मावळातुन कोंकणात -एक भन्नाट सह्यभ्रमण

6 comments:

© Sandip Wadaskar
आम्ही एवढे गड- किल्ले भटकतो. कधीतरी कुणीतरी विचारतं "तुम्हाला/तुला काय मिळतं किल्ले, डोंगरमाळ पालथे घालुन ?" यांना प्रतिक्रिया देताना विचार पडतो की कसं सांगावं,आम्हाला काय मिळतं ते. म्हणजे मी शब्दात सांगूच शकत नाही. याचं उत्तर तुम्हाला स्वतःला भटकंती केल्यावरंच कळेल, झोपेचं खरं सुख सह्याद्रीच्या गार जमिनीला पाट टेकल्यावरच कळेल,तिथल्या सायंकाळचा गारवा,कातळातले अमृततुल्य पाणी,डोंगरमाळ पालथे घालताना उमजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा,भूतकाळातल्या गुजगोष्टी सांगण्यास आतुर असलेली गुहांमधील निरव शांतता,मोहिमेवरून आल्यानंतर आपल्या महाराजांची पंचारती ओवाळण्याच्या प्रसंगाचे मुक साक्षीदार असणारे किल्ल्यांवरील बुलंद दरवाजे,दुर्गांची दुर्गमता जाणवणारे बेलाग सह्यकडे,असं बरंच आणि खूप खूप! इतिहासाबद्दल वा महाराजांबद्दल थोडेसे जरी वाचनात आले ना की संबंधित किल्ल्याला भेट दिल्याशिवाय चैनच पडत नाही. मग सुट्ट्यांची जुळवाजुळव आणि भिडूंची पण. तरी आम्ही नशीबवान,आठवड्याअंती दोन सुट्ट्या जोडुन असतात. असो. असंच एका ट्रेकला असताना मोहीम आखल्या गेली होती,"पाच किल्ले-दोन दिवसात".तिकोना-तुंग-लोहगड-विसापूर-कोरीगड. अख्खं मावळ. पण गँगला मोठ्या ट्रेकमध्ये कमीत-कमी एक तरी घाट चढण्याची वा उतरण्याची इतकी सवय पडलीये की त्याशिवाय ट्रेक केल्यासारखे वाटतच नाही. प्रसाद ने मोहिमेत बदल केला "तिकोना-तुंग-घनगड-नाणदांडघाट-सुधागड" आणि झालेच तर सवाष्णी घाटाने तैलबैल!

© Sandip Wadaskar
ऑफिस वगैरे आटोपून घरातुन निघेपर्यंत सगळ्यांना संध्याकाळचे सात-साढेसात झाले आणि लोकल पकडून स्वारी कामशेतला पोहोचली. पवनानगर गाठायचं होतं. मुंबई-पुणे हमरस्त्याच्या बाजुला थांबुन भटकी गँग नेहमीप्रमाणे अनोळखी वाहनांना हातवारे करत उभी होती. गाडी मिळेपर्यंत बाजूच्याच टपरीवर प्रत्येकांनी मागे-पुढे करत एक-एक दाबेली हाणली आणि थोड्या वेळाने एकाने ट्रक थांबवला. ट्रक मध्ये पटापट उड्या पडल्या,पवनानगरचा प्रवास सुरु झाला. रात्रीचं काही दिसत नव्हतं म्हणुन बसायला शक्य झालं. कारण ट्रक नुकताच वीटा वाहून आला होता,हे नंतर कळलं.प्रवासाचा आनंद पण घेत होतो आणि ट्रकमधल्या लाल धुळीला शिव्या पण घालत होतो.अर्ध्या तासात पवनानगरला पोहोचलो.रात्रीचे साधारण १०-१०:३० झाले असतील. गावातल्या पारावरची वर्दळ जरा कमी झाली होती.रात्रीच्या प्रहरी या भागात भुरट्या चोरांचा सुळसुळाट असतो,असं ऐकुन होतो. तसंही या चोरांना आम्हा भटक्याकडे मिळणार तरी काय होते? गावकऱ्यांना वाट विचारायला गेलो तर त्यांनी देखील चार मनाचे बोल ऐकवायला सुरवात केली. रात्रीचा गावातच मुक्काम करावा लागणार की काय ? हा विचार करत असतानाच एका आजोबांनी ,"चार-पाच जण आहात तर जाऊ शकता" असं सुचवुन तिकोन्यावरच्या सरकारी दिव्याकडे बोट दाखवले. तिकोना पेठची वाट धरली. रात्रीच्या गूढ शांततेत पवना नदीचा पुल ओलांडुन पाऊन-एक तासात पेठ गाठलं. पेठेत कुत्र्यांनी भुंकून आमचे स्वागत केले. दाट झाडीतली गाडीवाट पार करून चढणीला लागलो. भुक लागली होती पण माथा गाठूनच जेवण करायचं असं ठरल्यामुळे न थांबता अंतर कमी करत होतो. अर्ध्या-पाऊन तासात छोटा दरवाजा ओलांडल्यानंतर पोहोचल्या पोहोचल्या गार वाऱ्याने आमचे स्वागत केले.सपाट जागा दिसली,पथाऱ्या पसरल्या. नेहमीप्रमाणे वाघ बंधूंनी घरून जेवणाचा डबा आणलेला. जेवण उरकलं आणि टेंट टाकुन झोपी गेलो.

© Sandip Wadaskar
सकाळी जाग आली तेव्हा तांबडं फुटायला सुरवात झाली होती.उत्तरेकडे लोहगड-विसापूर,पश्चिमेकडे पवनेच विस्तीर्ण जलाशय आणि पल्याड तुंग असा चौफेर नजारा,मन एकदम हर्शोल्हासित झालं. लगेच आवरून गड फिरायला सुरवात केली.गडाचा घेर फार कमी. तुंग-तिकोना-लोहगड-विसापूर-कोरीगड या दुर्गपंक्तीतला मावळातला एक छोटेखानी किल्ला! हे किल्ले सहसा घाटवाटांवर व मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले.पैकी तिकोना-तुंग हे तर खूपच छोटे किल्ले.आम्ही बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केली. मोठ्या टाक्या शेजारील गुहेत एक साधूबाबा वस्तीला होते. पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. थोडं पुढे गेल्यावर चुन्याचा घाना दिसतो,याचा उपयोग बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी होत असे.बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढायला लागलो.कातळातल्या खोदीव पायऱ्या चांगल्या दमछाक करणाऱ्या आहेत.आम्हाला दरवाजा दिसला की आम्ही खुश होतो. नेहमीप्रमाणे बालेकिल्ल्याच्या या भव्य प्रवेशद्वाराने आम्हाला खुश केले. बुरुजाची तटबंदी तर अप्रतिम! एवढ्याश्या जागेत एवढं भक्कम बांधकाम कसे काय केले असतील याचाच विचार आम्ही करीत होतो. कातळ आणि तटबंदीच्या बेचकेतुन तुंग आणि पवनेचा जलाशय मोठा मस्त दिसत होता.पायऱ्या चढताना दमवणूक झाली खरी पण उजव्या बाजूच्या कातळातले कोरलेले टाके बघुन थकवाच नाहीसा झाला. अमृततुल्य पाणी पिऊन निवांत थोडा वेळ विसावलो. सूर्याची सोनेरी किरणे आता माथ्यावर पडायला सुरवात झाली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भराभर उर्वरित गड पाहण्यास सुरुवात केली. पुढे गेल्यावर भग्नावस्थेत असलेली पिंड आणि नंदी,बाजूलाच वितंडेश्वराचे मंदिर आहे. कदाचित या शिवालयामुळेच किल्ल्याचे नाव वितंडगड पडले असावे. पिंडीच्या मागच्या बाजूला गेलो की कातळात खोदलेल्या सुरेख गुहा आहेत. पावसाळा सोडुन राहण्यास उत्तम मुक्कामाचे ठिकाण! 










