामेश्वराचे दर्शन घेऊन सकाळचा नाश्ता आटोपून घेतला,वहिनी साहेबांचा कोंकणी धीरड्यांचा बेत राहूनच गेला होता. वडाप्पावर ताव मारून पुढच्या प्रवासाला लागलो. दुतर्फा हापसांनी लगडलेली आमराई पाहून मोह आवरला नाही,बाकी मसुऱ्याच्या अमराई ह्या प्रसिध्दच आहेत. गाडीतुन उतरून आम्ही आंब्याची झाडं न्याहळीत उभे होतो,एकेका झाडाला हजारोंनी आंबा ! कुणीतरी त्यात विचारलं,आपण तोडू शकतो का ? त्यावर कुणाची तरी कॉमेंट,हम्म !! आपल्या बापसाचंच आहे ना ! फणस पण लगडलेत,कसले भारी ! हे आमचं चर्चासत्र चालु असताना,एका मावशीने आम्हाला हटकलं,"तुका हापूस हवाय ?" अंगावर टिपिकल कोंकणी पेहेराव अन् मुखात रसाळ कोंकणी ! हो,आम्ही. "ये बाबु येका सावंतांकड घेऊन जा",असे म्हणत मागून येऊन बाजूलाच उभ्या असलेल्या ऑटोवाल्याला आमच्या दिमतिला दिलं. अहो मावशी फणस मिळेल का ?,आमच्या वहिनीसाहेब. फणसो !,यंदा फणसो आलाच नाsssय! मावशीसोबतचा हा गोड संवाद उरकून बाबुला फॉलो करत सावंतांच्या घरी पोहोचलो. सावंतांचं पारंपरिक कोंकणी घर आणि पडवीत आंब्याची रास,पैकी खास एका बंद खोलीत. देवगड हापूस हवाय,आमचा कार्यभाग ! अहो,इथली सगळी फळं म्हणजे देवगडच. किती पाहिजे ?,सावंतांची मुलं आम्हाला खोली जवळ घेउन गेली. काही तयार,काही कच्चे अशी करत प्रत्येकाने दोन - दोन,तीन - तीन या हिशोबाने पेट्या भरल्या अन् गाडीची बाल्कनी गच्च करून टाकली. खरेदी करून झाली,खाऊन झाली अन् सावंतांचा निरोप घेऊन आम्ही मसूऱ्याच्या उपेक्षित आणि दुर्लक्षित अशा दुर्गलेण्याकडे मोर्चा वळवला. अर्थातच सावंतफोंडाचा किल्ले भरतगड ! गाड्या थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जातात. पंधरा - वीस पायऱ्या चढलो की किल्ल्यात प्रवेश. आत पोहोचल्या पोहोचल्या अवाक झालो,कारण किल्ल्याच्या आवारात हापूस आंब्यानी लगडलेली झाडं किल्ल्याचा सगळा परिसर झाकोळून होती ! ह्या असा हात वर केला की हातात आंबा. चांगली तोंड रंगेपर्यंत,मनगटांवर ओहोळ उमटेस्तोवर पोटभरून चापली. किल्ल्याच्या आतली ही आमराई खासगी मालमत्ता असली तरी,तिथल्या माणसांनी आम्हाला हटकलं नाही,हे विशेष !