© Sandip Wadaskar
किल्ल्याच्या घेऱ्याप्रमाणे याचा इतिहास पण तोकडाच. शिवाजी महाराजांनी हा किल्ला निजामशाहीतून स्वराज्यात दाखल केला आणि दोन-तीन वर्षांनी नेताजी पालकरांची इथे नेमणूक झाली. पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी हा एक होता. नंतरच्या काळात संभाजी-अकबर भेटीदरम्यान अकबर इथे राहावयास आला होता.बाकीच्या किल्ल्यांसारखीच इंग्लिश-मराठे युद्धात  या किल्ल्याचे सुद्धा बरेच नुकसान झाले. सर्वोच्च माथा चढुन आम्ही डोंगर-किल्ले ओळखायला सुरुवात केली. अर्थातच ठळक दिसणारे लोहगड-विसापूर उत्तरेला,समोर तुंग-कठीणगड(आमचे पुढचे लक्ष्य!),पवना नदीवरचा विस्तीर्ण जलाशय! वाह ! मावळातलं हे विहंगम दृश्य डोळ्यात साठवत तिथेच बसुन रहावसं वाटत होतं,पण वरून सुर्यनारायणाने तापायला सुरवात केली होती. आता काढता पाय घेणे भाग होते. गडाच्या दुसरया दांडाने उतरण्यास सुरवात केली. झुडपातून घसरडी वाट काढीत तिकोना पेठेत पोहोचलो.


© Sandip Wadaskar
सकाळची न्याहारी आटोपली आणि वाहन न मिळाल्यामुळे जवण गावाचा रस्ता धरला. तिकोना पेठ ते जवण हे अंतर सुमारे ४ किमी. सखा तिकोना सोबतीला होताच. डावीकडे तिकोना,उजवीकडे तुंग असे ठेवीत पाऊन-एक तासात आम्ही जवण गावात पोहोचलो. पारावर लोकांची सकाळची घाई-गडबड चालली होती,आम्हाला येथुन तुंगवाडीला जायचं होतं. सुमारे १० किमी चं अंतर. पायी चालायला हरकत नव्हती पण तीन तास गेले असते. शेवटी एका रिक्षावाले काकाला ठरवुन मोरवे गावाची वाट धरली. पवना जलाशयाला वळसा घालून अर्ध्या एक तासात तुंगवाडीत पोहोचलो. गडाच्या पायथ्याकडे चालायला लागलो. उन्हं चांगलं जाणवत होतं. वाटेत लागलेल्या एका आजोबाच्या घरी थोडं विसावून,पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि शेतातल्या वाटा तुडवत पायथ्याकडची भटकंती सुरु झाली.पायथ्याला पोहोचलो तेव्हा ३-४ मोठमोठ्या झाडांच्या शीतल छायेनी उन्हाचा आलेला शीणच गायब झाला. वडाच्या झाडासारखे दिसणारे वृक्ष. लटकलेल्या असंख्य पारंब्या. आजूबाजूला दाट झाडीत विसावलेले मारुतीचे मंदिर. जागाच मस्त होती. जेवायच्या आधी गड फिरून यायचं ठरवलं. आवारात सह्याद्री प्रतिष्ठान ने किल्ल्याच्या माहितीचे फलक लावलेले आहेत. पालापाचोळ्यात पडलेल्या दगडी गोळ्याने लक्ष वेधुन घेतले,कितीतरी वेळ आम्ही त्याचा विचार करीत होतो. गड चढायला सुरुवात केली. 
© Sandip Wadaskar
तिकोन्यावरून पाहिले तर तुंग असा उत्तुंग सुळक्यासारखा भासतो. गड चढायचा कसा हाच विचार पडतो. पण तुंगवाडीत पोहोचल्यावर गोमुखी प्रवेशद्वार रस्त्याचे मार्गदर्शन करतो. रस्ता कळल्यावर दाट झाडीची वनराई सोडुन उघड्या बोडक्या माथ्यावर कूच केले. थोडंसं चढावर गेल्यावर पायथ्याच्या हिरवाईने नेत्र सुखावले,पण तेवढंच उन्हामुळे डोकं तापायला सुरुवात झाली. अर्ध्या पाऊन तासात पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. दरवाज्याची बरीच पडझड झालीये,कमानच तेवढी शाबूत आहे. आणि उजव्या बाजूला तटबंदी. पुढे गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार लागते,गोमुखी पद्धतीने बांधलेलं. याची परिस्थिती तर अजूनच भयंकर आहे. बाजूलाच हनुमानाचे कोरलेले दगडी शिल्पं आढळते. माथ्यावर पोहोचलो. डाव्या बाजूने सर्वोच्च माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे आणि उजव्या बाजूला गणेश मंदिर. मंदिरात महाराजांचा फोटो ठेवला आहे. जवळच सदरेची जागा आणि टाकं. पाणी पिण्यास अयोग्य. गणेशाला नमस्कार करून सर्वोच्च माथा गाठला. बालेकिल्ल्यावर तुंगाई देवीच्या देवळाशिवाय पाहण्यासारखे काही नाही. आणि जागा पण खूप कमी. पण हो इथे आल्यावर अख्ख्या मावळाचे विहंगम दृश्य दृष्टीस पडतं. लोहगड,विसापूर,मागे तिकोना अशा इतर मावळ सख्यांची भेट होते. पवनेच विस्तीर्ण जलाशय,आणि पुढ्यात हुबेहूब तुंग सारखा दिसणारा खोटा तुंगी लक्ष वेधून घेतात. आणि हो अजुन एका जागेकडे आपले लक्ष जाते ते म्हणजे बालेकिल्ल्याच्या कातळात खोदलेली गुहा. कदाचित इथे बसुन पहारेकरी मावळ परिसराचे निरीक्षण करीत असावे. मधोमध असणाऱ्या खांबावर भगवा वाऱ्याने फडफडत होता. थोडा वेळ थांबुन गड उतरायला सुरुवात केली. वनराई मध्ये विसावलेल्या मारुतीच्या मंदिरात परतलो. तहानलाडू भूकलाडू संपवले. गार सावलीत मस्तपैकी पंधरा-वीस मिनिटे पडी टाकुन आराम केला. आमचं पुढचं लक्ष्य होतं घनगड. 









© Sandip Wadaskar
पायथ्याचे गाव येकोले. पण त्यासाठी सर्वात आधी लोणावळा-amby valley रस्त्यावरील ८ किमी अंतरावर असलेलं घुसळखांब गाठायचं होतं. तुंगवाडीत,इथे बस येते पण वेळ चुकली होती. पायी गेलो असतो तर परत दोन तास गेले असते. गावात एकमेव उभी असलेली गाडी आणि बाजूलाच झोपडीत वामकुक्षी घेत असलेला ड्रायव्हर दिसला. त्याला पटवुन आमचा प्रवास सुरु झाला. तेथुन पेठ शहापूर टेम्पोने. आता परत भांबुर्डे ला जायला कुठली गाडी मिळते का? याचा विचार करीत बसलो. रस्त्यावरूनच किल्ले कोराईगडाची अभेद्य तटबंदी लक्ष वेधुन घेत होती. मागच्या आठवड्यातच इंद्रा आणि प्रसाद गडाला भेट देऊन आले होते. वाहनाची वाट पाहता पाहता कंटाळा आला होता,वाटत होतं यावं गडावरून फेरफटका मारून. आणि सुदैवाने एका माणसाने त्याची गाडी थांबवली आणि अर्ध्या तासात येकोले गावाच्या फाट्याजवळ पोहोचलो. संध्याकाळचे साढेतीन-चार झाले असावेत. घनगडाकडे चालायला सुरुवात केली. फाट्यावरूनच चौकोनी आकाराचा घनगडचा आणि त्याला खेटूनच डाव्या बाजूला म्हातोबाचा असे दोन डोंगर दृष्टीस पडतात. प्रसाद आणि निखिल पटापट पावले टाकत पुढे निघुन गेले होते. इंद्रा,प्रसन्न आणि मी एका आजोबांनी विचारपुस केल्यामुळे त्यांच्या सोबत गप्पा मारत उभे होतो. मग "कोण गावचे ?" वगैरे विचारपूस झाली,जवळच असलेल्या हापश्या वर तोंडावर पाणी मारून पुढे निघालो. पायथ्याजवळ पोहोचलो तेव्हा "शिवाजी ट्रेल चे मिलिंद क्षीरसागर सर इथेच आहे आणि आपण त्यांची भेट घेऊ. " असं प्रसाद म्हणाला. अरे वाह ! चला मग. 
© Sandip Wadaskar
पंधरा-वीस मिनिटे त्यांच्याशी मनसोक्त गप्पा झाल्या,मध्येच त्यांनी मागवलेल्या रानमेव्यानी गप्पांमध्ये अजूनच गोडवा आला. घनगडाचे संवर्धन यांच्याच अखत्यारीत चालू आहे. ऐतिहासिक किल्ल्यांकडे असणारे सरकारचे त्याचबरोबर आपल्यासारख्या जनतेचे दुर्लक्ष. अक्षरशः "किल्ला हा तुमच्या प्रशासकीय हद्दीत आहे" असे पटवून देण्यासाठी त्यांनी सरकारकडे मारलेल्या  फेऱ्या. मग शाळेतील,कॉलेज मधील विद्धयार्थ्यांना जमवुन उन्हाळी शिबीर, अशा माध्यमातुन किल्ल्यांच्या डागडुजीसाठी श्रमदान करवुन घेणे. अशा बऱ्याच गोष्टीवर गप्पा रंगल्या होत्या. शेवटी "तुम्हाला असे गडकिल्ले फिरतांना बघुन खूप आनंद झाला,असेच भटकत राहा" अशी कौतुकाची थाप आमच्या पाठीवर पडली. आम्हाला पण आनंद झाला. दुर्गसंवर्धनासाठी आयुष्य पणाला लावलेले अफलातुन व्यक्तिमत्व. शिवाजी ट्रेल चे संस्थापक आणि तरुणांसाठी प्रेरणादायी मिलिंद सरांची भेट,हा खरच मस्त अनुभव होता. 







© Sandip Wadaskar
आम्ही गडाकडे कूच केले. दाट रानातून वाट काढीत गारजाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. आजूबाजूला दाट झाडी असलेलं हे मंदिर मुक्कामाला पण मस्तच. मंदिरात sack ठेऊन गडाकडे निघालो.घनदाट झाडीने वेढलेला सह्यपर्वतावर वसलेला एक छोटेखानी किल्ला. सुरवातीलाच गडासंबंधी ऐतिहासिक नोंदी असलेला फलक शिवाजी ट्रेल ने लावलेला आहे.झाडीतून वाट काढीत आम्ही महादरवाज्याजवळ पोहोचलो. रंगरंगोटी केलेल्या दरवाज्यातुन आत गेल्या गेल्या भव्य कातळ कड्याने लक्ष वेधुन घेतले. कातळात असलेल्या गुहेत पण मुक्कामाला जागा मस्त! येथून वर जाण्यासाठी शिवाजी ट्रेल ने आता शिडी बसवलेली आहे,त्याआधी दगडात कोरलेल्या खाचांमध्ये पाय रोवूनच जावं लागत असे. शिडी पार केल्या केल्याच कातळात एक खोदीव टाके. पाण्याची चव नेहमीप्रमाणे सुमधुर! दक्षिण बुरुजाकडे वळलो आणि सह्याद्रीच्या तुटलेल्या कड्यांनी डोळेच  फिरवले. कडा उभाच खालच्या नाळेत कोसळला होता. बालेकिल्ल्यावर टाक्या व्यतिरिक्त बारमाही पाण्याची विहीर पहावयास मिळते. तैलबैलेच्या कातळभिंती लक्ष वेधून घेतात. 
© Sandip Wadaskar
किल्ले घनगड उर्फ येकोल्याचा किल्ला. कोरसबारस मावळातला वाघजाई आणि सवाष्णी घाटाचा पहारेकरी. किल्ल्याला इतिहास फारसा नाही. पुरंदरच्या तहात गेलेला तेवीस किल्ल्यांपैकी एक. पुन्हा स्वराज्यात दाखल होऊन छत्रपति राजरामाच्या काळापर्यंत मराठ्यांकडे  होता. नंतरच्या काळात कान्होजी आंग्र्यांकडून पेशव्यांकडे आला. पेशवे किल्ल्याचा उपयोग कैदखाना म्हणून करत होते. आणि नेहमीप्रमाणे कर्नल प्राथरच्या तोफेसमोर नतमस्तक होऊन ब्रिटीशांकडे गेला.

पुढ्यात सुधागड,सरळ अस्पष्ट असा सरसगड आणि सुधागड-तैलबैल-घनगड या त्रिकुटांच्या मधल्या दरीकडे आणि मावळत्या सुर्यनारायणाची सोनेरी किरणे झेलत आम्ही कितीतरी वेळ पहुडलेल्या सह्याद्रीकडे पाहत बसलो होतो. 

क्रमशः 

इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान : उत्तरार्ध

2 comments:
© Sandip Wadaskar

इरशाळगडाच्या सुळक्याच्या दर्शनाने कृत्याकृत्य झाल्यासारखे वाटत होते. इरशाळवाडीतून ठाकुरवाडीकडे चालायला सुरुवात केली. पुढल्या वेळेला आलो तर,वाडीतल्या शाळेत मुक्काम करण्याचा बेत मनात पक्का केला. पठारावर आलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता. समोर गाई चरण्यास सोडुन एक म्हातारे आजोबा उभे होते अन बाजूला एक चिमुकली हुंदडत होती . "बाबा,ठाकुरवाडीची वाट कुठुन आहे ?" मी विचारलं. "वाट न्हाय !",बाबा उत्तरले. "वाट नाही !" "म्हणजे वाट हाय,पण तुमास्नी समजणार न्हाय. ढोरवाटा बी लयी हाय ." ,इति बाबा. बहुतेक बाबाला आम्ही पोरं वाट चुकण्याची भीती वाटत असावी. विश्वासात घेत आम्ही त्यांच्याकडून वाट निश्चिती करून घेतली आणि वाट शोध मोहिमेसाठी निघालो. बाबांच्या म्हणण्यानुसार एक ओढ वजा नदी लागेल आणि ओढा पार केला की लगेच ठाकूरवाडी. आमची भटकंती सुरु झाली. पठारावरून झाडीत शिरलो. पाऊस अधेमध्ये आपलं अस्तित्व जाणवत होता. पायवाट जरी मळलेली असली तरी, अधून मधुन ढोरवाटा पण भेटीला येत होत्या. त्यातल्या त्यात पायवाट शोधावी लागत होती. पावसातल्या भटकंतीचा सगळ्यात मोठी गंमत म्हणजे धोपट वाटा या सर्व हिरव्या गालीच्या खाली झाकल्या जातात आणि त्या शोधण्यात मोठी मज्जा असते. आता हीच मजा अनुभवायला इथे आलेलो!                      

© Sandip Wadaskar

चारही बाजूनी हिरवीगार गर्द झाडी. गेली चार पाच महिने उन्हाचे चटके सोशीत काढलेल्या पर्वतराजीने हिरवीगार शाल पांघरल्यासारखे भासत होते. जणु नव्या नवरीने आपल्या माहेरपणाला आल्यासारखे. पण हे माहेरपण अजुन दोन-तीन महिने चालणार होते. या कल्पनेने थोडे हसु आले आणि कारण काय तर "दोन-तीन महिने नवरा मोकाट सुटणार होता." असो! अशा या शाल पांघरलेल्या परिसरातून चिखलाची रानवाट तुडवत आम्ही चार भटके चालत होतो,निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत! फक्त निसर्ग आणि आम्ही. अधुन मधून गावकरी भेटत होते. निर्भेळ सुख आणि एकांत! मोरबे धरणाची माथेरान कडील बाजु निमुळती झालेली दिसली. थोड्याच वेळात इरशाळवाडीचा डोंगर उतरून झाला,बैलगाडीचा रस्ता सुरु झाला. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्हाला शोधायचा होता ओढा! जास्त विचार न करता पुढे चालत गेल्या गेल्याच ओढ्याने आमची वाट अडवली. थोडाफार आलेला थकवा पार कुठल्या कुठे पळाला. आता फक्त स्वच्छ नितळ पाण्यानी अंघोळ करायची बास.

चहुबाजूनी डोंगरांच्या कुशीत निसर्गरम्य परिसरात. डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याने तयार झालेला नितळ ओढा. थोडं झाडीत शिरल्यावर दगडांच्या बांधावरून धोधो वाहणारे दुधासारखे तेच पाणी. आणि तयार झालेला छोटासा धबधबा. वाह ! क्या बात है ! आणि दुग्धशर्करायोग म्हणजे (दुधात साखर घातल्यासारखे बरं का!) त्या नयनरम्य जागी फक्त आम्हा चार भटक्यांची टोळी. अफलातुन वाह ! वाह ! मला एकदम गर्दीने भरलेल्या लोणावळ्याजवळील कुठलाशा एका धबधब्याची आठवण झाली. 

© Sandip Wadaskar
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची लोणावळा-खंडाळा या ठिकाणांकडे धाव सुरु होते. अक्षरशः जत्रा भरते. या दिवसांमध्ये राकट,कणखर सह्याद्री जलप्रपातांनी न्हाऊन निघालेला असतो. रौद्र सह्यपर्वताचे हे रूप पालटलेलं असतं. निसर्गाचे हे विलोभनीय सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. अशाच लोणावळा-खंडाळा या थंड हवेच्या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने का होईना ? विकास चाललाय. (हा विकास चुकीच्या मार्गांनी चाललाय ,हा वादाचा मुद्दा ??) पण इथे येणाऱ्या पर्यटकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. "पर्यावरणाची हानी" हा विषय हास्यावर नेणारे बरेच महाभाग पर्यटक इथे भेटतात. म्हणजे इथे यायचं,उघडे-नागडे होऊन,दारू पिऊन गोंधळ घालायचा,खाण्याची वेस्टने,दारूच्या-पाण्याच्या बाटल्या तिथेच टाकायच्या आणि वरून "आम्ही काहीतरी अचाट केलय" या आविर्भावाने घरी परतायचं. लोकांना कल्पनाच नाहीये की ही परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर होत चाललीये. असो. "लोकांना सुबुद्धी येऊ दे." हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 



धबधब्याखाली निसर्गस्नान आटोपुन फोटोसेशन चा मनमुराद आनंद लुटला. मनोरेच्या सागरने तर ३ bhk apartment असे नामकरण करून प्रत्येकास एक कोपरा वाटुन दिला. या कार्ट्याचं डोकं कुठे आणि कसं चालेल याचा नेम नाही. आणि इंद्रा हे ध्यान ,कुठलं ध्यान करत बसलेले देव जाणे! 

© Sandip Wadaskar

थोडी पोटपूजा आटोपुन ठाकूरवाडीकडे चालायला सुरुवात केली. स्वच्छ पाण्याने अंघोळ झाली होती,पोटात थोडफार गेलं होतं. पुढे चालण्यास एवढी उर्जा पुरेशी होती. अशेच दोन-तीन ओढे पार केल्यानंतर सपाटीला पोहोचलो. झाडी थोडी विरळ झाली. आणि समोर माथेरानच्या डोंगराने दर्शन दिले. माथा पूर्ण धुक्यात हरवलेला. पुढे एका दगडावर एक म्हातारे आजोबा जणू काही आमचीच वाट पाहत थांबले आहेत अशा अविर्भावात बसलेले दिसले. "बाबा,ठाकूरवाडी अजून किती लांब आहे?",इति अतुल. "हीच ठाकूरवाडी! ",इति बाबा. अरे वाह. म्हणजे आपण वाडी पर्यंत पोहोचलो तर. बाबांना केळीचे वेफर्स देऊ केले. त्यांनी ते अगदी प्रसादासारखे स्वीकारले. किती साधी-सरळ असतात नाही ही माणस? पण वाडीतले घरं आम्हाला दिसली नाहीत.बैलगाडी रस्त्याने चालत परत एका वाडीत शिरलो. भात लावणी चाललेली. वाडीचं नाव विचारलं,काय बरं नाव ? … हो पिरकडवाडी. मस्त डोंगरांच्या कुशीत वसलेली सात-आठ घरांची वाडी. भरपूर पाऊस असल्यामुळे भातातीच शेती जास्त. "जा,दादाबरोबर शिडीपर्यंत" कुणीतरी मागुन त्यांचं किरटे पोर हाकलल्यासारखी हाक दिली. मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं,बहुदा पोरानं बापाचं ऐकलं नसावं. असु दे. अशाच ठाकरांच्या दोन-तीन वाड्या पालथ्या घालून एका मोठ्या ओढ्याने परत आमची वाट अडवली. ओढ्याचा प्रवाह बराच. वातावरण पार निवळून गेलेलं.धुळीचे कण पावसाच्या जोरदार तडाख्याने जमिनीवर स्थिरावले होते. खूप वेळानंतरच्या भरपूर सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून निघाला होता. पण माथा अजूनही धुक्याच्या कवेत शांत निजला होता. सूर्यप्रकाशाने हजेरी लावल्याने आपसूकच क्यामेरे बाहेर पडले. रस्ता विचारण्यासाठी इंद्रा आणि मी वाडीत शिरलो,परत आलो तर अतल्या आणि सागरचा पत्ता नव्हता. फोटो काढण्याच्या नादात बहुतेक हे दोघे मागेच राहिले असावे. त्यांना हाका मारून मारून हैराण. जाऊ दे. भेटतील इथेच.




 इरशाळ गडाचा उत्तुंग सुळका आमची पाठराखण करत होता. "मी आहे,तुम्ही निघा खुशाल माथ्याकडे " असं काहीतरी खुणावत होता. वाडी सोडून दाट झाडीत शिरलो,इथून आता चढण लागणार होती. डोंगराच्या पोटात परत एका धबधब्याने आमचे स्वागत केले. बाजूलाच कातळावर निवांत जागा दिसली बसायला. विचार केला, थोडंसं तहान लाडु-भूकलाडू पोटात ढकलूनच पुढे जावूयात. पिशव्या खुलल्या. या अतल्याने तीनच केळी -तीनच सफरचंद आणले होते. म्हणे "स्यांडी ,तु येणार नव्हतास ना ? आमच्याबरोबर !" जाऊ दे. आता काय बोलायचं ? पैकी तिन्ही केळी मनोरेच्या कार्ट्यानी अधाशासारखी काल रात्री स्टेशनलाच संपवलेली. पण अख्खं सफरचंद मी एकट्याने बळकावल्यामुळे तिघांमध्ये उरलेल्या दोन साठी भांडण. चालु देत. आपल्याला काय त्याचं ? मी आपला खात बसलो. धबधब्याचे नामकरण झालं ," Apple कॉर्नर". 

© Sandip Wadaskar
 



खुप वेळ झाला. चालत होतो,चढत होतो. मळलेली वाट सापडेना. शिडीची खिंड तर दिसत होती. कुठली तरी ढोरवाट पकडुन पुढे जात होतो अणि अचानक ती पण बंद झाली. आणि नेहमीप्रमाणे वाट चुकण्याची परंपरा राखत मी गँग ला चुकवल. उजव्या बाजुचं टेकाड चढ़ायचं ठरवलं. वर गेल्यावर कुठेतरी वाट दिसेल या आशेनी चढायला सुरुवात केली. त्यात या रानटी डासांनी वैताग आणला होता. जरा कुठे थांबलो की अंगावर मच्छरांचा धुमाकुळ. "पण स्यांडीचा चावा घेताना मच्छरांचेच दात तुटत असतील, नाही ?",इति अतुल. दुसरं कोण ? परत हशा! च्या मारी या अतल्याच्या. चांगली छातीवर येणारी चढण करून आम्ही थोड्याश्या उंचीवर आलो,तेवढ्यात तांबड्या रंगाची चिंचोली वाट दृष्टीस पडली. जीव भांड्यात पडला. वरून दोघे जण येताना दिसले. आयला! एवढी चांगली मळलेली वाट सोडून इकडे कुठे भटकलो? अजून अर्धा तास लागंल,गावकरी. मघापासून पाऊस पण दडी मारून बसला होता. तहान लागली होती. भर पावसाळ्यात घामाने निथळत आणि डासांना शिव्या घालत पहिली शिडी गाठली. येथुन मोरबे धरण, इरशाळगडचा सुळका, धुक्यात हरवलेला प्रबळगडाचा माथा,त्याच्या पोटात असलेले असंख्य धबधबे आणि सभोवताल हिरवीगार किर्र झाडी,दृश्याने थकवाच नाहीसा झाला आणि कुठुन एखाद्या रानपाखराचे मंजुळ गीत ऐकल्यावर तर एकदम ताजेतवाने वाटत होते. 


© Sandip Wadaskar 

पुढे छोटासा ट्रअवर्स पार करून शिडीच्या पायथ्याशी येउन ठाकलो.आधी पाण्याची तहान भागवली. माथ्यावरचे पाणी कातळावरून खाली कोसळत होते. याच कातळामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे खिंडार पडून ही नाळ तयार झाली असेल कदाचित. शिडी ही लाकडी होती. पहिली शिडी लागली ती लोखंडाची होती. लाकडाच्या शिडीवरून वर जायचे म्हणजे मनात थोडी भीतीची लहर उमटलीच. एकतर पाण्यामुळे शिडी कुजुन तुटण्याची शक्यता दाट. घट्ट असल्याची खात्री केली आणि एक एक करुन चढायला सुरुवात केली. शिडी संपेपर्यंत काही नाही वाटलं, मात्र शेवटची पायरी चढताना नाका तोंडात पाणी जात होतं. वारं आणि वरून येणारा पाण्याचा प्रवाह यामुळे थोबाडात मारल्यासारखं पाणी लागत होतं. आणि खरं थ्रिल येथुन सुरु झालं,कारण समोरचं दृष्य पाहिल्यावर तर एकदम हरिश्चंद्रगड-नळीच्या वाटेची आठवण आली. मागे वळून पाहिलं तर direct शिफ्ट-डिलीट. अतुल-इंद्रा पुढ्यात आणि सागर सर्वात शेवटी. पावसाचे पाणी वाहत खाली कोसळत होतं ,नशीब शेवाळ जास्त वाढले नव्हते. या नाळेने चढुन तर जाऊ,मात्र उतरतांना काळजाचे ठोके वाढले नाही तर शप्पथ! माझ्या शूज वरचा विश्वास गेल्यासारखा सागरला पाय धरायला सांगत होतो. या कार्ट्याचा तिथे पण डायलॉग "माझा पाय धरायला ,मी कुणाला सांगु ?". वीस मिनिटात हा भयंकर रॉक पैच पार करून आम्ही माथा गाठला. पाच मिनिटाकरिता सगळ्यांचा इंद्रा(?) झाला होता .हा हा ! 

माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या  कचऱ्याचा ढीग. तेच आपलं अपेक्षित असलेलं वातावरण. शार्लोट लेक जवळ तुफान गर्दी. तिथे अजुन आपली गर्दी न करता सरळ स्टेशन जवळ एका मावशीबायची चहाची टपरी गाठली आणि मिसळ-वडापाव ची फर्माईश देत गप्पा मारत बसलो. उदरमभरणं करून परतीची वाट धरली ती प्रिय सह्याद्रीचा निरोप घेऊन ! इति संपूर्ण अजून एक अविस्मरणीय भटकंती !

धन्यवाद !

कात्रज-सिंहगड Night Trek

5 comments:


© Sandip Wadaskar


कात्रजचा बस थांबा! एक भटका गँग ची वाट पाहत थांबलेला.
तब्बल अडीच तासांनी एक एक करून गँग(सागर,प्रसन्ना,अतुल,इंद्रा,श्रद्धा, अजित,श्रेयस आणि स्वप्नील) हजर.गप्पा-टप्पा मारत कात्रजच्या घाटानी आमचा प्रवास सुरु झाला. आपसूकच मनातल्या मनात इतिहासाची पाने उलटल्या गेली आणि महाराजांच्या शाहिस्तेखानाची बोटे कापून लाल महालातून सुटकेचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला.
" लाल महालात अचानक हल्ला करून राजांनी शाहिस्तेखानाच्या मुलासह खानाची बोटे कापली आणि गनीम गनीम ओरडत तेथून पळ काढला. नियोजनाप्रमाणे महाराज थोडे पुढे गेल्यावर कात्रज घाटातल्या मावळ्यांना इशारा करण्यात आला आणि आजूबाजूला झाडांवर कंदील टांगल्या गेले. अर्थातच महाराजांनी पर्यायी मार्गाने सिंहगडाकडे कूच केले. पण पाठलाग करणारे खानाचे मुघल सैनिक, कंदिलाप्रकाशाच्या दिशेने घाटाकडे गेले. खूप वेळानंतर मुघलांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव होऊन,ते माघारी फिरले. मुघलांनी सिंहगडचा पायथा गाठला. पण तोपर्यंत महाराज त्यांच्या तोफेनिशी गडावर सज्ज होते. मुघल तोफेच्या आवाक्यात येताच,पहिला बार उडाला आणि धांदल उडाली. कित्येक गेले,कित्येक जखमी झाले."
प्रसंग मनात आठवत असतानाच "स्यांड्या कुठेपण मावतो" या अजित च्या कमेंट ने ध्यानावर आलो. मी टमटम च्या विंडो सीट मध्ये बसलो होतो. गँगने टमटम मधुन कात्रज चा जुना बोगदा गाठला. आणि लांबच लांब आणि लांबच लांब …वर खाली वर खाली करत जाणाऱ्या डोंगराकडे कूच केले. मे मधल्या रणरणत्या दिवसभराचे ऊन, त्याउलट रात्रीचे हे आल्हाददायक वातावरण आणि मंद वाऱ्याच्या झुळूक, आमच्या भटक्या मनाला वेड लावून गेले आणि आम्ही आमच्या भिंगरया लागलेल्या पायांना वाट मोकळी करून दिली…सुरु झाली अजून एक अविस्मरणीय भटकंती … सह्याद्रीच्या कुशीत ! 
बोगद्यावर चढुन थोडा चढ गाठला आणि मंदिरातील वाघजाई देवीचे दर्शन झाले. येथुन पुण्याचे क्षितीज भारी दिसत होते. रात्रीचे दहा वाजलेले,एव्हाना जेवणे आटोपुन पुणेकरांची झोपेची तयारी चाललेली असेल,असे मनाला वाटून गेले. कात्रजचा घाट गाड्यांच्या रहदारीमुळे प्रकाशून गेलेला. वाघजाईचे दर्शन घेऊन आम्ही सिंहगडाकडे वाटचाल सुरु केली. आमच्यापैकी याच्याआधी या वाटेला कधी कोण भटकलेलं नव्हतं,त्यामुळे सगळ्यांसाठी रस्ता पूर्णपणे नवखा! म्हणजे रात्रीची वाट शोधण्यात मजा. मध्ये लागलेली बऱ्यापैकी रुंद वाट संपली आणि परत चढ सुरु झाला. सगळ्यांना तो म्हणतात ना ,पहिला दम का काय ते,तो लागला आणि अजित च्या ठरलेल्या कार्यक्रमाचे चिन्हं दिसायला लागले. आणि बघता बघता त्याने तो कार्यक्रम आटोपला. सगळे माथ्यावर पोहोचले. एकमेकांची खेचत आम्ही पुढे होतो. मागुन अजित आला तो,अतुल आणि सागरला शिव्या देतच. बहुतेक सागर ने नको तिथे आणि नको तो फोटो काढला असावा. येथुन वाट अस्पष्ट होती,अजूनही सिंहगडावरचा लाईट दिसला नव्हता. छोटाश्या पायवाटेने चालत पहिला वहिला डोंगर पार केला आणि सिंहगडाचे दर्शन झाले.आतापर्यंत वाऱ्याचा मागमुसही नव्हता,पण माथ्यावर पोहोचल्या पोहोचल्या सुंसुं करत वाहणाऱ्या थंड वारयानी आमचे स्वागत केले. 

माथ्यावरून सिंहगडपर्यंत दिसणारी मोठीच्या मोठी डोंगरांची लांबच लांब रांग चंद्राच्या थोड्याफार प्रकाशात उजळून निघाली होती. "भटक्या मित्रांसोबत आता या डोंगर रांगेची रात्रभर साथ असणार ",या फक्त कल्पनेनीच सुखावलो. माथ्यावर थोडा वेळ थांबलो, गडावर असणारया दूरदर्शनच्या खांबावरचा लाईट दिशादर्शक समजुन आम्हाला गड गाठायचा होता.माथ्यावरून डावीकडे एक मळलेली वाट दिसली. पुढे मी आणि मागे गँग असे करत, आल्हाददायक वाऱ्याचा आस्वाद घेत आम्ही चालायला सुरुवात केली. पहिला दम लागल्यावर सगळेजण आता ऱ्हिदम मध्ये चालत होते. थोड्याच वेळात माथा उतरलो,तर लक्षात आले की आपण वाट चुकलो.समोर फक्त खोल दरी.पलिकडे जायला रस्ता नव्हता सापडत. एक रस्ता होता,पण तो जर उतरलो असतो तर शिवापूरला पोहोचलो असतो. परत फिरून माथ्यावर आलो. येथून दुसरी कुठली वाट आहे का? शोधायला सुरुवात केली. आणि उजवीकडे एक पायवाट सापडली. नेमकी हीच पायवाट आम्ही चुकलो होतो,हम्म  खरं सांगायचं तर मीच चुकलो होतो.पण खरं सांगु का ? रस्त्यांबद्दल,किंवा कदाचित रस्ते चुकण्याबद्दल माझं एक ठाम धोरण आहे आणि ते मी नेहमी पाळतो. ते म्हणजे "रस्ते हे चुकण्यासाठीच असतात, आणि पहिल्या वेळी ते चुकलेच पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. " आणि हो रस्त्याबद्दल आमच्याकडे मनोरे साहेबांचं सुद्धा एक मत राखीव आहे, बरं का ! त्यांच्या म्हणण्यानुसार "सगळे रस्ते हे मोक्षाकडेच जातात! काय ?" 

असो. तर आम्ही अचूक पायवाटेने चालायला सुरवात केली. आता ध्येय माहिती होते,रस्ता माहिती होता. पोरं उत्साहानी पाय टाकत,रप रप चालत होते. पहिला डोंगरमाथा उतरून झाला आणि अतुलची कुरकुर सुरु झाली,"कधी जेवायचं ? ". चुल पेटवायला जागा शोधता शोधता अजून एक डोंगर चढुन-उतरून झाला. आता मात्र सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सरपणाची शोधाशोध झाली. चूल पेटली. सागर आणि अतुलनी मस्त पैकी गरमागरम Maggi तयार केली. अजित आणि श्रद्धाने घरून पराठे आणलेले. सगळ्यावर येथेच्छ ताव मारून मावळे हुशार झाले. १०- १५ मिनिटे आराम करून सिंहगड वारी सुरु केली. 


कात्रज- सिंहगड. हे शीर्षक वाचल्यावर कुठलाशा बस मार्गाची आठवण होणे स्वाभाविक आहे. पण हा बस मार्ग नव्हे, गेली कित्येक वर्षे जातिवंत भटके तुडवत आलेला कोंडाण्याकडे जाणारा हा एक राजमार्गच जणु. मध्ये कुठलेही आकर्षण नसताना पौर्णिमेच्या एखाद्या रात्री अथवा पावसाळ्यात हिरवा गालीचा पांघरलेल्या डझनभर डोंगरातून फक्त पायपीट करण्याची मज्जाच वेगळी आहे. पण गेल्या १०-१२ वर्षात कात्रज घाटातल्या या निसर्ग सौंदर्याला ग्रहण लागले. डोंगरफोडी,मानवी विकृतीचा अतिरेक,पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्यांमुळे हे निसर्गलेणं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत राहतील की नाही याचीच भीती वाटायला लागते. 

असो. आमची वारी सुरु होती. अजून २-३ छोट्या मोठ्या डोंगरांचा पल्ला गाठत एका विस्तीर्ण पठारावर येऊन पोहोचलो. गार गार जमिनीला पाठ टेकवली तेवढ्यात उल्का वर्षावाने आम्हाला दर्शन दिले. सागरच्या माहितीनुसार आज मध्यरात्रीनंतर उल्का वर्षा होणार होती, त्यामुळे तीही उत्सुकता या ट्रेक बद्दल होती. शहराच्या गजबजाटात आणि प्रदूषित वातावरणात ही नैसर्गिक देणगी अनुभवणं तर शक्यच नव्हतं. शांत सह्याद्री पहुडलेला.पुणेकर साखरझोपेत.पल्याड शिवापुरकर आणि नसरापूरकर केव्हाच झोपेच्या अधीन झालेले. चंद्र आपल्या मावळतीकडे झुकत चाललेला. चंद्राच्या या निरागस सौंदर्याचं विशेष अप्रूप आणि कौतुक आमच्या अजितलाच जास्त. तो तर एकदम भारावूनच गेला होता. आणि "चंद्रा" चे सागरने काढलेल्या जबरदस्त फोटोंचे श्रद्धा ला कौतुक. पण मला मात्र इथे असणाऱ्या शांततेचं कौतुक ! सकाळचे अडीच-तीन  झाले असावेत. प्रसन्ना घाई करत होता,"चला पटकन,थोडे पुढे जाऊन आराम करूयात". पटापट पोरं उठली आणि चालायला लागली. परत एक डोंगर चढून माथ्यावर आलो. कोणाच्याच तोंडातुन शब्द निघेना, सगळीकडे निरव शांतता. आता मात्र जमीनीला पाठ टेकवण्याची नितांत गरज भासत होती. सपाट आणि मोकळी जागा शोधून, दिली सगळ्यांनी ताणुन.

पहाटेची वेळ. पाच-सव्वापाच झाले असतील. दहा-बारा जणांचा ट्रेकर्सचा ग्रुप आणि त्यांच्या फालतु गप्पांनी जाग आली. आधीच उन्हाळ्याच्या मे महिन्यात सुद्धा वातावरण पार गारठून गेलेलं. "उन्हाळा आहे, कशाला पाहिजे चादर न स्वेटशर्ट,चला ! थंडी नाही पडणार एवढी. " अशा तयारीने आम्ही ट्रेकला निघालेलो. आता चांगली हुडहुडी भरली होती,पावणे दोन तासापैकी अर्धा तास झोप लागली असेल. त्यात भर म्हणुन या ग्रुपचा गोंगाट. आजकाल ट्रेकिंग चं फ्याड एवढं वाढलंय की, ट्रेकिंग करतानाचे काही पथ्ये असतात,नियम असतात याचाच लोकांना विसर पडलाय. ट्रेकिंग म्हणजे फक्त बोंबलत फिरणे,आरडाओरड करत लोकांची टिंगल करणे,डोंगर-टेकड्या चढुन माथ्यावर ओल्या पार्ट्या साजऱ्या करणे हेच होऊन बसलेत. त्या लोकांना जराही काही वाटत नव्हते की "आपण जिथे गोंधळ घालतोय,तिथेच दुसरा ग्रुप झोपेत आहेत." शेवटी त्यांना गप्पं बसायला सांगावं लागलं. आलेला ग्रुप पांगला. थोड्या वेळात आम्ही उठलो,पटापट आवरून चालायला लागलो. माथा उतरत असतानाच पश्चिमेकडे सिंहगडाचे आणि पूर्वेकडे नित्यनेमाने उगवणाऱ्या सुर्यनारायणाच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या पहाटेच्या फुटलेल्या तांबड्याचे दर्शन झाले. या डोंगराचा माथा उतरून परत पुढचा डोंगर चढायला सुरुवात केली. उजवीकडे खडकवासला जलाशय, पहाटेच्या धुकट वातावरणाची चादर पांघरून सकाळच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत अजूनही बिछान्यात असल्यासारखे जाणवले. जवळपास दोन ते तीन डोंगर चढून उतरायचे होते. क्षणार्धात, रात्रभर पाय फुटेस्तोवर भटकंती केलेल्या डोंगरांच्या कुशीतुन सुर्योद्यास सुरवात झाली आणि लाल-तांबड्या ठिपक्याने आम्हाला कृत्यकृत्य केलं. माथ्यावर आलो तेव्हा कोंडाणा कोवळं उन्हं पडल्यामुळे सोनेरी रंगात न्हाऊन निघाला होता. मागे वळून पहिले तर सह्याद्रीतली ही भुलेश्वर डोंगररांग पावसाची आतुरतेने वाट पाहत होती. याच डोंगररांगेत सासवड जवळ मल्हारगड(सोनोरीचा किल्ला) आणि कानिफनाथांचा डोंगर विसावले आहेत. 





शेवटचा माथा उतरून, करवंदाच्या झाडीत शिरलो. सकाळी सकाळी डोंगरातल्या काळ्या मैनेला भक्ष्य करून नाश्ता आटोपला. डोंगरातली काळी मैना म्हणजेच करवंद बरं का !(नाहीतर गैरसमज होईल,ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी).करवंदाच्या झाडीतुन बाहेर पडत आम्ही एकदाचं रस्त्याला लागलो. आणि काय सांगु "डझनभर डोंगरांची पायपीट करून आल्यानंतर या सपाट रस्त्याला चालणे म्हणजे स्वर्गसुखच !" इथून शिवापूर १२ किमी. आणि सिंहगड अजुन ३ किमी. चालणे रास्त होते. न थांबता घाटातुन चालायला सुरवात केली. पावसात हिरवी शाल पांघरलेला सिंहगड, ज्याचे अनोखे सौंदर्य अनुभवायला गाड्यांची पार शिवापूर फाट्यापर्यंत गर्दी होते, जिथे धो-धो पावसात यावेळी गरमागरम पिठलं-भाकरी आणि कांदा भज्यांची रेलचेल असते,त्यावेळी आता मात्र आम्ही भटके राकट कोंडाण्याकडे कौतुकाने पाहत पुणे दरवाज्याचे अंतर कमी करत होतो.कधी कधी अंतिम लक्ष्यापेक्षा ते लक्ष्य गाठण्यासाठी चाललेली धडपड,खटाटोप अधिक सुखावह ठरते,याचा अनुभव आज येत होता. आम्ही चालत असतानाच,गाड्यांमधून फिरायला आलेले(पर्यटक) जमेल तितक्या हावभावाने आमच्याकडे पाहत पुढे जात होते. रस्त्याच्या बाजुला भर उन्हाळ्यात फुललेल्या गुलमोहराने परत एकदा मन वेडावून टाकले. काय निसर्गाची कमाल नाही! रणरणत्या उन्हात फुलणारा लालभडक गुलमोहर.पुणे दरवाज्याच्या खाली पोहोचलो तेव्हा सकाळचे साधेसात-आठ झाले असावेत. गरम व्हायला सुरुवात झाली होती. लगेच पुणे दरवाजा गाठला आणि टाक्यातले गार पाणी पिऊन हुशार झालो. एका दमात काही खाण्याच्या आधीच सिंहगडाची सफर केलेली बरी, म्हणुन निघालो. 

सिंहगड उर्फ कोंडाणा. वीर तानाजीच्या शौर्याची आठवण करून देणारा कोंडाणा! स्वराज्याच्या अनेक चढउताराची साक्ष असणारा कोंडाणा! आणि आता दुर्दैवाने वीकेंड ला मौज-मजा करण्याचे डेस्तीनेशन बनलेला कोंडाणा? ………. असो. तर बापूजी देशपांडे यांच्या मदतीने महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. त्यानंतर शहाजी महाराजांची सुटका,पुरंदरचा तह,संभाजी महाराजांचा मृत्यु, अशा एक-अनेक कारणांमुळे तो मुघलांकडून स्वराज्यात आणि स्वराज्यातून मुघलांकडे वाऱ्या करत होता. शेवटी ब्रिटिशांनी जिंकुन घेतला. 

गड फिरायला सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा वाडा. असं म्हणतात ही जागा टिळकांनी एका रामलाल नाईक नावाच्या व्यापाराकडून घेतली. आता ह्या नाईकाकडे ही जागा कशी आली? ,देव जाणे. वाडा बंद करून ठेवलाय, पाहता येत नाही. राष्ट्रपिता आणि लोकमान्यांची भेट या वाड्यावर झाली होती. वाडा पर्यटकांसाठी खुला करायला हरकत नाही असं वाटून गेलं,असो. छत्रपती राजारामांच्या समाधीकडे वळलो. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी सिंहगडावरच निधन झालेल्या राजारामांची समाधी राजस्थानी पद्धतीने बांधली आहे. आजुबाजुचे दोन-तीन पाण्याचे टाके एकदम स्वच्छ होऊन पावसाची वाट पाहत होते. समाधी पाहुन तानाजी कड्याकडे चालायला लागलो,तोच मध्ये देवटाक्याचे अमृततुल्य पाणी पिऊन तृप्त झालो. सिंहगडाचे वडील बंधु असल्यासारखे तोरणा-राजगड या दुर्ग जोडीने आम्हाला दर्शन दिले. सिंहगड-राजगड-तोरणा-रायगड ही पदयात्रा खुणावत होती. बाजुला कुठलाशा ट्रेकिंग कंपनीचे तानाजी कड्यावर valley crossing चाललेले. कल्याण दरवाज्यापाशी येउन थांबलो.इथे एका मागोमाग एक असे दोन दरवाजे आहेत,कल्याण गावातून आपण या दरवाज्यातुन गडावर पोहोचतो. अशा अनेक ऐतिहासिक वास्तु बघुन आम्ही परत फिरलो. पिठलं भाकरी वर ताव मारून घराची वाट धरली ती अजुन एका अविस्मरणीय भटकंतीची आठवण मनात साठवुन . 








इरशाळगड-शिवाजी शिडीने माथेरान

1 comment:
पुन्हा एकदा कर्जतचं बसस्थानक. इंद्रा आणि अतल्या पडल्या पडल्या झोपेच्या अधीन झालेले. मी आणि सागरला झोप येत नव्हती कि मच्छरांची लागवड जास्त प्रमाणात झाली होती,हे कळायला मार्ग नव्हता. कर्जतला पावसाळ्यात रात्रीचं कधी राहिलो नसल्यामुळे,या उपद्रवाची कल्पनाच नव्हती. येथे डासांनी भयानक तांडव माजवले असताना या दोघांना झोप कशी लागत होती ? आणि वरून हा सागर पेटला होता,हे मनोरेचं कार्ट मोबाईल वर चित्र-विचित्र गाणे लावून एकटाच नाचायला  लागलं होतं. काय कळेना ! हा सर्व कार्यक्रम चालू असताना जरा थोडा वेळ डोळा लागला तर बसस्थानकवरच्या गर्दीच्या किलबिलाटानी जाग आली. सकाळचे साडेचार -पाच झाले असावेत. बसस्थानक ट्रेकर/पिक्नीकर लोकांनी भरून गेलं. कुणी भीमाशंकर,कुणी पेबचा किल्ला,कुणी माथेरान,असंच काही बाही. आम्ही पनवेलला जाणाऱ्या पहिल्या बसची वाट पाहत थांबलो. 


नशा. व्यसन म्हणा हवं तर. नशा हा शब्द जरा त्यातला वाटतो. महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला लागलेलं सह्याद्री नावाचं व्यसन. आणि माणूस एकदा सह्याद्रीच्या वाटेला लागला की ही वाट सुटणे अशक्य. शिवाय हे व्यसन कधीही सुटू नये ही आम्हा जातिवंत भटक्यांची मनस्वी इच्छा. पोर सुखरूप घरी येऊ दे ही आमच्या आईवडिलांची देवाकडून माफक अपेक्षा! पण आईबाबा तुम्ही काळजी करू नका. तुमचं पोर कधीच आगाऊ धाडस करणार नाही. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आशीर्वाद द्या. बास ! 

अशाच व्यसनान्ध आम्हा भटक्यांचे पाय आम्हाला घरात स्वस्थ बसू देईनात. तरी बरं या पावसात प्रत्येक आठवड्याअंती आमच्या चार मोहिम पार पडल्या होत्या. पण व्यसनच ते. आम्हाला घरातून बाहेर पडणं भागच होतं. रद्द होता होता सागर,अतुल, इंद्रा आणि मी अशी चांडाळ चौकडी तयार झाली. बेत पक्का झाला.  शिवाजी शिडीने माथेरान गाठायचं. 

कोंकण. कोंकण म्हणजे रायगडाची सोपी चढाई करताना चांगल्या ट्रेकरची धांदल उडवणारं दमट वातावरण. कोंकण म्हणजे हरिहरेश्वर सारख्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावरचा सांजवेळ गारवा. कोंकण म्हणजे रायगडावरील महादारवाज्याची प्रतीकृती असणारया सुधागडावरील दरवाज्याबद्दलची कुतूहलता. कोंकण म्हणजे महाराजांनी हेरलेले सागरी आरमाराचे महत्व. कोंकण म्हणजे महाराजांच्या स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या सिंधुदुर्गाचा प्रदेश. कोंकण म्हणजे सह्यापर्वताची मुख्य रांग कापत,घाटमाथ्यावरून उतरत घाटाने अथवा कुठल्याशा नाळेने गाठण्याचे अचाट वेड. 

याच कोंकणात सह्याद्रीच्या पोटात असलेल्या एका डोंगरावर कुणा एका गोऱ्या साहेबाने म्हणे खूप वर्षाआधी विकास करून ठेवलाय. तेच आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक…. माथेरान, म्हणजेच माथ्यावर रान असलेला डोंगर. पण माथा गाठायचा आडवाटेने. डोंगरातील पायवाटेने.

पावणे सहाला बस आली,अर्ध्या तासात चौकला पोहोचलो . एकाला इरशाळवाडीची वाट विचारून उदरभरणाचा कार्यक्रम आटोपला आणि इरशाळ वाडीकडे चालायला सुरुवात केली. रात्री मुसळधार पावसाने हजेरी दिल्यासारखं,सकाळचं वातावरण मन प्रसन्न करून गेलं. रेल्वे रूळ ओलांडून गाडी रस्त्याला लागलो. येथूनच मोरबे धरणाची भिंत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला धुक्यात हरवलेला इरशाळगडाचा उतुंग आणि अवघड असा सुळका,यांचे दर्शन झाले. मघाच्या उदरमभरणं या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अर्थातच नैसर्गिक कौल! इंद्राने पुढाकार घेतला. आणि नेहमीप्रमाणे अविस्मरणीय क्षण टिपण्यात सागर मश्गुल असल्यासारखं दुरून दिसलं. पण इंद्रा पत्ता लागु देतो व्हय? सागरनी यशस्वी माघार घेतली. तिकडी जेथून इरशाळ वाडीची पायवाट सुरु होते तिथे येउन थांबली. गाडीरस्ता संपणार होता. इंद्रा कौल देऊन परतला. गाडीरस्ता सोडून डाव्या बाजूने असलेल्या चिखलातून चालायला सुरुवात केली. आणि ज्याची दाट भीती होती तेच झालं. मनोरेचं कार्ट भूंकलं,"आपल्याला इरशाळ गड करायचाय, आता इरशाळ गड उतरूनच माथेरान गाठू ". हे प्लान मध्ये नव्हतं. आता एक म्हणजे हे कार्ट ऐकणारं नव्हतं आणि दुसरं आम्हाला पण इरशाळ गडाचा सुळका खुणावत होताच. होकार द्यायला पर्याय नव्हता. ठरलं आधी मोहीम इरशाळगडाची. 


इरशाळ वाडीच्या वाटेला लागलो तोच,आजूबाजूच्या पाड्यातून बायाबापडे डोकावत होती. सगळ्यांची सकाळची कामे चाललेली. उजव्या बाजूला मोरबे धरणाचं पाणी आणि वाटेचा भाग सोडला तर दोन्ही बाजुनी हिरव्या आणि पोपटी रंगानी लगडलेली जमीन. हे बघून एकदम सुधगडाची आठवण झाली आणि चालण्याचा हुरूप अजून वाढला. पुढे जातो न जातो तोच समोरून एक माणूस येताना दिसला. त्याला वारोसेची वाट विचारली. त्याने "अक्ख्या गावाचे भौगोलिक स्थानंच बदलले आहे" असे सांगत "पुढे गेल्यावर ठाकरवाडी विचारा" असे सुचवले. बरं. बोलण्या बोलण्यात हा गावातला मुख्य माणूस आहे आणि गड त्याच्या देखरेखीखाली आहे असे कळले. 


मागल्या वेळेस प्रबळगडावरच्या काळ बुरुजावरून इर्शालगडाचे थक्क करणारे दर्शन अजूनही आठवत होते. बरेचदा पनवेल रस्त्यावरून खुणावणारा इरशाळगडचा उत्तुंग सुळका. कदाचित याहीवेळी सुळका चढणे शक्य नसले तरी जवळून बघण्याची संधी योगायोगाने आली होती. त्यामुळे पाय रपरप वाडीकडे झेपावत होते. अधून मधून पाऊस-धुके यामुळे वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी समुद्रसपाटी जवळ असल्यामुळे दमट. जर कुठे पाऊस बंद पडला की गरम व्हायला सुरुवात. पहिल्या दमाच्या ओघात सागरया आणि इंद्रा मागे पडले होते. अतुल आणि मी पुढे,एकमेकांशी काहीच न बोलता धुक्यांमधूनफक्त शांततेचा आनंद घेत होतो. तेवढ्यात दरीत काहीतरी धरपकड झाली. कोणीतरी जनावर किंचाळण्याचा आवाज आला. शांततेचा भंग. "दोन माकडाचं काहीतरी चाललंय" इति अतुल.


बऱ्यापैकी उंचीवर आलो होतो. धरणाच्या विहंगम दृश्याने मन वेडावले. वरून दोघे-तिघे जण उतरताना दिसले. बहुतेक गावठी कट्टा वाहत होते. विचारून खात्री करून घेतली,तेवढीच आपली माहितीत भर! धुक्यामुळे अजूनही सुळका स्पष्ट दिसत नव्हता.

गावकऱ्यांकडून वाटनिश्चिती करून चालायला लागलो. थोड्याच वेळात पठारावर भातचीखलाने आमचे स्वागत केले. दूरवर कुठेतरी पिवळ्या-विटकरी रंगाचं बांधकाम दिसलं,बहुदा शाळा असावी. वाडीत पोहोचल्याची खात्री पटली. भातचीखलाच्या वाफ्यामधले स्वच्छ नितळ पाणी तोंडावर शिंपडून पुढे निघालो आणि वाडीत प्रवेश केला . वस्तीतल्या मावशिबायला रस्ता विचारत सुळक्याकडे निघालो थोडं पुढे चालत गेलो की सुळक्याच्या पायथ्याशी एक छोटं देउळ लागतं. छोट्या धबधब्याजवळ डोंगर कातळातल्या नितळ पाण्याने बाटल्या भरून घेतल्या. तेवढ्यात पावसाची रिप रिप सुरु झाली. सुळक्याच्या अगदी जवळ एका भल्यामोठ्या दगडावर आम्ही आमचा पार्श्वभाग टेकवला. आमच्याआधीच इंद्रा तिथे पोहोचला होता. कुठलातरी शोर्टकट त्याने मारला,असं काहीतरी सांगत होता. आणि वरून ओरडत होता,"अरे लवकर या,पटकन या ". बहुतेक त्याला धुक्यामध्ये हर्षवायू झाला असावा नाहीतर नेहमीप्रमाणे काहीतरी "एक नंबर " दिसलं असावं. आम्ही पोहोचलो तर दृश्य खरोखरीच एक नंबर होतं. प्रबळ माथ्याकडे जाणारी डोंगररांग,मोरबे धरणाचं अधिक उंचावरून दिसणारं पाणी,पनवेल शहर. अर्थात त्यासाठी धुकं विरळ होण्याची वाट पहावी लागत होतीच.

भलामोठा दगड चढून आम्ही एकदम सुळक्याच्या पुढ्यात येउन ठाकलो.याच्यापुढे जाणे आता शक्य नव्हते. एकतर आम्ही बहुतेक मागच्या बाजूने सुळक्याजवळ पोहोचलो होतो. येथून वाट बिकट होती. त्याला वाट म्हणणे सुद्धा अयोग्य. दोन्ही बाजूनी खोल खोल दरी. धुकं असल्यामुळे दरीची भीषणता जाणवत नव्हती. आणि तेवढ्यात धुक्याने रहस्य उलगडावं तसं विरळ होउन आमच्या नजरांना वाट करून दिली, डोळ्यासमोर उभा केला साक्षात इरशाळगडाचा उत्तुंग सुळका,सरळसोट एकदम आकाशाला भिडणारा. डोळ्याचे पारणे फिटले,वाह ,क्या बात !





इरशाळगड:
समुद्रसपाटी पासून जवळपास १५०० फुट उंच . हा गड नव्हे. या गडाला फारसा इतिहास नसावा,कारण उल्लेख कुठेही नाही. गडावर पाहण्यासारखे विशाळादेवीचे मंदिर,टाक्या आणि नेढे. टाक्याच्या अस्तित्वामुळे गडाचा उपयोग कदाचित टेहेळणी बुरुज म्हणून झाला असावा.माथ्यावरून माणिकगड,प्रबळगड,कर्नाळा ,मलंगगड,चंदेरी,माथेरान या कोंकण सख्यांची भेट होते.नेढ्यापर्यंत शिडीने सहज पोहोचता येतं,सुळक्यावर जायचे असेल प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. राहण्यास शाळा योग्य,जेवणाची व्यवस्था आपणच करायची. 

सभोवतालचे निसर्ग रम्य दृश्य न्याहाळून आम्ही माथा उतरायला सुरुवात केली. इरशाळ वाडीकडे उतरताना पावसाची एक जोरदार सर कोसळून गेली. पाऊस हा नेमका उतरताना का कोसळतो हे मला अजून न सुटलेलं कोडं आहे …………